पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भांडवलदार हे जे समाजाचे आधारस्तंभ ते अधर्म अनीती या पायावर उभै आहेत, 'स्त्री, संसार हे ध्येयाच्या आड येत नाहीत, 'विश्वरचनेला अर्थ आहे, 'ध्येयवाद हा उपयुक्ततावादापेक्षा श्रेष्ठ होय,' 'संस्कृती ही एक छत्री आहे' अशी काही मते संसाराच्या अवलोनावरून कवींची निश्चित होतात. त्याचा असा दृष्टिकोण तयार होतो. आणि मग जीवनाच्या स्वतःच्या तत्त्वज्ञानाचा छाप मारुन तो वाचकांना जीवनाचे दर्शन घडवितों. जीवनावर भाष्य करण्याची साहित्यिकाची हीच पद्धत असते.
 आत्माविष्कार हेच भाष्य अलीकडे आत्माविष्काराला साहित्यात फार महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. किंबहुना कवीचा आत्माविष्कार म्हणजेच साहित्य अशी व्याख्याही कोणी करतात. तो आत्माविष्कार म्हणजे दुसरे तिसरे काही नसून संसारातील घटनांविषयी कवीनें व्यक्त केलेला, किंवा त्याच्या साहित्यावरून ध्यानात येणारा त्याचा दृष्टीकोणच होय. मुळात निसर्गघटना किंवा व्यवहारातल्या घटना यांना स्वतःचा असा काही अर्थ नसतो. कवी त्या घटनांचा अर्थ लावतो आणि आपल्या साहित्यातून तो अर्थ प्रगट करतो. हा जो संसाराचा कवीने लावलेला अर्थ तोच आत्माविष्कार होय. आणि तेच त्याचे जीवनभाष्य होय. हे जर आपण मान्य केले तर साहित्याचे समीक्षण करताना साहित्य मूल्ये व साहित्यबाह्यमूल्ये असा जो टीकाकार भेद करतात तो अनाठायी आहे, भ्रामक आहे हे सहज ध्यानात येईल. धर्म, नीती, तत्त्वज्ञान, समाजरचनेची तत्त्वे, काही व्यावहारिक सत्ये, अर्थशास्त्रीय तत्त्वे, संस्कृती, प्रगती, परागती, यासंबंधी कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार यांच्या मनात काही तत्त्वे निश्चित झालेली असतात. ती ते शास्त्रीय पद्धतीने तार्किक पद्धतीने निश्चित करतात असे नाही. म्हणून त्यांना तत्त्वे असे न म्हणता कवीने बसविलेला घटनांचा अर्थ, असे आपण म्हणतो. पण त्याचे स्वरूप त्या तत्त्वांसारखेच असते. असे काही तत्त्व साहित्यात आले की, त्या साहित्याला हेतुप्रधान म्हणून हेटाळण्याची सध्या चाल आहे. त्या हेतूमुळे साहित्याला प्रचाराचे रूप येऊ नये, हे म्हणणे युक्त आहे. कलात्मकतेवाचून लेखनाला साहित्य पदवी लाभणार नाही, हे खरे. पण हेतु असणे यातच काही अक्षेपार्ह आहे, हे म्हणणे युक्त नाही. कारण आहे या हेतूतूनच साहित्याचा जन्म होत असतो. हेतू जेव्हा स्पष्टपणे व्यक्त होतो तेव्हाच लेखकाचा आत्माविष्कार झाला, असे म्हणता येते. तेव्हा हेतूवर आक्षेप घेतला तर आत्माविष्कारावरच आक्षेप घेतला असा अर्थ होईल आणि आत्माविष्कार तर सर्व श्रेष्ठ असे साहित्यमूल्य, असे आज मानले जाते. तेव्हा साहित्यमूल्ये व साहित्यबाह्य मूल्ये असा भेद केला तर या सर्व श्रेष्ठ मूल्याला साहित्य बाह्यमूल्यांच्या वर्गात जमा करावा लागेल. पण तसे करण्यास कोणी धजावेल असे वाटत नाही. आणि कवी आत्मविष्कार करतो म्हणजे नुसती अनूभूती प्रगट करतो असे नसून जीवनाचा त्याला प्रतीत झालेला अर्थ प्रगट करतो हे

१३४
साहित्यातील जीवनभाष्य