पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणालाच होता, 'हे बघ सुभानदादा, हा पोऱ्या असा तसा नाही राहयचा. एक दिवस सरदार होणार, सरदार !' जिव्या, यम्या हे याच वर्गातले लोक. हे कोकणातले हेटकरी होते. पण त्यांच्या अंगचे गुण पाहंताच त्यांना महाराजांनी वर उचलले. येसाजी, तानाजी हे नवे सरदार शेतकरी वर्गातून महाराजांनी निर्माण केले हे इतिहासच सांगतो आहे.
 सरदारवर्ग स्वराज्याच्या कार्यापासून कसा अलिप्त होता ते रंगराव अप्पा व रामदेवराव यांच्या व्यक्तिरेखांच्याद्वारे हरिभाऊंनी उत्तम रीतीने दाखविले होते. 'रंगराव अप्पांची दीर्घ काळची सेवा ध्यानात न घेता, बादशहाने त्यांना कैद करून त्यांचा अपमान केला; तेव्हा निराश होऊन त्यांनी ठरविले काय तर काशीला निघून जावयाचे. तो त्यांचा धर्म ! त्यांचा स्वराज्याशी काही संबंध नव्हता. नानासाहेब शिवाजीराजांकडे गेला म्हणून आपला कारटा मेला असे ते म्हणत. राजांनी सुलतानगड काबीज केल्यावर त्यांचा मान राखला आणि आपल्या पक्षाला मिळण्याची त्यांना विनंती केली. पण त्यांच्या लेखी ते पाप होते, तो स्वामिद्रोह होता! रामदेवरावांना तसे वाटत नव्हते. सयदुल्लाखानाने पत्नीला बादशहाच्या जनानखान्यात घातले म्हणून ते सूडभावनेने नुसते जळत होते. राजांनी सुलतानगड घेतला त्यावेळी त्यांना सर्व वार्ता त्यांनीच पुरविली होती. डावपेच कसे लढवावे हे त्यांनीच सांगितले होते. पण यावेळी शिवबाराजांच्या मनांतला हेतू काय होता हे माहीत असूनही ते त्यांना येऊन मिळाले नाहीत. त्यांनी पुरविलेल्या माहितीचा राजांनी हवा तर उपयोग करून घ्यावा, रामदेवरावांना त्यांच्या कार्याचे सोयरसुतक काही नाही. मग त्याचे कार्य काय ? तर सयदुल्लाखानाला ठार मारणे, सूड उगविणे. वास्तविक सुलतानगड घेण्याने ते साध्य होतच होते. पण स्वराज्यापासून रामदेवराव अलिप्त होते. 'आपली विटंबना म्हणजे सर्व मराठ्यांची विटंबना, आपल्या पत्नीप्रमाणेच सर्व महाराष्ट्राच्या कुलस्त्रिया बळी पडत आहेत, त्यांचे रक्षण करणे हा आपला धर्म होय, हे त्यांच्या मनातही आले नाही. ती जाणीव महाराष्ट्रात निर्माण करणे हीच क्रान्ती होय. हीच नवी मराठी संस्कृती होय.
 राजस्थानात अशी क्रान्ती कोणी केलीच नाही. उदेपूर, जयपूर, बुंदी, कोटा, अजमीर, जोधपूर येथले सर्व राजे आपापल्या उच्च वंशाच्या अभिमानात बेहोष होते. प्रत्येक जण दुसऱ्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानीत होता आणि सर्व मोगलांपुढे नमत होते. 'रूपनगरची राजकन्या' या कादंबरीत या रजपूत मनोवृत्तीचे हरिभाऊंनी उत्तम चित्रण केले आहे. या राजकन्येला औरंगजेबाने मागणी घातली होती. त्याप्रसंगी राजसिंहाने थोडे संघटित सामर्थ्य निर्माण करताच औरंगजेबाचा रजपुतांना सहज पराभव करता आला. पण यावरून अखिल राजस्थानची शक्ती एकवटावी, रजपूत तेवढा मेळवावा, असे कोणा राजा महाराजाच्या मनात आले नाही. 'रूपनगरची राजकन्या' या कादंबरीत सामान्य जनतेचा कोठे चुकूनसुद्धा संबंध येत नाही. आणि 'उषःकाल' मध्ये पानोपानी त्या महाशक्तीला मूर्त रूप देऊन शिवछत्रपतींनी तिच्या साह्याने स्वराज्याचा उषःकाल कसा क्षितिजावर आणला त्याचे वर्णन आपल्याला आढळते.

३०
साहित्यातील जीवनभाष्य