पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समोर घडत असल्याचा भास होतो. साहित्याचे हेच वैशिष्ठय आहे. इतिहासाला हे पुननिर्मितीचे सामर्थ्य नाही, अर्थात ही पुनर्निर्मिती साहित्यिकाच्या मनःकोषातून होत असल्यामुळे मूळ घटनेचा त्याला जो अर्थ प्रतीत झाला त्याच्या अनुरोधाने तो ही सृष्टी निर्मीत असतो, तिची रचना करीत असतो. क्रान्तीच्या वर्णनातील तपशील- घडामोडी संबंधीचा, व्यक्तीसंबंधीचा सर्व तपशील आपण अत्यंत विश्वसनीय साधनांवरून पडताळून पाहिलेला आहे, असे डिकन्स सांगतो. आणि जबाबदार साहित्यिक हे करीतच असतो. पण ते घटनांसंबंधी, मूळ वस्तूसंबंधी होय. त्या वस्तूचा जो अर्थ तो लावतो तो सर्वस्वी त्याचा असतो. तो त्या घटनेची जी मीमांसा करतो ती त्याची असते. आणि यातच साहित्याचे साहित्यत्व आहे.
 लंडन व पॅरिस 'दोन नगरींची कथा' असे डिकन्सच्या या कादंबरीचे नाव आहे. पण कादंबरी वाचताना असे ध्यानात येते की, ही दोन संस्कृतींची कथा आहे. फ्रेंच राज्यक्रान्तीची कथा सांगावी असा डिकन्सचा मूळ हेतू. आणि कथेचा प्रधान विषय तोच आहे. पण ती कथा सांगताना फ्रेंच व इंग्लिश या दोन संस्कृतींची कथा डिकन्सने निवेदिली आहे. पॅरिस व लंडन या दोन नगरी म्हणजे या दोन संस्कृतींची प्रतीके आहेत. आणि त्या दृष्टीने पाहता 'दोन नगरींची कथा' हे नाव अगदी अन्वर्धक आहे. या कथेत जे फ्रेंच लोक दिसतात ते कसे आहेत? क्रान्तीच्या समंधाने ते झपाटलेले आहेत. न्याय, विवेक, सारासार विचार, यांची त्यांनी रजा घेतलेली आहे. क्रान्तीपूर्वी कमालीची विषमता, अन्याय, जुलूम, अत्याचार, उन्मत्तता, मदांधता, स्वार्थ, यांचे राज्य होते. ते नष्ट करण्यासाठी हे लोक बद्धपरिकर झाले होते. त्या ठायी समता, बंधुता, स्वातंत्र्य यांची स्थापना करावी असे त्यांचे उद्दिष्ट होते. पण अन्याय, विषमता यांवर घाव घालता घालता तेच विष त्यांच्या डोक्यात इतके चढले की ते लोक अगदी पिसाट होऊन गेले आणि जी विषमता, जो अन्याय, जे अत्याचार नष्ट करण्यासाठी ते निघाले होते त्यांपेक्षा भयानक अत्याचार व अन्याय ते करू लागले. क्रौर्य, रक्तपात, कत्तली, हत्याकांड हीच त्यांची प्रकृती होऊन बसली. पूर्वी माणसांचे अन्यायाने खून होत, पण राजे, सरदार ते खून स्वार्थासाठी करीत. आणि ते लपविण्याचा प्रयत्न करीत. आता समता, बंधुता, स्वातंत्र्य यांचा घोष करणारे हे क्रान्तिकारक कत्तल, हत्यांकाड यांतच आनंद मानू लागले. दुसऱ्या काही स्वार्थासाठी हत्या हे कत्तलीचे रूप गेले आणि कत्तलीच्या आनंदासाठी कत्तल, असे तिला रूप आले. माणसे अशी शुद्ध पिशाच्चे झाली होती. त्यांची माथी भडकली होती. डोळे फिरले होते. आणि न्याय, विवेक, सौजन्य, साधुत्व यांचीच त्यांनी होळी चालविली होती. ही फ्रेंच संस्कृती! या उलट इंग्लिश संस्कृती पहा. ते लोक विवेकी होते. त्या युद्धकाळातही त्यांनी आपले माथे जागी ठेवले होते. त्या वेळी अमेरिकेशी इंग्रजांचे युद्ध चालू होते. तरीही न्यायबुद्धी, विवेक, समतोल, सारासार यांना त्यांनी हद्दपार केले नव्हते.
 चार्लस डानें याच्यावर इंग्लंडमध्ये खटला झाला होता. पुढे क्रान्तीच्या

संस्कृतिदर्शन
१९