पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोंधळला. नेमके सांगू शके ना. यामुळे पंचांनी चार्लसला निर्दोषी ठरविले व न्यायाधिशाने ते मान्य करून त्याला मुक्त केले. खटला ऐकण्यास गर्दी खूप जमली होती. पण न्यायासनाचा निकाल धुडकावून लावून कायदा हाती घेण्याची प्रवृत्ती लोकांनी दाखविली नाही. कायद्याचा निकाल सर्वांनी शांतपणे मान्य केला. न्यायालयाच्या आवारातच चार्लसच्या मित्रांनी, आप्तांनी त्याचे मृत्यूच्या दाढेतून सुटल्याबद्दल अभिनंदन केले- त्यांना भीती वाटली नाही.
 या उलट फ्रान्समधल्या खटल्याची तऱ्हा. तेथे क्रान्तीची धुमाळी पेटली होती. लोकराज्य स्थापन झाले होते. या मधल्या अवधीत डॉ. मॅनेट यांच्या मुलीशी लूसीशी- चार्लसचे लग्न होऊन त्याला एक मुलगीही झाली होती. फ्रान्समध्ये पिसाट झालेल्या क्रान्तिकारकांनी राजाला फाशी दिला होता. सरदारांचा निःपात केला होता. पण नंतर स्थिर राज्य स्थापावयाचे सोडून त्यांनी भीषण हत्याकांड चालविले होते. जे बलदंड होते, गुंड होते, सैतान होते ते व त्यांच्या संसर्गाने सर्व लोक केवळ संशयावरून वाटेल त्याला धरीत, चौकशी सारखे काही करीत व त्याची कत्तल करीत. लहान नाही मोठा नाही, स्त्री नाही पुरुष नाही, बाल नाही वृद्ध नाही. सर्वत्र समता! इंग्लंडमध्ये संशयाचा फायदा मिळून आरोपी मुक्त होई. फ्रान्समध्ये संशयावरून त्याचा शिरच्छेद होई. अशी स्थिती असताना चार्लसच्या लहानपणच्या एका नोकराचे त्याला पत्र आले. तो त्या पिशाच्यांच्या हाती सापडला होता. आणि 'तुम्ही येऊन माझ्या बाजूने रदबदली केलीत तर माझा जीव वाचेल, तेव्हा तुम्ही ताबडतोब पॅरीसला या,' असे त्याने पत्रात विनविले होते. फ्रान्समध्ये यावेळी जाण्यात धोका होता. पण चार्लसला वाटले की, आपण एव्हरमाड जिंदगीचा त्याग केला आहे, अत्याचारात कधी भाग घेतला नाही, जनतेशी सहानुभूतीच दाखवली आहे. तेव्हा आपल्याला धोका नाही. पण फ्रान्समध्ये पाऊल टाकताच त्याला एव्हरमांड म्हणून क्रान्तिकारकांनी पकडले व तुरुंगात डांबून टाकले. ती दुष्ट वार्ता कळताच डॉ. मॅनेट मुलीला व नातीला घेऊन जावयाला सोडविण्याची खटपट करण्यास पॅरिसला आले. अन्यायाने जुन्या राजवटीने त्यांना १५|२० वर्षे तुरुंगात ठेविले होते. आता ती राजवट नष्ट झाली होती. म्हणून क्रान्तिकारकात त्यांना मान होता, मोठी प्रतिष्ठा होती. जनतेलाही त्यांच्याबद्दल सहानुभूती होती. त्यामुळे आपण चार्लसला निश्चित सोडवू असे त्यांना वाटत होते. पण वर्ष सवा वर्ष त्याच्यावरचा खटला चालूच झाला नाही. आणि त्यानंतर तो चालला, तो कसा ?
 डिकन्स म्हणतो, ती न्याय सत्ता नव्हती, अन्यायसत्ता होती, तेथे कामाला पध्दत वा शिस्त नव्हती. कायदा, नियम, संकेत सर्व गुंडाळून ठेवून राक्षसी सूडबुध्दी, तेथे थैमान घालीत होती. पंच हे लांडगे असून त्यांच्यापुढे या हरणाला उभे केले होते, सर्वत्र गलका होता. कोणी ओरडत होते. अनेक लोक एकदम उभे राहून बोलत होते. न्यायाधिशांनी घंटा वाजविली तर ते चक्क म्हणत, घंटेला विचारतो कोण?

संस्कृतिदर्शन
२१