पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जर खरे असेल तर आत्माविष्कार म्हणजे जीवनभाष्यच होय हे समीकरण कोणाला नाकारता येईल असे वाटत नाही.
 साहित्यातले सर्व श्रेष्ठमूल्य असे हे जे जीवनभाष्य त्याचा अर्थ, त्याची विवक्षा स्पष्ट करण्याचा या प्रबंधात प्रयत्न केला आहे. ड्यूई, अर्नोल्ड, ग्रीन, गॅराड, लबॉक अशा टीकाकारांच्या मतांची चर्चा करून आणि संस्कृत, मराठी, इंग्रजी, फ्रेंच इ. भाषांतील नामवंत साहित्यिकांच्या ललितकृतीतील उदाहरणे देऊन या मूल्याचे स्वरुप मी माझ्या मताने स्पष्ट केले आहे. टीकाकारांत या मूल्याच्या महत्वाच्या बाबतीत मतभेद असू शकतील. पण साहित्यिकांत मात्र नाहीत. असू शकतील असे मला वाटत नाही. जगात आजपर्यंत अमर, अक्षर कलाकृती म्हणून सरस्वतीच्या मंदिरात ज्या ललितकृतींना स्थान मिळाले आहे त्यांतील प्रत्येक कृती या संसारावर भाष्य करण्याच्या हेतूनेच त्या त्या साहित्यिकाने लिहिलेली आहे. जीवनावर असे उद्बोधक भाष्य ज्याने केलेले नाही त्या कवीला वा त्याच्या कृतीला सरस्वतीच्या मंदिरात अद्याप तरी स्थान मिळालेले नाही. त्यामुळे टीकाकारांच्या मतभेदाविषयी फारशी फिकीर करण्याचे कारण आहे असे वाटत नाही. अभिजात साहित्यिकांच्या एकमुखी आधारावर कलात्मक जीवनभाष्य हेच अमर साहित्याचे लक्षण होय असे निश्चितपणे म्हणता येईल. या प्रबंधात तेच प्रतिपादन केले आहे.

अंतरंग दर्शन
१३५