पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि अशा घरात ती माझी लिजिया वाढल्यामुळे तीही त्या पांपोनिया सारखीच शीलवती झाली आहे.! मामा, त्यांच्या घरात गुलाम आहेत पण त्यांना बेड्या 'घातलेल्या नसतात!'
 यानंतर पेट्रोनियस व व्हिनिशयस प्लॉटियसच्या घरी गेले. तेथे लिजिया आणि पांपोनिया यांना पाहून पेट्रोनियसही थोडा विस्मित झाला. स्त्रियांचे शील, सद्गुण याची तो चेष्टा करी, पण पांपोनियाला पाहताच तिच्या सात्विक, शांत मुद्रेमुळे त्याला तिच्याबद्दल आदर वाटू लागला. कोणत्याही मोठया घराण्यातील स्त्रीचा असा प्रभाव त्याच्यावर पडला नव्हता. त्याने तिला तसे बोलूनही दाखविले, परत येताना तो व्हिनिशीयसला म्हणाला, 'तुझी निवड उत्तम आहे. लिजिया मूर्तिमंत उषा आहे. अप्सरा आहे.'
 'पण ती मला कशी मिळणार ?'
 'त्यात काय आहे ? आपण तिला विकत घेऊ ?'
 'नाही, ती गुलाम नाही. प्लॉटियस आणि पांपोनिया तिला मुलगीच मानतात. तेव्हा तिला विकत घेता येणार नाही. पण हरकत नाही. मी तिला मागणी घालीन. पत्नी म्हणून तिला आणीन !'
 'असा वेडेपणा करू नको. जित वन्य जमातीतील कन्यांशी रोमन सरदार लग्न करीत नसतात. इतका खाली जाऊ नको. आपण काही मार्ग काढू.'
 पेट्रोनियसने सीझरचा हुकूम मिळवून लिजियाला प्लॉटियसच्या घरून राजवाड्यात नेऊन ठेविले. तेथून शिबिकेत बसवून व्हिनिशियसचे लोक तिला त्याच्या घरी नेत असताना खिश्चन लोकांनी तिला सोडवून त्यांच्या वस्तीत नेऊन ठेविले. व्हिनिशियस तेथून एका रोमन मल्लाच्या साहाय्याने तिला पळवून नेत असताना उरसस नावाच्या तिच्या भीमसेनी नोकराने त्या मल्लाला ठार केले. व्हिनिशीयसही त्यावेळी मरावयाचा, पण लिजियाने उरससला मना करून त्याचे प्राण वाचविले. जबर जखमी होऊन तो बेशुद्ध झाला होता; तेव्हा आपल्या घरात ठेवून तिने व तेथील खिश्चनांनी त्याची शुश्रूषा करून त्याला बरे केले. या वेळी जवळ जवळ महिनाभर व्हिनिशियस त्या खिश्चनांच्या घरी होता. त्याकाळात लिजिया, इतर खिश्चन लोक व त्यांचा धर्मगुरु पीटर यांच्या सेवाभाव, क्षमावृत्ती, ऋजुता इ. गुणांचा त्याच्या मनावर फार प्रभाव पडला.
 तो प्रथम शुद्धीवर आला तेव्हा आपल्याला ठार न मारता हे लोक आपली सेवा शुश्रूषा करीत आहेत, लिजिया तर अहोरात्र उशाशी बसली आहे, हे पाहून तो विस्मित झाला. आणि सर्वजण त्याचा अपराध विसरून त्याला आराम पडावा म्हणून प्रार्थना करीत आहेत, हे पाहून तर त्याची मती कुंठित झाली. त्याच्या रोमन संस्कृतीत हे बसतच नव्हते. शौर्य धैर्याने लढावे, सुरेख स्त्रियांना पळवून सुखविलास करावे आणि त्या प्रयत्नांत मारावे किवा मरावे; कोणी आघात केल्यास दुप्पट सूड घ्यावा, अशी त्याची रोमन वृत्ती होती. त्यामुळे खिश्चनांच्या ह्या क्षमासौजन्याचा त्याला विस्मय

संस्कृतिदर्शन
१५