पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होणारी नव्हे. येथे डावपेच केले पाहिजेत. तुम्हाला हे साधणार नाही.' 'आंधळ्या वैयक्तिक शौर्याने काही साधत नसते,' हाच महाराजांच्या मनातील आशय होता. विजापूरला जाण्याच्या प्रसंगी महाराजांनी पुन्हा त्याला हाचं उपदेश केला होता. ही कामे दंगामस्तीने होणारी नव्हेत. शत्रूच्या डोळ्यांत धूळ फेकून ती साधली पाहिजेत. सिद्धी होणार यात शंका नाही. पण आई जगदंबेने सांगितल्याप्रमाणे सावधपणा मात्र ठेवला पाहिजे.' पण नानासाहेबाला हे उमगलेच नाही. विजापूरला भुताटकीच्या घरात असताना, अहमदाच्या चिठीवर विश्वास ठेवून तो कसलीही सावधगिरी न घेता मध्यरात्री बाहेर एकटा गेला आणि त्याच्या जाळ्यात सापडला. औरंगजेबाने हरएक प्रसंगी रजपूत सरदारांना दग्याने मारले होते. पण हे ध्यानी ठेवून रजपूत कधी सावधपणे वागलेच नाहीत. नानासाहेब त्याच परंपरेतला होता. मराठ्यांनी प्रत्येक ठिकाणी चाणक्यनीतीचा अवलंब करून तोडीस तोड केली म्हणून त्यांना यशःप्राप्ती झाली. या त्यांच्या राजनीतीला 'शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होतसे, शक्तियुक्ती मिळे जेथे, तेथे श्रीमंत नांदती'– या तत्त्वाला मूर्तरूप देण्यासाठीच हरिभाऊंनी ही कादंबरी लिहिली असे दिसते.
 शक्तियुक्ती मिळे तेथे विजापूरचा एक सरदार सयदुल्लाखान याने रामदेवरावांना फसवून त्यांची स्त्री रंभावती हिला बादशहाच्या जनानखान्यात घातले होते. त्या कृत्याचा सूड घेण्याची प्रतिज्ञा रामदेवरावांनी केली होती. विजारपूचा दुसरा एक सरदार रणदुल्लाखान याची बहीण मेहेरजान ही एकदा सुलतानगडावर रंगराव अप्पा यांचेकडे येऊन राहिली होती. तिलाही तेथून पळवून नेऊन बादशहाच्या जनानखान्यात घालावी असा सयदुल्ला याचा नीच डाव होता. गडाखाली यासाठी त्याने दोनतीनशे लोक आणून ठेविले होते. रामदेवरावांनी ही सर्व वार्ता महाराजांना दिली. तेव्हा त्याला खालच्या खालीच दाबून टाकून त्याचा परवलीचा शब्द वापरून, त्याचेच लोक आपण आहोत, असे भासवून महाराजांनी किल्ल्यावर प्रवेश मिळविला व तेथील शिवंदीचा पराभव करून गड ताब्यात घेतला व सयदुल्लाचा डाव हाणून पाडला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ उभारली. शक्ति-युक्तीची मिळणी ती ही होय.
 स्त्रीची परीक्षा रजपुतांच्या आंधळ्या, आत्मघातकी व परधार्जिण्या राजनीतीचे स्वरूप, तिच्यामागे विवेक उभा करून, मराठ्यांनी ज्याप्रमाणे पालटून टाकले त्याचप्रमाणे स्त्रीच्या पावित्र्याविषयीच्या रजपुतांच्या अतिरेकी कल्पनाही पालटून त्यांना विवेकनिष्ठ रूप दिले. स्त्रीच्या शीलाविषयी नुसती शंका आली तरी राजपूत दृष्टीला ती भ्रष्ट वाटे. आणि तिला देहान्ताखेरीज दुसरा मार्ग नाही अशी त्यांची स्त्रीविषयक दृष्टी तारतम्यशून्य होती. सरदार रामदेवराव यांच्या पत्नीला सयदुल्लाखानाने बादशहाच्या जनानखान्यात घातले होते. तिला फसवून त्याने हा डाव साधला होता. पण तेथे गेल्यावर शील रक्षणासाठी तिने

संस्कृतिदर्शन
२७