पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे होय. भोगवृत्ती, व्यभिचार, क्रौर्य, मदांधता, निग्रह, संयम यांचा अभाव, चारित्र्यहीनता, जुलूम, विषमता, अन्याय यांनी रोमन साम्राज्य हादरून डळमळू लागले होते. अशावेळी त्याग, सेवा, सात्विकता, दया, क्षमा, प्रेम, औदार्य या गुणांनी संपन्न असा खिस्ती धर्म लोकांना आकृष्ट करू लागला, हा विचार लेखकाला सांगावयाचा आहे. त्यासाठी अस्तोन्मुख व उदयोन्मुख अशा या दोन संस्कृतीची चित्रे एका शेजारी एक अशी उभी करून त्याने वाचकांना त्यांचे मूल्यमापन करावयास संधी दिली आहे. या मूल्यमापनातून निघणारा जो तात्त्विक सिद्धान्त त्याने या सर्व घटनाप्रसंगांना एकसंध केले आहे. या काळाचा इतिहास वाचताना लेखकाला हा सिध्दान्त स्फुरला, हे तत्त्व ध्यानात आले आणि मग त्याच्या पूर्तीकरणासाठी अवश्य ते प्रसंग, अवश्य त्या व्यक्ती, त्यांचे विचार विकार हे मूळद्रव्य घेऊन त्याचे एक रसायन करून त्याने त्या मुशीत ते ओतले व ही सुंदर कलाकृती निर्माण केली. सहज पाहणाराला ती एक रम्य कथा दिसते. तिच्यामागले सूत्र दिसत नाही. आणि त्यातच कवीच्या कलेचे यश आहे. पुष्पहारामध्ये पाहणाराला फक्त फुले दिसावी. त्यांचा सुगंध यावा पण दर फुलाला, पानाला, कळीला वेढणारा, भेदून जाणारा दोरा दिसू नये, असे होण्यातच पुष्पहाराची शोभा आहे. जीवनभाष्य हे काव्यसौंदर्याचे सर्व नियम पाळून केले पाहिजे असे जे मॅथ्यू अर्नाल्डने म्हटले आहे त्याचा हाच अर्थ आहे. सायंकेविग्जने ते सर्व नियम बरोबर पाळले आहेत. तो स्वतः कोठेच प्रगट होत नाही, उपदेश करीत नाही, विवेचन करीत नाही. कादंबरीतल्या व्यक्तीच्या मुखाने तो बोलत आहे असा कोठे संशयही येऊ देत नाही. पीटर पॉल, पेट्रोनियस, व्हिनिशियस, नीरो, या व्यक्तींची तो कथा सांगतो. त्यांच्या विकारविचारांचे, त्यांच्या कृत्यांचे, आचारांचे, घरादारांचे वर्णन करतो. पण त्यांतूनच दर पावलाला या दोन संस्कृतीचे भिन्न रूप दर वेळी आपल्याला प्रतीत होत असते. रोमन साम्राज्याचा अधःपात व ख्रिस्तीधर्माचा उदय या जगाच्या इतिहासातल्या अत्यंत मोठ्या व महत्त्वाच्या घटना आहेत. त्या तत्कालीन व्यक्तींच्या विकारविचारांतून मूर्त करून सायंकेविग्ज याने त्यांवर जे भाष्य केले आहे त्याला साहित्यक्षेत्रात खरोखर तोड नाही.
 इंग्लिश आणि फ्रेंच 'ए टेल ऑफ टू सिटीज' या कादंवरीला डिकन्सने एक लहानशी प्रस्तावना जोडली आहे. 'फ्रेंच राज्यक्रान्ती या महाभयंकर घटनेचा अर्थ आकळण्यास वाचकांना थोडे साह्य या कथेमुळे होईल, अशी मला आशा आहे,' असे तीत त्याने म्हटले आहे. प्रसिद्ध पंडित कार्लाईल याने फ्रेंच राज्यक्रान्तीचा इतिहास लिहिला आहे. त्यातील तत्त्वज्ञानात या कादंबरीमुळे भर पडेल असे मात्र नाही असे डिकन्स म्हणतो. पण टीकाकारांच्या मते या कादंबरीमुळे त्या क्रान्तीचे चित्र जसे स्पष्ट उभे रहाते तसे कोणत्याही इतिहासाने उभे राहणार नाही. याचे कारण असे की, डिकन्सने त्या घटनेची पुनर्निर्मितीच केली आहे. त्यामुळे फ्रेंच फ्रान्ती डोळ्यां

१८
साहित्यातील जीवनभाष्य