पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तालची जमीन त्या संचालकानी खरेदी करून टाकली. का ? अर्थात पुढे तिची किंमत लक्षावधी रुपये होणार होती म्हणून. आज त्यांना ती कवडीमोलाने मिळाली. हे सर्व करून हा सर्व खटाटोप आपण समाजहितासाठी करीत आहो, असा देखावा बर्निक करीत असे. आणि भोळ्या गावकऱ्यांना ते खरे वाटत असे. त्याला गावात फार मोठी प्रतिष्ठा होती. नीती, चारित्र्य यांचा तो आदर्श मानला जात असे. लोक त्याला समाजाचा आधारस्तंभ- पिलर ऑफ दि सोसायटी- मानीत.
 गेल्या पंधरावीस वर्षात अशी अनेक 'लोकहिताची' कृत्ये करून बर्निक मान, प्रतिष्ठा व आधारस्तंभ ही पदवी मिळविली होती. वीस वर्षापूर्वी लंडन- पॅरिस येथून शिकून तो गावी परत आला. तेव्हा लोना हेसलवर त्याचे प्रेम होते. त्यांच्या विवाहाच्या आणाभाकाही झाल्या होत्या. पण लोना गरीब होती. आणि तिची दूरची एक बहीण कुमारी टॉनेसेन ही श्रीमंत होती. तेव्हा लोनाला दिलेले वचन मोडून त्याने टॉनेसेनशी लग्न केले. त्यानंतर थोडे दिवसांनी गावात एक नाटक कंपनी आली होती. तिच्या मालकाची पत्नी सुरेख होती. बर्निकने तिला वश केले. पण त्या प्रकरणाची वाच्यता होईल अशी भीती निर्माण होताच त्याने एक अभिनव युक्ती योजली. जोहान टॉनेसेन हा त्याचा मेहुणा व बालमित्र. तो नशीब काढण्यासाठी अमेरिकेस चालला होता. त्याला विनवून ते लफडे स्वतःच्या गळ्यात घेण्यासाठी बर्निकने त्यांचे मन वळविले. त्यानेही ते उदार मनाने मान्य केले. आणि बर्निकवरचा अपवाद नष्ट करून तो अमेरिकेला गेला. लोना ही त्याची बहीणही त्याच्यावरच्या मायेमुळे त्याच्याबरोबर गेली. त्यानंतर कारखान्याल जरा तोटा झाला, सावकार तगादा करू लागले तेव्हा जोहानने तिजोरीतून फार मोठी रक्कम लांबविली अशी वदंता उठवून बर्निंकने आपला बचाव केला.
 पंधरा वर्षांनी जोहान व लोना परत आली तेव्हाच रेल्वेचे हे प्रकरण चालू होते. ते गेल्यावर गावात वर्निकने त्यांची इतकी बदनामी केली होती की, आता सभ्य घरात त्यांचा नामोच्चार करणेही पाप मानले जात होते. हळूहळू लोना व जोहान यांच्या हे ध्यानात आले तेव्हा त्यांनी सत्य प्रकाराला वाचा फोडण्याचे ठरविले. तेव्हा बर्निकने त्यांच्याशी मोठा कुशल युक्तिवाद केला. तो म्हणाला, आज या गावाच्या नीतीच्या व धर्माचा मी आधारस्तंभ आहे. सत्य ते सांगून मला तुम्ही बदनाम केलेत तर गावाला मोठा धक्का बसेल व त्यांचा नीतिधर्मही बिघडेल. सत्य तुम्हीं तसेच लपवून ठेविलेत तर तुमचीच फक्त अपकीर्ती होईल. पण सर्व समाजाच्या कल्याणासाठी व्यक्तीला असे बळी जाण्यास हरकत नाही !
 उच्च तत्त्वांची विकृती जमीं बेंथाम, मिल यांची बहुसंख्यांचे सुख- पुष्कळांचे पुष्कळ सुख- ही नीतिनिर्णयांची कसोटी होती. तिची विकृती केली तर काय होईल याचे हे मोठे सुंदर चित्र इब्सेनने रंगविले आहे. वर्निकच्या घरात त्याच्या भागीदाराच्या घरात सर्वत्र नीती, समाजसेवा, उदात्त चारित्र्य यांचे पाढे

३२
साहित्यातील जीवनभाष्य