पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वृद्ध आहेत. त्यांनी क्रोधामुळे, हर्नामुळे किंवा विषयवासनेमुळे कसेही सांगितलेले असो, ते मानणे हाच धर्म होय. यास्तव त्यांची आज्ञा अगदी तंतोतंत शेवटास नेल्यावाचून माझ्याने राहवणार नाही. माते, लक्ष्मणा, पिताजी सत्यनिष्ठ, सत्यवन्तनी व सत्यपराक्रम असे आहेत. त्यांची आज्ञा ही उत्कृष्ट धर्मवचन आहे, हे ध्यानात ठेवून अत्यंत त्वरेने वनवासाच्या सामग्रीची तयारी करा.' लक्ष्मणाने यानंतरही अनेक प्रकारे विरोध करून पाहिला पण शेवटी रामचंद्रांनी त्याला सांगितले, 'हे सौम्या, मातापित्यांच्या वचनांवरच मी निश्चल आहे व हाच सन्मार्ग आहे, हे तू ध्यानात घे.' (रामायण- · अयोध्या, सर्ग २१ ते २४ ) रामचंद्रांनी हे सर्व पितृभक्तीने केले, असा सर्वत्र समज रूढ आहे. पण ते तितकेसे खरे नाही. त्यांनी ते पित्राज्ञेने केले हे खरे आहे. पिताजी सत्यनिष्ठ, सत्यपराक्रम आहेत, असे अयोध्येत असताना ते लक्ष्मणाला म्हणाले. पण वनवासात गेल्यावर, रात्री पालापाचोळ्याच्या अंथरुणावर पडल्यावर त्यांनी आपले मन मोकळे केले. ते म्हणाले, 'लक्ष्मणा, हे संकट आणि राजाच्या बुध्दीला पडलेला भ्रम यांचा विचार केला म्हणजे अर्थ व धर्म यापेक्षा कामच प्रबल आहे, असे मला वाटते. अरे, पिताजींनी माझा त्याग केला तसा कोणी अज्ञानी पुरुषसुद्धा स्त्रीकरता आपल्या आज्ञाधारक पुत्राचा त्याग करणार नाही. ती कैकेयी, भरत परत आल्यावर महाराजांचा प्राण सुद्धा घेईल. धर्म व अर्थ सोडून जो कामाचेच अवलंबन करतो त्याला या दशरथराजाप्रमाणे सत्वर विपत्ती प्राप्त होते.' (अयोध्या ५३, ९-१३) आपल्या मागे कैकेयी कौसल्येला व सुमित्रेला छळील, विषसुद्धा घालील अशी रामचंद्रांना भीती वाटत होती. म्हणून पहिल्याच दिवशी लक्ष्मणाला, 'तू परत जा व आपल्या मातांचे रक्षण कर,' असे ते सांगू लागले. कौसल्येच्या दुःखाला आपण कारणीभूत झालो, म्हणून स्वतःचा धिक्कार करू लागले; कोणत्याही स्त्रीस माझ्यासारखा पुत्र न होवो, असे म्हणू लागले. असे असून मग ते वनवासाला का गेले ? ते म्हणतात, 'हे निष्पाप लक्ष्मणा, मी अधर्माला भीत आहे. अरे मी क्रुद्ध झालो तर अयोध्याच काय, पण सर्व पृथ्वीसुद्धा जिंकून टाकीन. पण अशा प्रसंगी वीर्याचा उपयोग नाही, मला अधर्माची भीती वाटते. म्हणून मी स्वतःला अभिषेक करून घेत नाही,' (५३, १८-२६) रामचंद्रांच्या या वचनावरून हे स्पष्ट होते की, पिताजी काममूढ आहेत. अनीतीने, अधर्माने ती आज्ञा देत आहेत, हे त्यांना मान्य होते. तरी ती आज्ञा पाळली पाहिजे, असा त्यांचा बुध्दिनिश्चय होता. भावनेच्या भरात, पितृप्रेमाने घेतलेला तो निर्णय नव्हता. कुलाचा, जमातीचा जो नायक त्याची आज्ञा दुर्लंघ्य मानली पाहिजे, प्रमादातीत धरली पाहिजे, नाहीतर समाजात शासन असे कसलेच राहणार नाही व त्यामुळे अराजक माजून लोक उत्सन्न होतील, असे त्यांचे मत होते. ते ज्याला धर्म म्हणतात तो हाच होय. आणि त्या धर्माचे उल्लंघन करण्यास मी असमर्थ आहे, असे ते म्हणत होते, ते या अर्थाने होय.
 रावण वधानंतर सीता सन्मुख आली असताना रामचंद्रांनी तिला उद्देशून जे कठोर

संस्कृतिदर्शन