पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांना संताप आला होता. 'आमच्या कुळाला तू कलंक लावलास, एकदा बाट लागल्यानंतरही मला तोंड दाखवायला येतेस, त्यापेक्षा नरकात का नाही गेलीस?' अशी त्याने तिची निर्भर्त्सना केली. 'तसे काही असत तर मी जिवंत राहिलेच नसते' असे ती म्हणाली. पण त्याने ते ऐकले नाही. त्याचे एकच म्हणणे, 'रजपुतांचं खरं रक्त तुझ्या अंगी असेल तर आत्ताच्या आत्ता पलीकडच्या रानात जाऊन तोंड काळं कर!' पुढे गडावर गेल्यावर मेहेरजानने त्याला सांगून पाहिले. चंद्राबाई रणदुल्लाखानाकडे असताना ती मेहेरजानजवळच होती. 'तुमची पत्नी, निष्कलंक आहे याचा निर्वाळा मी देते,' असे तिने अनेक प्रकारे सांगितले, तेव्हा त्याचा संशय फिटला. पण मन अगदी साफ झाले नाही. शेवटी सुलतानगड महाराजांनी घेतल्यावर किल्ल्यावर समर्थांची स्वारी आली. तेव्हा नानासाहेब दर्शनास गेला. तेव्हा समर्थांनी आशीर्वाद देताना म्हटले, 'केली मात उत्तमच. पण साध्वीविषयी भलतेच तर्कवितर्क मनात आणू नयेत. त्यापासून कधीही कल्याण नाही.' या उद्गारांमुळे नानासाहेब चकित झाले आणि 'समर्थांची आज्ञा वंद्य आहे,' असे उद्गार त्यांच्या तोंडून निघाले.
 स्त्रीपांवित्र्याच्या अतिरेकी, अविवेकी कल्पनांचा पगडा, रजपूत वारशामुळे मराठ्यांच्या मनावर होता. तो समर्थांनी अशा रीतीने नष्ट करून टाकला व स्त्रीला थोडी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, असा हरिभाऊंचा आशय.
 जनता शक्ती मराठ्यांनी रजपुतांच्या शौर्याच्या कल्पना बदलल्या, त्यांची युद्धनीती त्याज्य ठरवून व्यावहारिक, वास्तव रणनीतीचा अवलंब केला आणि स्त्रीच्या पावित्र्याविषयीचा दृष्टीकोण पालटून त्याला उदार रूप दिले. यात सांस्कृतिक क्रान्ती आहेच. पण यापेक्षाही एक मोठी क्रान्ती मराठ्यांनी केली होती. तिचे रूप हरिभाऊंनी कसे स्पष्ट केले आहे ते पाहू. 'सामान्य जनांचा असंतोष हेच सर्व राज्य क्रान्त्याचे आदिकारण होय' असे त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. 'मराठा तेवढा मेळवावा' या समर्थांच्या संदेशाचे हेच सार आहे. शिवछत्रपतींचे हेच तत्त्वज्ञान होते. श्रीधर स्वामींच्याबरोबर चर्चा करताना ते म्हणत, 'आपल्या कार्याला सरदार लोकांचे साह्य फारसे होणार नाही. त्यांपैकी काही तरुण मिळाले तर मिळतील. पण बहुधा गरीब गुरीब लोकांवर आपण भिस्त ठेवली पाहिजे. सरदारांत आपसात तंटेबखेडे असून एकावर प्रसंग आली तर इतरांना त्यांचे काही वाटत नाही. आपली व आपल्याकुलाची दरबारी बडेजावी कशी होईल, इकडेच त्यांचे लक्ष असते. यामुळे कोणी कोणास मदत करील व सगळे मिळूनं मराठी राज्याची स्थापना करतील हा संभव दिसत नाही. तेव्हा आपण या जुन्या सरदारांचा नाद सोडून सामान्य जनातून नवे सरदार निर्माण केले पाहिजेत.' हे सर्व महाराजांनी कसे घडविले, सर्व महाराष्ट्रात सामान्य जनशक्ती त्यांनी कशी जागृत केली, याचे वर्णन अनेक ठिकाणी हरीभाऊंनी केले आहे, सावळ्या हे या जनशक्तीचे उत्तम प्रतीक आहे. सुभान्याला तो एकदा

संस्कृतिदर्शन
२९