पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभिमानच वाटेल आणि आपल्या कन्येला विधवा करून नातीला पोरकी करून. टाकण्यात त्याना अपरिमित आनंद होईल यात शंका नाही !
 चारपाच तासांपूर्वी आनंदाने पिसाट झालेले फ्रेंच नागरिक आता संतापाने पिसाट झाले. त्यांनी एकमुखाने चार्लसला मृत्यूची शिक्षा फर्मावली. चोवीस तासात ती अमलात यावयाची होती.
 लंडनमध्ये चार्लसवर राजद्रोहाचा, राष्ट्रद्रोहाचा आरोप आला होता. तेथे तो परकी मनुष्य होता. आरोप युद्धकाळात आला होता. तरी केवळ संशयाचा फायदा मिळून तो सुटला. पॅरिसमध्ये त्याच्यावर आरोप काय ? तर तो एक जुलमी, अत्याचारी सरदाराचा वारस होता. वास्तविक तो वारसाही त्याने राजीखुशीने सोडून दिला होता. तो फ्रान्सचा नागरिक होता. दुसऱ्या एका गरीब नागरिकाला वाचविण्याच्या हेतूने तो परत आला होता. ज्यांनी त्याच्यावर म्हणजे त्याच्या पूर्वजांवर पंचवीस तीस वर्षांपूर्वी, म्हणजे त्याच्या जन्माच्या आधी आरोप केला होता ते डॉ. मॅनेट यांनीच त्याच्या निर्दोषत्वाची ग्वाही दिली होती ! तरी स्वातंत्र्य, समता, बंधुता यांनी त्याचा बळी घेतला. व्यक्तीला तिच्या अपराधासाठीच फक्त जबाबदार धरावे. आप्त, नातेवाईक यांच्या अपराधासाठी धरू नये, ही संस्कृतीची पहिली पायरी होय. हेच खरे स्वातंत्र्य ! कायद्याचे राज्य हीच खरी समता. पण त्या स्वातंत्र्यसमतेच्या घोषकांनी ही संस्कृती उच्छेदून चार्लसचा बळी घेतला. आणि एवढ्यावरच भागले नव्हते. चार्लसची बायको व त्याची मुलगी याही एव्हरमोडवंशज असल्यामुळे त्यांचाही बळी घेतला पाहिजे, असे मॅडम डेफार्ज व तिचे मित्र यांनी ठरविले होते. चार्लस तुरुंगात होता तेव्हा लूसीने बाहेर उभी राहून तुरुंगाच्या कोठडीकडे पाहून अश्रू ढाळले होते. हात वर केला होता. हा भयंकर अपराध होता. आणि शिवाय लूसी व तिची मुलगी या दोघी सुंदर होत्या. गिलोटिनची सुरी त्यांच्या मानेत शिरली की ते दृश्य मोठे छान दिसेल, हाही एक मुद्दा होताच !
 पण त्या पिशाचांची ती घोर वासना अतृतच राहिली. लूसी व तिची कन्या चार्लससह आधीच निसटून गेल्या होत्या.
 बेबंद कारभार चार्लसची मुक्तता कशी झाली ? तोही त्या उन्मत्त, विवेकहीन, धुंद, बेहोष क्रान्तीच्या धुमाळीतलाच एक प्रकार. सिडने कार्टन हा चार्लसचा इंग्लंडमधील वकील स्ट्रायव्हर याचा मदतनीस थेट त्याच्यासारखाच दिसत होता, हे वर सांगितलेच आहे. हा माणूस चंगी, भंगी, दारूड्या, फटींग, निर्गल असा प्रथम होता. प्रारंभी जीवनात आलेल्या काही अपयशामुळे निराश होऊन तो अगदी वाहवला होता. त्याने सर्व आयुष्य वाया घालविले होते. पण डॉ. मॅनेट यांची कन्या लूसी हिला पाहून त्याच्या मनात प्रेमोद्भव झाला होता. ते सफल होणे शक्य नाही हे ब्याच्या ध्यानात येत होते. पण त्याने त्याला फार उदात्त रूप दिले होते. अगदी गुप्तपणे तिच्यावरचे प्रेम मनाच्या कोषात ठेवून तो वागत होता. त्याच्या मनात

संस्कृतिदर्शन
२३