पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुटुंब, एक कुल हा प्राथमिक घटक असतो, काही कालाने अशी अनेक कुले मिळून एक जमात तयार होते आणि मग अशा अनेक जमाती मिळून मोठा समाज किंवा राष्ट्र सिद्ध होते. या प्रत्येक अवस्थेत त्याला कोणीतरी शास्ता हा अवश्यच असतो, आणि त्या शास्त्याचा शद्व निर्णायक मानला पाहिजे, असा तेथे दण्डक असतो. संघटनेच्या शाश्वतीच्या दृष्टीने असा कोणाचा तरी निर्णय अंतिम मानणे हे अवश्यच असते. आणि मग तशा तशा निष्ठा समाजात जोपासल्या जातात व त्यांनाच धर्म असे म्हणतात. राजा हा प्रमादातीत आहे, त्याचा शद्व हा चूक असूच शकत नाही, असा इंग्लंडमध्ये दण्डक आहे. याचे हेच मर्म आहे. राजाच्या जागी अन्य देशांत अध्यक्ष असेल, किंवा सर्वोच्य न्यायालय असेल. पण व्यवहार दृष्टीने व समाजसंघटनेच्या शाश्वतीच्या दृष्टीने वाद करतांना कोठे तरी थांबणे अपरिहार्यच असते.
 श्रीरामचंद्रांच्या काळी कुल हाच अजून प्रधान घटक होता. समाजाला जमातीचे रूप प्राप्त होत होते, पण अजून त्याचे कुल- प्राधान्य पूर्णपणे गेले नव्हते. त्यामुळे कुलाचा शास्ता जो पिता त्याचा शब्द अंतिम मानणे हा त्यावेळी धर्म होता. रामचंद्रांचे सर्व वर्तन या एका सूत्राने बद्ध होते, असे रामायणावरून म्हणजे वाल्मीकि-रामायणावरून दिसते. दशरथाने त्यांना वनवासात जाण्याची आज्ञा केली व त्यांनी ती शिरसावंद्य मानिली. त्यावेळी लक्ष्मणाने त्यांना तीव्र विरोध केला. तो म्हणाला, 'रामचंद्रा, आपले पिताजी एका स्त्रीच्या मोहाने भुलले आहेत. त्यांना म्हातारचळ लागला आहे. तुला वनवासात पाठवावे, असे कोणतेच पातक तुझ्या हातून घडलेले मला दिसत नाही. तेव्हा त्या बाईलबुध्दी, मूढ पित्याची आज्ञा तू मानू नकोस. कैकेयीच्या चिथावणीने तो आपला शत्रू झाला आहे. तेव्हा अशा पित्याला कैद करण्यास किंवा त्याचा वध करण्यासही काही हरकत नाही. विवेकभ्रष्ट झालेल्या व कार्याकार्य विवेक नसलेल्या गुरूलासुद्धा शासन करणे अवश्य असते. तेव्हा तूं त्याची आज्ञा न मानता प्रथम राज्य ताब्यांत घे. मी तुझ्यामागे काळासारखा उभा राहीन. मग कोण आडवा येतो ते पाहूं,' लक्ष्मणाच्या या विचाराला कौसल्येनेही अप्रत्यक्षपणे संमती दिली. ती म्हणाली, 'पुत्रा, लक्ष्मणाचे भाषण तू ऐकलेच आहेस. तुला उचित वाटलें तर त्याप्रमाणे तू कर.' यावर रामचंद्रांनी उत्तर केले, की, 'माते, पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यास मी असमर्थ आहे. पूर्वीच्या अनेक थोर पुरुषांनी पित्याची आज्ञा पाळूनच कल्याण साधले आहे, भूलोकामध्ये तेच उचित आहे. लक्ष्मणा, तुझे वचन कुबुद्धिदर्शक आहे. तू धर्माचा विचार कर व ही अनार्य बुद्धी सोडून दे.'
 यानंतर कौसल्येने व लक्ष्मणाने रामचंद्रांचे मन वळविण्याचा परोपरीने प्रयत्न केला. कौसल्या म्हणाली, 'पित्याची आज्ञा पाळणे जसे तुझे कर्तव्य आहे तसेच माझी आज्ञा पाळणे हेही तुझे कर्तव्य आहे.' लक्ष्मण म्हणाला, 'तुझी ही फाजिल धर्मनिष्ठा निंद्य आहे.' पण रामचंद्रांनी त्यांतले काही मानले नाही. त्यांचे उत्तर एकच, 'मी धर्माचा अतिक्रम करणार नाही. दशरथ हे पिताजी आहेत. राजे आहेत. गुरु आहेत व

साहित्यातील जीवनभाष्य