पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आत्मबलिदान नसून निराशेने केलेला तो आत्मघात होता. स्त्रीच्या पावित्र्यासंबंधी रजपुतांच्या मनात अगदी अतिरेकी कल्पना होत्या. पण प्रत्यक्षात काय झाले? प्रत्येक रजपूत कुलकलंकित झाले. अशा रीतीने विवेक, सावधता, वास्तवदृष्टी यांच्या अभावी रजपुतांचे सर्व शौर्य, धैर्य, सर्व त्याग, सर्व पराक्रम वाया गेला आणि ते स्वातंत्र्य व पावित्र्य दोन्ही गमावून बसले.
 शिवछत्रपतींच्या पूर्वी मराठ्यांनी या रजपूत संस्कृतीचाच वारसा चालविला होता. म्हणून मुस्लीम आक्रमणापुढे त्यांनाही शरणागती पतकरावी लागली होती. पण छत्रपतींनी ही सर्व अविवेकी संस्कृती पालटून टाकली आणि सावधता, विवेक, युक्ती, वास्तवता यांची राजकारणाला जोड दिली. म्हणूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात त्यांना यश आले. बहुतेक इतिहासकारांनी मान्य केलेला हा सिद्धान्त हरिभाऊंनी उषःकालात साकार, सगुण केला आहे.
 सावधता सुल्तानगडचे किल्लेदार रंगराव अप्पा यांचा मुलगा नानासाहेब हा राजपूत संस्कृतीचा वारस आहे. अविवेकी साहस, वेसावध शौर्य यांचा हा मूर्तिमंत पुतळा आहे. मारुतीच्या आसनाखाली त्याला एका गुहेचे, तळघराचे द्वार दिसताच त्याने बेशक आत उडी झोकून दिली. यात त्याचा निघडेपणा दिसून आला. पण तशीच विवेकशून्यताही दिसली. रंगराव अप्पांना व त्याच्या पत्नीला मोंगलांनी धरून नेले त्या प्रसंगी त्याची हीच वृत्ती प्रगट झाली. 'याच पावली जाऊन ज्यांना व तिला सोडविणे अगर त्यापायी आपला प्राण देणे हे माझे मुख्य कर्तव्य होय' असे तो म्हणाला त्यावेळी श्रीधरस्वामींनी त्याला जे उत्तर दिले ते मराठ्यांनी जे परिवर्तन घडवून आणले त्याचे उत्तम निदर्शक आहे. ते म्हणाले 'अरे, असला वेडेपणाचा विचार करू नको. झाली ही विटंबना केवळ तुझी नाही. ती आपली सगळ्यांची, सगळ्या मराठ्यांची आहे. जो तुझा मानापमान तोच आमचा, हे तू पक्के समज.' एकाचा अपमान तोच सर्वांचा हे तत्त्व रजपुतांच्या इतिहासात प्रत्यक्षात कधीच आले नाही. 'रूपनगरची राजकन्या' ही हरिभाऊंची कादंबरी पहा, एका रजपुत कुळाचा अपमान झाला तर सर्वानी संघटित होऊन उठावे. रजपुत तेवढा मेळवावा' हे राजस्थानात घडत नाही. त्याची खंत सर्वाना वाटते. पण संघटनेची पथ्ये पाळण्यास ते तयार नाहीत. रजपुतांचे सर्व शौर्य वैयक्तिक होते. त्यांचा वैयक्तिक संताप होता. सामूहिक संताप ही संस्कृतीच भारतातून नष्ट झाली होती. महाराष्ट्राच्या उषःकाली ती निर्माण झाली. श्रीधरस्वामी हे समर्थांचे शिष्य त्यांच्या सर्व क्रान्तितत्त्वांचे प्रतिनिधी म्हणून ते या कादंबरीत उभे आहेत.
 श्रीधरस्वामींना विजापूरचा सरदार सर्जेखान याने पकडून नेले व पुरंदराव तळघरात तुरुंगात टाकले. त्यावेळी 'मी एकटा जाऊन त्यांना सोडवून आणतो' असे नानासाहेब म्हणू लागला. तेव्हा शिवाजीराजे त्यांना म्हणाले, 'पुरंदर किल्लयाची तुम्हांला माहिती नाही आणि तुम्ही ही कसली प्रतिज्ञा करता? प्रस्तुत गोष्ट केवळ मर्दुमकीने

२६
साहित्यातील जीवनभाष्य