पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या स्त्रीला पणाला लावण्याचा अधिकार पतीला आहे की नाही, देव श्रेष्ठ की उद्योग श्रेष्ठ- अशा अनंत प्रश्नांची महाभारतातले लोक चर्चा करतात. मांड्या मोडून मृत्युपंथाला लागलेला दुर्योधनही श्रीकृष्णांशी, 'तू मला अधर्माने मारलेस, तू जन्मापासून असाच कपटी आहेस ' इ. वाद घालतांना दिसतो. श्रीकृष्णांनी काही उत्तर दिल्यानंतर तो त्या स्थितीत प्रत्युत्तरही करतो.
 महाभारताचे वातावरण असे कर्माकर्मचिकित्सेचे, वादविवादाचे व समतेचे आहे. व्यास, भीष्म, नारद, श्रीकृष्ण यांसारखे श्रेष्ठ धर्मवेत्तेही तेथे नुसत्या आज्ञा करीत नाहीत; चर्चा करतात, वाद घालतात. त्या अर्थी पुत्र, बंधु, शिष्य, पत्नी यांची प्रतिष्ठा त्यांना मान्य होती, यात शंका नाही. समभूमिकेवर आल्यावाचून चर्चा होऊच शकणार नाही. आक्षेप, उत्तर, प्रत्युत्तर, खंडन, मंडन याला समतेवाचून अवसर राहणार नाही. तो अवसर महाभारतात विपुल होता. यावरून त्या संस्कृतीत समतेचे तत्त्व मान्य होते, असे दिसते. रामायणात तसे दिसत नाही. तेथे सर्वत्र आज्ञापालन आहे !
 रामायणातील अग्निशिखा पण ते आज्ञा देणे व ते आज्ञा पाळणे हे इतक्या उच्च भूमिकेवरून, श्रेष्ठ पातळीवरून रामायणात होते की खाली मान घालून आज्ञा पाळणाऱ्या व्यक्तींबद्दल आपल्या मनात अनादर तर निर्माण होत नाहीच, उल्ट असलेला आदर दुणावतो. व्यक्ती या दृष्टीने पाहता रामायणातल्या व्यक्ती महाभारतातल्या व्यक्तीपेक्षा फार श्रेष्ठ वाटतात. त्यांचा निर्धार, त्यांचा निग्रह, त्यांचा त्याग इतका असामान्य आहे की, त्यांच्या जवळ जाण्याची आपल्या सारख्या सामान्य माणसांना भीतीच वाटावी. आयते चालून आलेले राज्य सोडून भरत नंदिग्रामी जाऊन चौदा वर्षे देह जाळीत बसला होता! गृह व तरुण पत्नी यांचा त्याग करून लक्ष्मण चौदा वर्षे ज्येष्ठ बंधूबरोबर हाल अपेष्टा सहन करीत होता. आणि तो व्रतस्थ राहिला होता ! महाभारतात व्रतस्थ राहण्याची भाषाच नाही. अरण्यात हिंडताना किंवा तीर्थयात्रा करताना भीम, अर्जुन हे सहज दोन-चार बायका गोळा करून आणतात. राम किंवा लक्ष्मण यांना तसे करता आले नसते काय ? हिडिंबा भीमाकडे आली तेव्हा त्याने तिच्याशी विलास केले आणि शूर्पणखा लक्ष्मणाकडे आली तेव्हा त्याने तिचे नाककान कापले ! हे एकदोन प्रसंगांचे नाही. रामायण व महाभारत या काव्यात या दोन भिन्न वृत्ती नियमाने दिसतात. म्हणूनच हा संस्कृतीतला फरक आहे, असे वाटते. राम, कक्ष्मण, भरत, सीता, हनुमान ही माणसे अग्निशिखेसारखी नित्य प्रखर तेजाने दीप्त झालेली आहेत. महाभारतात अशी एकही व्यक्ती नाही. भीष्म तसे केव्हा केव्हा वाटतात. पण 'अर्थस्य पुरुषो दासः' हे मान्य करून त्यांनी लाचारी पतकरलेली पाहिली की रामायणाचे आगळेपण निश्चित जाणवते. महाभारतातली माणसे शूर आहेत, पराक्रमी आहेत, ध्येयनिष्ठ आहेत; पण त्यांचे रागलोभ, मोहमत्सर, आपणा सामान्य माणसासारखेच आहेत. ती माणसे स्खलनक्षम आहेत. रामायणातल्या माणसांचे तेज दाहक वाटते तसे यांचे वाटत नाही.

संस्कृतिदर्शन
१३