पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रेया प्रेमाला इतके उज्ज्वल, इतके सात्विक रूप आले होते की, तिच्या केवळ दर्शनाने त्याला आनंद वाटें. आणि वेळ आली तर तिच्यासाठी प्राणार्पणही करावयाचे असे ठरविण्याइतकी अथांगता, गहनता, निरपेक्षता त्याला आली होती. आता तो समय प्राप्त झाला होता. लूसीवर प्रसंग आला होता. फ्रान्समध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. सर्वत्र उन्मत्त, अनिर्बंध, वेबंद, धुंद वातावरण होते. सिडने कार्टनने तुरुंगाच्या कोठडीत प्रवेश मिळविला, गुंगीचे औषध देऊन चार्लसला बेशुद्ध केले आणि मित्रांच्या साह्याने त्याला डॉ. मॅनेटकडे पोचविले व रूपसाम्याचा फायदा घेऊन आपण तेथे बसला. क्रान्तीला काय, नगाला नग हवा होता. तिने चार्लस समजूनच त्याला गिलोटिनवर बळी दिले! आणि कार्टन सुखाने बळी गेला. प्रेमासाठी !
 दोन रेखा भक्ती, प्रेम, सूडबुद्धी, खुनशीवृत्ती, असूया, वात्सल्य, या भावना मनुष्याला कशा प्रेरित करतात, त्याला अत्यंत उदात्त वा अत्यंत नीच अशा कृत्यांना कशा प्रवृत्त करतात हे दर्शविणें हाही जीवनभाष्याचाच एक भाग आहे. सिडने कार्टन व मॅडम डेफार्ज यांच्या रेखा काढून डिकन्सने प्रेम आणि सूडबुद्धी या प्रेरणांचे सामर्थ्य काय ते या कादंबरीत दाखविले आहे. सिडने कार्टन याच्या उदात्त प्रेमानें, त्याला प्रतिसाद मिळाला नाही तरी, आपल्या प्रेयसीच्या पतीचे प्राण वाचविण्यासाठी आणि पर्यायाने तिला सुखी करण्यासाठी आत्मबलिदान करण्यास त्याला प्रवृत्त केले. तर मॅडम डेफार्ज हिच्या सूडबुद्धीने तिचा सारासार विवेक नष्ट करून तिची बुद्धी इतकी विकृत करून टाकली की, खरा जुलमी, अत्याचारी सरदार एव्हरमांड जगातून नाहीसा झाल्यावर, आणि त्याच्या पुतण्यालाही देहदंडाची शिक्षा झाल्यावरही तिचा आत्मा शांत झाला नाही. त्याची निष्पाप पत्नी व त्याचे निरागस बालक यांचाही बळी घेतला पाहिजे, त्या एव्हरमांडच्या पापांसाठी त्यांनाही जबाबदार धरून त्यांनाही गिलोटिनखाली लोटले पाहिजे अशी घोर वासना तिच्या चित्तात होती. आणि ते दृश्य मोठे सुंदर होईल असे वाटण्याइतकी हृदयशून्य ती झाली होती. त्या सूडबुद्धीने तिला उलट्या काळजाची डाकीणच बनविले होते. ही डेफार्ज म्हणजे क्रान्तीचे एक प्रतीक होते.
 तत्त्वज्ञानाची निशा मानवी जीवनात आणखी एक सत्य डिकन्सने या कादंबरीत मूर्त केले आहे. स्वार्थ, हिंसा; अनाचार, काम, मोह, लोभादी वासना या मुळातच हानिकारक असतात. पण त्यांना तत्वज्ञानाचे, म्हणजे जुन्या भाषेत धर्माचे रूप लोकांनी चढविले की त्या शतपट भयानक होतात. जुनी राजवट नष्ट होऊन माणसांच्या पशुवासना फ्रेंच क्रान्तीत उसळून आल्या. एरवी त्या वासनांना लोकांनी वासनाच म्हटले असते व त्यांचा धिक्कार केला असता. पण आता स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसाठी हिंसा, अत्याचार, लूट, अवश्य आहेत, असे तत्त्वज्ञान या अत्याचारी लोकांनी रचले व मग त्यांच्या अत्याचारांना सीमा राहिली नाही. अशा वेळी माणसे पशुहूनही खाली जातात. एखादे दिवशी गिलोटिनवर बळी कमी गेले तर

२४
साहित्यातील जीवनभाष्य