पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अशा या न्यायपीठापुढे सव्वा वर्षांने चार्लसला उभे करण्यात आले. तेथे न्याय मिळेल अशी कोणाला आशा नव्हती. पण डॉ. मॅनेट यांची साक्ष झाली आणि सर्व पारडे फिरले. ते जुन्या राजवटीचे बळी होते. त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल आदर होता. त्यांनी लोकांना आवाहनही चांगले केले. त्याचा परिणाम होऊन चार्लस मुक्त झाला. पण तो मुक्त झाला तो कायद्याने किंवा पुराव्याने नव्हे ! त्याचे निर्दोषत्व सिद्ध झाले म्हणून नव्हे. कारण आधी त्याचा गुन्हा सिद्धच झाला नव्हता. तो मुक्त झाला तो डॉ. मॅनेट यांच्यामुळे आणि यातच गोम होती. तो मुक्त होताच लोकांत आनंद, हर्ष यांचा उन्माद संचारला. शेकडो लोकांनी त्याला न्यायसभेतच घेरलं, मिठ्या मारल्या, पाठीवर धन्यवाद दिले. ते इतके की तो गुदमरून जाण्याची वेळ आली. मग त्यांनी एका खुर्चीवर बसवून त्याला मिरवीत त्याच्या घरी नेले. वाटेने ते ओरडत होते. किंकाळत होते, नाचत होते, टोप्या उडवीत होते. डॉ. मॅनेटना त्याचीही भीती वाटत होती. सर्वत्र अतिरेक, तारतम्य शून्यता, पिसाटपणा ! परत जाताना त्याच खुर्चीवर लोकांनी एका मुलीला बसविले व स्वातंत्र्यदेवता म्हणून तिचा जयजयकार करीत ते त्या बेहोषीतच परत गेले. ही बेहोषी आनंदाची होती, हर्षाची होती. पण तरीही ती भयप्रद होती.
 आणि तसा प्रत्ययही आला. सुटका झाल्याचा चार्लसचा आनंद क्षणिक ठरला. दोन तासातच त्याला पुन्हा पकडण्यात आले. डॉ. मॅनेट यांनी तुरुंगात असताना पंचवीस तीस वर्षांपूर्वी एरव्हमॉड बंधूंनी आपला कसा छळ केला, कसा घोर अन्याय केला ते लिहून ठेविले होते. आणि शेवटी एव्हरमांड बंधू, त्यांचे पुत्रपौत्र, वंशज यांना परमेश्वराने व लोकांनी या पापकृत्याचा जाब विचारावा, असा तळतळाट व्यक्त केला होता. डेफार्ज हा डॉ. मॅनेट यांचा जुना मित्र. त्यालाच तुरुंगात ते पत्र सापडले होते. त्याची बायको मॅडम डेफार्ज ही मूर्तिमंत कृत्या होती. तिच्याच बहिणीवर एव्हरमांडने अत्याचार केला होता. त्यामुळे ती सूडासाठी जळत होती. ही सूडबुद्धी ठीक होती. पण आता ते एव्हरमांड बंधू मारले गेले होते. त्यांची जिंदगी खालसा झाली होती. चार्लसने प्रथमपासूनच त्या जिंदगीशी संबंध तोडला होता. आणि आता तो डॉ. मॅनेट यांचा- तिच्या प्रमाणेच एव्हरमांडच्या हिंस्त्र वासनेला बळी पडलेल्या एका गृहस्थाचा- जावई झाला होता. त्याची बायको जन्माने फ्रान्सची नागरिक होती. पण याचे मॅडम डेफार्जला काही नव्हते. ती आंधळी झाली होती. इंग्लंडमध्ये अशा चार्लस नामक गृहस्थाला अटक करण्याचेसुद्धा कोणाच्या मनात आले नसते. तसे कोणी म्हटले असते तर त्याचे हसे झाले असते. पण हा फ्रान्स देश होता. चार्लस हा एव्हरमांडचा पुतण्या होता एवढे पुरेसे होते. आणि डॉ. मॅनेट यांनीच त्यांच्यावर आरोप केला होता ! मग आणखी काय पाहिजे? न्यायाधिशानेच जाहीर केले की डॉ. मॅनेट हे आपल्या प्रजासत्ताकाचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. तेव्हा त्या सरदार वंशाची पाळेमुळे खणून काढण्यात त्यांना

२२
साहित्यातील जीवनभाष्य