पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "म्हणजे तू ख्रिश्चन होण्याचा विचार करीत आहेस तर !!
 'तसं मनात येतं, पण माझी सर्व मूळ प्रकृती अजून त्याविरुद्ध खवळून उठते'
 पण लिजियाच्या त्याच्या वरचेवर भेटी होत, खिश्चनांशी चर्चा होई, त्यामुळे ही त्याची मूळ प्रकृतीही हळूहळू बदलू लागली. त्याने घरातल्या सर्व गुलामांना मुक्त केले. व त्यांच्याशी तो जास्त दयाबुद्धीने वागू लागला. मनोनिग्रह, संयम यांची सर्व रोमनाप्रमाणे तो पूर्वी चेष्टा करीत असे. आता त्यात एक निराळे सामर्थ्य आहे त्याच्या ध्यानी आले. आणि शेवटी पूर्ण परिवर्तन होऊन त्याने खिश्चन व्हावयाचे ठरविले.
 भावनांचा प्रभाव व्हिनिशियस या रोमन सरदाराचे मतपरिवर्तन दाखविताना सायंकेव्हिग्ज याने मानवी जीवनाविषयीचा एक फार महत्त्वाचा सिध्दान्त सांगितला आहे. व्यक्तीचे मतपरिवर्तन होते ते विचाराने, बुद्धीने, तर्कवशतेने, प्रमाणांनी पुराव्यांनी, सिध्दान्तांनी सहसा होत नाही. विकार, भावना यांनी ते होत असते. व्हिनिशियसला प्रारंभी ख्रिस्ती धर्माचा अत्यंत तिरस्कार वाटे. पुढे त्याचे हे मत हळूहळू बदलले. याला लिजियावरील त्याचे प्रेम हेच सर्वस्वी कारण होते. आरंभी त्याच्या मनात केवळ वासनांच होती. पण तिची शांत सात्त्विक मुद्रा पाहून त्याच्या अंतरात बदल होऊ लागला व हे तिचे सात्त्विक तेज हा ख्रिस्ती धर्माचा प्रभाव असावा असे त्याला वाटू लागले. तरीही दीर्घकाळपर्यंत 'खाइस्ट हा तुझा देव आहे म्हणून मी त्याला मानतो,' असेच तो म्हणत असे. त्याने गुलामांना मुक्त केले, तो त्यांच्याशी दयाबुध्दीने वागू लागला. ते यामुळे लिजियाला आनंद होईल म्हणून. हे चालू असताना तो पीटरपॉल यांशी ख्रिस्तीधर्मतत्त्वांची चर्चा करीत असे. आणि पुढे पुढे ती तत्त्वे श्रेष्ठ आहेत हे त्याला मान्यही होऊ लागले. पण त्याच्या मनाची भूमिका लिजियावरील प्रेमामुळे अनुकूल झालेली होती म्हणूनच त्याला ती तत्त्वे पटू लागली. आणि त्या तत्त्वांच्या इतके जवळ आल्यानंतरही तिची प्राप्ती झाली नसती तर त्याने खिश्चन धर्माचा स्वीकार केला नसता. माणसांचे परिवर्तन प्रामुख्याने भावनांनी होत असते हेच खरे. त्यातही प्रेम या भावनेचे सामर्थ्य या दृष्टीने विशेषच आहे. पेट्रोनियस हा खिस्ती झाला नाही. पण त्याच्यातही बरेच परिवर्तन झाले होते. तेही युनीसवरील प्रेमामुळे! त्याने स्वमुखानेच हे दोनतीनदा सांगितले आहे. व्हिनिशियस व पेट्रोनियस यांच्या जीवनातले हे सर्वच प्रसंग लेखकाने असे अर्थगर्भ करून टाकले आहेत.
 युनिटीचा अर्थ को व्हॅडीस या कादंबरीतील हे विविध प्रसंग पाहिले म्हणजे गॅरॉड याने ॲरिस्टॉटलच्या 'युनिटी' या तत्त्वाचा जो अर्थ केला आहे तो कसा यथायोग्य आहे, हे आपल्या ध्यानात येते. ते अनेक प्रसंग, त्या घटना, त्या व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांचे विकार, त्यांची भाषणे हे सर्व कोणत्या एका सूत्रांने गुंफिले गेले असेल तर ते म्हणजे लेखकाचे ख्रिस्ती धर्माच्या उदयासंबंधीचे तत्वज्ञान

संस्कृतिदर्शन
१७