पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खपणार नाही. या माझ्या निर्णयाला जो विरोध करील त्याला मी शत्रू समजेन. लक्ष्मणा, उद्या सकाळी सीतेला घेऊन जा आणि वाल्मीकींच्या आश्रमात तिला सोडून परत ये.'
 वनवासगमनाचा निश्चय असो, वालिवधाचा निश्चय असो, कोणताही निश्चय असो, रामायणात तो एकट्याने करावयाचा असतो. वसिष्ठ, विश्वामित्र, भारद्वाज यांना जेव्हा दुसऱ्यांना काही उपदेश करावा असे वाटते तेव्हा ते फक्त उपदेश करतात. चर्चा करीत नाहीत. विश्वामित्राने दशरथाचे आधी वचन घेऊन मग त्याला राम लक्ष्मणांना माझ्या यज्ञाच्या रक्षणार्थ पाठव, असे सांगितले. दशरथाला ते मान्य होईना. तेव्हा वसिष्ठांनी 'वचन दिल्यानंतर ते मोडणे हा अधर्म होय, शिवाय राम समर्थ आहे, त्याला कोणी काही करू शकणार नाही, तेव्हां तू त्यांना पाठव' असा उपदेश केला व एक शब्दही वर न बोलता दशरथाने तो मान्य केला. तो चर्चा करीत बसला नाही ! वसिष्ठांनी चर्चेला कधीच अवसर दिला नसता ! रामायणात चर्चा नाही. असलीच तर अगदी अपवादाला.
 उलट महाभारतात चर्चेवाचून पान हलावयाचे नाही. भरतशत्रुघ्न लक्ष्मणांप्रमाणे भीमार्जुनही धर्मराजाचे धाकटे भाऊच होते. ते त्याच्या आज्ञेतही असत. पण चर्चा करुन ते त्याला हैराण करीत आणि कित्येक वेळा त्याला आपला निश्चय सोडण्यास भाग पाडीत ही चर्चा करताना ते विनीत भाषा वापरीत असेही नाही. युध्द संपल्यानंतर युधिष्ठिराला राज्याभिषेक करण्याचे ठरले. पण बांधववधाचे पातक हातून झाले असल्यामुळे आपण राज्यत्याग करून वनात जाणार, असे तो म्हणू लागला. तेव्हा भीम, अर्जुन आणि द्रौपदीही त्याच्यावर इतकी तुटून पडली की काही सोय नाही. 'धर्मराज, हे तुम्ही आधीच का नाही सांगितले ? मग तेव्हापासूनच आपण भिक्षा मागत राहिलो असतो,' असे भीम म्हणाला. तो आणखीही म्हणाला की, 'वेदांची अर्थशून्य घोकंपट्टी करणाऱ्या वैदिक ब्राह्मणासारखी तुझी बुद्धी नष्ट झाली आहे.' द्रौपदीनेही पतीला उपदेश केला की 'अहिंसा, मृदुता हा क्षत्रियांचा धर्म नाही. सज्जनांचे पालन आणि दुष्टांचे निर्दाळण हा तुमचा धर्म आहे.'
 तत्त्वापुढे महाभारतात ज्येष्ठ बंधूंची तर प्रतिष्ठा नाहीच पण गुरूचीही नाही. परशुराम भीष्मांना 'तू अंबेचे पाणिग्रहण कर' अशी अधिकाराने आज्ञा करू लागले तेव्हां भीष्मांनी प्रथम विनीतपणे, शिष्याच्या नम्रतेने, सांगून पाहिले. पण ते अधिक उणी भाषा करू लागताच भीष्म म्हणाले की, 'कार्याकार्य ज्याला समजत नाही त्या गुरुचाही त्याग करावा असे शास्त्र आहे !'
 समता प्रत्येक धर्मतत्त्वाविषयी, जीवनतत्त्वाविषयी महाभारतात वाद आहेत, वाग्युद्धे आहेत, चर्चा आहेत, कडवट उत्तरप्रत्युत्तरे आहेत. युद्ध करावे की करू नये; प्रतिज्ञेचे महत्त्व किती, शत्रूला कपटाने मारणे युक्त की अयुक्त, ब्राम्हणांनी क्षत्रियांची कामे करावी की न करावी, वर्ण हा गुणावरून ठरतो की जन्मावरून,

१२
साहित्यातील जीवनभाष्य