पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाषण केले त्यावरूनही कुलनिष्ठा हीच त्यांची कार्याकार्यनिर्णयाची कसोटी होती, हे स्पष्ट दिसते. ते सीतेला म्हणाले, "मी पराक्रम केला तो तुझ्यासाठी नाही. प्रख्यात असा जो माझा सूर्यवंश त्यावरचा कलंक धुवून काढण्यासाठी मी हा खटाटोप केला. आणि थोर कुलाचे नाव सांगणाऱ्या मला तुझा स्वीकार करणे शक्य नाही.' (युद्ध - ११५)
 धर्माचा निकष- लोकहित महाभारतात श्रीकृष्णांची कार्याकार्याची, धर्माची कसोटी अगदी भिन्न आहे, हे वर वर महाभारत चाळले तरी दिसून येईल. त्यांच्याकाळी समाजाचे जमातरूप जाऊन त्याला मोठे बृहद्रूप प्राप्त झाले होते. तेव्हा सर्व समाजाचा उत्कर्षापकर्ष हा त्यांचा धर्माधर्माचा निकष होता. श्रीकृष्णांनी धर्माची, सत्याची व्याख्या नेहमी याच धोरणाने केलेली आहे. 'गांडीव धनुष्याचा अवमान करील त्याचा मी वध करीन,' अशी अर्जुनाची प्रतिज्ञा होती. एकदा लढाईतील जखमांनी चिडलेल्या अवस्थेत धर्मराजानेच तसा अवमान केला. त्यावेळी अर्जुनाने तलवार उपसली. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला सांगितले की, 'अरे समाजाच्या प्रभवासाठी, उत्कर्षासाठी धर्मशास्त्र रचलेले असते. ज्याने उत्कर्ष होतो तोच धर्म होय. तुझ्या प्रतिज्ञांपालनाने काय होईल याचा तू विचार कर.' आणि याच संदर्भात त्यांनी धर्म व अधर्म यांचे सूक्ष्म विवेचन करून धर्म कोणता, सत्य काय याचा निर्णय लोकहित, लोकयात्रा या निकषाने करावयाचा असतो, हे अर्जुनाला समजावून दिले.
 श्रीकृष्णांच्या चरित्रात कंसवध, शिशुपालवध यासारखे अनेक गंभीर प्रसंग उद्भवले. द्रोण, कर्ण यांचा वध, अश्वत्थामा व अर्जुन यामध्ये झालेली ब्रह्मास्त्रांची लढाई यांसारखे प्रसंग पांडवांच्या चरित्रात आले. त्या सर्व प्रसंगी कार्याकार्याचा निर्णय श्रीकृष्णांना करावयाचा होता. तो त्यांनी या एकाच निकषाने केलेला दिसतो. समाजहित, लोकहित, भूतप्रभव ! यावाचुन धर्माचा दुसरा निकष श्रीकृष्ण जाणीत नाहीत. लोकहित, लोकयात्रा याऐवजी कधी त्यांनी चातुर्वर्ण्याचे संरक्षण, ज्ञातीचे, क्षत्रिय जातीचे वा राजमंडळाचे संरक्षण असे शब्द वापरले आहेत. पण त्यांच्या मनातला भावार्थ तेथेही समाजहित हाच दिसतो. कंसाला मारल्यानंतर उग्रसेनाने, 'या राज्याचा आता तुम्हीच स्वीकार करा अशी त्यांना विनंती केली. त्यावेळी त्यांनी उत्तर केले, 'मी कंसाचा वध केला, हे खरे नाही. तो स्वतःच्या पापाचरणामुळे मृत्यू पावला आहे. तेव्हा त्याचें राज्य मला घ्यावयाचे नाही. मी कंसाला मारला असेल तर तो लोकहितार्थ मारला आहे. राजे पूर्वीप्रमाणे आपणच आहात.' जरासंघाला ठार करणे का अवश्य आहे हे सांगताना 'त्यांनी 'लोकहित ' हेच कारण दिले आहे. जरासंधाने ८४ क्षत्रिय राजे पराभूत करून बंदीत ठेविले होते. असे १०० बंदी झाले की तो त्यांना शंकरापुढे बळी देणार होता. यामुळे अनेक क्षत्रिय राजकुलांचा नाश झाला असता व भारतातले राजमंडळच विनाशाच्या मार्गाला लागले असते. तेव्हा हा ज्ञातिक्षय थांबविण्यासाठी श्रीकृष्णांना त्याचा वध

साहित्यातील जीवनभाष्य