पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 श्रीरामचंद्र व श्रीकृष्ण या दोन महापुरुषांच्या काळच्या भिन्न संस्कृतं चे, भिन्न धर्माचे, नीतीअनीतीच्या, कार्याकार्याच्या भिन्न निकषांचे दर्शन घडविण्यास त्यांच्याच तोलाचे दोन महाकवी भारतात जन्मले हा मोठा भाग्ययोग होय. साहित्यशास्त्रज्ञ म्हणतात त्याप्रमाणे धर्माधर्म, नीतिअनीती, हे काही मूळ मानवी प्रपंचात, त्या घटनांच्या मूळ अंगांत, कधीच समाविष्ट झालेले नसते. ते कवीच्या दृष्टीला दिसत असते. तो त्या दृष्टीने सर्व घटनांची संगती लावून काव्य रचतो. आणि त्याच्या दृष्टीतून आपण पाहू लागलो की, आपल्या दृष्टीलाही ज्ञानांजनाचा लाभ होऊन आपल्या नेत्रांचे उन्मीलन होते, त्या त्या काळच्या संस्कृतीचे आपल्याला सम्यक आकलन होते. महाकवी वाल्मीकी व व्यास यांनी हेच कार्य केले आहे.
 रोमन व खिश्चन संस्कृती हेन्रिक सायंकेविक्झ हा पोलंडचा नोबेल प्राइज -विजेता विख्यात कादंबरीकार. 'को व्हॅडिस,' ही त्याची कादंबरी. या कादंबरीत नीरोच्या काळची अत्यंत अधोगामी झालेली, धर्मनीतिशून्य रोमन संस्कृती आणि त्याच काळची उदयोन्मुख खिश्चन संस्कृती यांचे अत्यंत मनोज्ञ असे दर्शन घडविलेले आहे. पेट्रोनियस हा एक चतुरस्र बुध्दीचा, अत्यंत रसिक पण तितकाच व्यवहारकुशल, समयज्ञ असा प्रौढ वयाचा रोमन सरदार आणि मार्कस व्हिनिशियस हा त्याचा शौर्य, धैर्य संपन्न, पराक्रमी असा भाचा दुसरा रोमन सरदार. यांच्या सहजसंवादातून पहिल्या एकदोन प्रकरणातच लेखकाने या दोन संकृतींचे ध्रुवभिन्न रूप ओझरते दाखविले आहे. लिजियन ही एक वन्य जमात होती. तिला रोमनानी जिंकले व तिच्या राजाची राणी व कन्या लिजिया यांना ओलीस म्हणून आणले. ऑलस प्लॉटियस हा दुसरा एक रोमन सरदार होता. पांपोनिया ग्रॅसियाना ही त्याची पत्नी लिजिया या राजकन्येला त्यांच्या घरी ठेवण्यात आले होते. मार्कस व्हिनिशियस याला रस्त्यात एकदा अपघात झाला. प्लॉटियसचे घर जवळच होते. म्हणून तेथे त्याला नेण्यात आले. बरा होइपर्यंत पंधरा दिवस तो तेथेच होता. तेथे लिजिया त्याच्या वारंवार दृष्टीस पडत होती. तिचे असामान्य रूपलावण्य पाहून तो तिच्यासाठी वेडा झाला होता. मामा आणि भाचा, पेट्रोनियस व व्हिनिशियस यांच्या संवादाचा हाच विषय होता. व्हिनिशियस म्हणाला, मामा, मी एका स्त्रीच्या प्रेमाने घायाळ झालो आहे ! वेडा झालो आहे.'
 'असं' सांग, सांग. सगळं सांग मला. त्या प्लॉटियसच्या घरी होतास तेव्हाची गोष्ट ? म्हणजे, त्याची बायको पॉपोनिया, तिच्यावर मन गेलं आहे काय तुझं ? मग कठिणच आहे. कारण दुर्दैवाची गोष्ट अशी की ती मोठी पतीव्रता आहे !'
 स्त्रियांचे पातिव्रत्य ही रोमन लोकांच्या लेखी दुर्दैवाची गोष्ट होती !'
 पण व्हिनिशियसच्या प्रेमाचा विषय पॉपोनिया नव्हती. तो म्हणाला, 'मामा, पांपोनिया! नव्हे. तिच्या घरी राहणारी ती राजकन्या लिजिया. पण ते प्लॉटियसचे घर जरा विचित्र आहे. तो पूर्व देशातला खिस्टस का कोण आहेना, त्याच्यावर प्लॉटियसची व पांपोनियाची भक्ती आहे. त्यामुळे त्या घरात सगळी माणसे-कोंबड्या देखील-सच्छील आहेत

१४
साहित्यातील जीवनभाष्य