पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राणत्याग करावयास हवा होता; तो न करता ती त्या विलासात राहिली याचा रामदेवरावांना अत्यंत संताप आला होता. म्हणून काजीच्या वेषात त्यांनी वाड्यात प्रवेश मिळवून तिला स्वतःच ठार मारण्याचा विचार केला. वास्तविक रंभावती ही सुखाने जिवंत राहिली नव्हती. 'तू जिवाचे बरेवाईट केलेस तर रामदेवरावांना आम्ही ठार मारू' अशी बादशहाने तिला धमकी दिली होती. व रामवदेरावांनी सयदुल्लाखानाला ठार मारल्याचे, आपल्या विटंबनेचा सूड उगविल्याचे कानांनी ऐकावे अशी तिची इच्छा होती. त्यामुळे पतीला ओळखताच ती म्हणाली, तुमच्या हातून मरण येण्याचे भाग्य मला मिळेल, असे स्वप्नातही मला वाटले नव्हते. पण तुम्ही आला आहात. तर आता आधी मला ठार मारून या नरकातून मुक्त करा.' ती असे म्हणाल्यामुळे रामदेवरावाचे मन डळमळले. पुढे सयदुल्लाखानाला त्याने ठार मारले व पुन्हा तो वाडयात आला. व 'मृत्यूला आता तयार हो, घे जहराचा घोट,' असे तिला म्हणाला. तिने सहजच विचारले, 'त्याला तुम्ही ठार मारलेत ना ?' त्यावर छद्मीपणाने हसून रामदेवराव म्हणाले, 'हो हो. का ? तुला वाईट वाटते का काय ?'
 या प्रश्नाने रंभावतीच्या मनाला अत्यंत वेदना झाल्या. जहराची कुपी तोंडाशी नेत ती म्हणाली, 'हो वाईट वाटते. पण ते अशासाठी की माझी परीक्षा तुम्हाला मुळीच झाली नाही. आता या घुटक्याने तरी होवो.'
 भारतातल्या स्त्रियांची आज हजारो वर्षाची ही तक्रार आहे. पतीसाठी त्या वनवास पतकरतात, सरणावर उड्या घेतात, मृत्यूला कवटाळतात. पण त्यांच्या मनाची परीक्षा त्यांच्या पुरुषांना होत नाही. सीतेवर रामचंद्रांनी गलिच्छ आरोप केले तेव्हा ती म्हणाली, 'माझं मन माझ्या स्वाधीन होतं ते तुम्हांला अर्पण केलं. पण मी अबला, माझं शरीर पराधीन, तिथे मी काय करणार?'
 नानासाहेबाची पत्नी, चंद्राबाई हिची हीच प्रार्थना होती की, आपली परीक्षा आपल्या पुरुषांना व्हावी. सुलतानगडावर बादशहाच्या हुकमाने सयदुल्लाखान येणार व गडकऱ्यांना- आपल्या श्वशुरांना कैद करून नेणार ही बातमी कळताच तिला आपले भवितव्य कळून चुकले. म्हणून तो येण्याच्या आतच पुरुषी वेष घेऊन एका मोलकरणीला बरोबर बेऊन ती गुप्तपणे माहेरी जाण्यास निघाली. पण दुर्दैवाने वाटेत ती रणदुल्लाखानाच्या हाती सापडली. सयदुल्लाखानाऐवजी गडकऱ्यांना कैद करून नेण्यास तो आला होता. तो मोठा भला गृहस्थ होता. रंगराव अप्पांचा मित्र होता. त्याने ही स्त्री आहे हे ओळखले होते. तरी तिला रंगरावांच्या स्वाधीन न करता, त्याने विजापुरास नेले. तेथे काही दिवसांनी त्याला पश्चात्ताप होऊन, तिच्या केसालाही धक्का न लावता, त्याने तिला सोडून दिले, त्याच वेळी विजापुराहून नानासाहेब परत येत होता. तिला वाटले, बरे झाले, धन्यांची सोबत झाली. पण परगृहवास घडलेली पत्नी अजून जिवंत राहिली याचा

२८
साहित्यातील जीवनभाष्य