पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पढविले जात असत. प्रत्येक कृत्य समाज कल्याणाच्या हेतूनेच केले जात होते. आणि गावातही त्यांना नीतिधर्माचे आधार म्हणूनच मान होता. पण प्रत्यक्षात त्यांच्या प्रत्येक कृत्याच्या पायाशी असत्य, फसवणूक, स्वार्थ, लोभ, हीन कारस्थाने हेच होते. जोहान व लोना ज्या बोटीने अमेरिकेहून आले त्या बोटीचे नाव 'इंडियन गर्ल' असे होते. तिची फार मोडतोड झाली होती. बर्निकच्या कारखान्यात ती दुरुस्तीला आली होती. वास्तविक तिच्या दुरुस्तीला महिना सहज लागला असता. पण दोनतीन दिवसात ती कशीतरी दुरुस्त करून मोठा लाभ उठवावयाचा असे बर्निकने ठरविले. त्याच वेळी त्याच जहाजावरून आपण परत जाणार, असे जोहानने जाहीर केले. तेव्हा तर कच्ची दुरुस्ती करून आपल्या या हितशत्रूला जलसमाधी देण्याचे वर्निकने निश्चित केले. पण आयत्या वेळी एक विपरीत घटना घडली. वर्निकचा ओलाफ हा बारा तेरा वर्षांचा मुलगा अत्यंत हूड व व्रात्य असा होता. 'इंडियन गर्ल' अमेरिकेला निघाली तेव्हा मामाबरोवर अमेरिकेला जावयाचे ठरवून तो त्या बोटीवर गेला. पण जोहान आयत्या वेळी बेत बदलून दुसऱ्या जहाजाने गेला होता. वर्निकला दोन्ही वार्ता कळल्या तेव्हा त्याची कंबरच खचली. शत्रूसाठी फेकलेल्या जाळ्यात त्याचा मुलगाच सापडला होता. सुदैवाने ओलाफच्या आईला आधीच त्याचा सुगावा लागून तिने त्याला बोटीवरून परत आणला होता.
 सगुण रूप कार्ल मार्क्सने भांडवलशाहीचे सर्व अंतरंग आपल्या ग्रंथात तपशिलाने वर्णिलेले आहे. पण ते शास्त्रीय वर्णन आहे. इब्सेनने त्यालाच ललितरूप देऊन हे साहित्यसुवर्ण निर्माण केले आहे. इब्सेनने स्वतःच म्हटले आहे की, 'भोवतालची परिस्थिती व समाजातील रूढ तत्त्वे या पार्श्वभूमीवर मानव व्यक्ती, त्यांच्या भावभावना आणि त्यांचे भवितव्य यांचे चित्र काढावे, असा माझ्या मनातला हेतू होता.' या उद्दिष्टाला अनुसरूनच मार्क्सच्या तात्त्विक विचाराला त्याने सगुण साकार रूप दिले.
 २ धर्मसत्ता इब्सेनने ज्याप्रमाणे भांडवलदार वर्ग, भांडवली सत्ता यांचे रूपदर्शन केले आहे त्याचप्रमाणे एमिल झोला या फ्रेंच कादंबरीकाराने दुसऱ्या एका अशाच प्रभावी पण भ्रष्ट सत्तेचे दर्शन घडविले आहे. ती सत्ता म्हणजे धर्मसत्ता होय. ही सत्ता भांडवली सत्तेपेक्षा शतपट जास्त क्रूर व घातक असते. कारण माणसांच्या हीन भावना ती चेतवू शकते, आणि हे सर्व त्याग, ध्येयवाद, उदात्तता, परमेश्वर, भक्ती, मोक्ष यांच्या नावाखाली ! झोलाच्या मते रोमन कॅथॉलिक धर्माची सत्ता अशी होती. फ्रान्समध्ये १८७० साली प्रजासत्ताक स्थापन झाले. त्याच्या आधी शंभर वर्षे स्वातंत्र्य, समता, बंधुता, सत्य, न्याय, बुद्धिप्रामाण्य यांच्या प्रस्थापनेसाठी तेथे क्रान्ती झाली होती. पण नवतत्त्वांच्या या प्रचंड लाटा ओसरताच रोमन कॅथॉलिक धर्मगुरूंनी मोठ्या कौशल्याने, मुत्सद्देगिरीने लोकमतावर आपले वर्चस्व पूर्ववत् स्थापन केले होते. प्रजासत्ताक स्थापन झाल्यावर लोकशिक्षण हे धर्मगुरूंच्या हातून काढून

भिन्न वर्गांचे जीवन
३३