पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणे प्राप्त झाले. युधिष्ठिराला हे समजांवून सांगताना व पुढे जरासंधाशी बोलताना हेच कारण श्रीकृष्णांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
 महाभारतात श्रीकृष्णांप्रमाणेच नारद, व्यास, भीष्म यासारख्या धर्मवेत्त्यांनीही आणि इतरांनीही अनेक वेळा कर्माकर्म चिकित्सा केलेली आहे. पण धर्म हे समाजकल्याण निरपेक्ष असे काही तत्त्व आहे असे महाभारतात कोणी केव्हाही मानीत नाही. सत्य, अहिंसा, प्रतिज्ञापालन असे कोणतेही तत्त्व निरपेक्षपणे पाळावे असे कोणीही प्रतिपादन करीत नाही. प्रत्येक वेळी या तत्त्वपालनाने समाजहित साधले की नाही याची चिकित्सा करूनच निर्णय करावा, असे सर्वांनी मत दिले आहे. रामचंद्रांनी पित्राज्ञा पालनाचे तत्त्व या निकषावर घासून पहाण्यास नकार दिला होता. आपल्या या आज्ञापालनामुळे अनर्थ होईल, हे त्यांना दिसत होते. त्यांनी स्वतःच तसे म्हटले आहे. पण तरीही 'या धर्माचे मी उल्लंघन करू शकत नाही,' असेच ते म्हणाले. महाभारतात मात्र असे कोणताही तत्त्ववेत्ता म्हणत नाही. युधिष्ठिराच्या प्रश्नाला उत्तर देताना एकदा भीष्म म्हणाले, 'राजा, सत्यभाषण करणे हेच उत्तम होय. कारण सत्याहून दुसरे श्रेष्ठ असे काही नाही. पण राजा, हे ध्यानात ठेव की, पुष्कळवेळा सत्यामुळे अनेकांचा घात होतो. मग या वेळी निर्णय कसा करावा ? अरे लोकांच्या अभ्युदयासाठीच धर्म सांगितलेला आहे. त्यामुळे लोकांना उत्कर्षकारक तेच सत्य होय असा सिद्धान्त आहे.' धर्मव्याधाने ब्राह्मणाला उपदेश करतांना हाच विचार सांगितला आहे. 'यद् भूतहितं अत्यंतं तत् सत्यं इति धारणा ।' प्राण्यांना अत्यंत हितकारक असेल तेच सत्य असा निश्चय आहे.
 पित्राज्ञापालन, कुलप्रतिष्ठा हे निकष महाभारतात कोणी कधी सांगत नाहीत. ऐन युद्धाच्या घाईत अर्जुनाने धर्माधर्मवाद निर्माण केला तेव्हा श्रीकृष्णांनी, 'लोकसंग्रहासाठी तू युद्ध केले पाहिजेस' असे सांगितले. लोकप्रभव, समाजोन्नती हा निकष तेथेही त्यांनी दृष्टिआड केला नाही. हे महाभारतकाळच्या बदललेल्या समाजरचनेचे व संस्कृतीचे निदर्शक आहे.
 दर वेळेला चिकित्सा करूनच धर्माधर्म निश्चय करावयाचा अशी सर्वत्र प्रवृत्ती असल्यामुळे महाभारतात चर्चा, वादविवाद, संवाद, पूर्वपक्ष उत्तरपक्ष यांना भरती आलेली दिसते. रामायणात चर्चा नाहीत. तेथला श्रेष्ठ पुरुष क्षणार्धात आपल्या मताने निर्णय करतो व इतरांना तो निर्णय म्हणूनच सांगतो. त्यांच्याशी तो विचार-विनिमय कधीच करीत नाही. विचारांची देवाण घेवाण ही भाषाच रामायणाला मंजूर नाही. कारण तेथे धर्मतत्त्वे आधीच निश्चित झालेली आहेत.
 सीता त्यागासारखा गहन प्रश्न. श्रीरामचंद्रांना सीता निष्पाप आह हे स्वतःला पटलेले; पण लोकापवाद निर्माण झाला तेव्हा तिचा त्याग करावयाचा असा त्यांनी स्वमतानेच निर्णय घेतला आणि आपल्या तिन्ही भावांना बोलावून तो सांगून टाकला. आणि लगेच सर्वांना बजावले की, 'याविषयी माझ्याशी कोणी चर्चा केलेली मला.

संस्कृतिदर्शन
११