पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुस्तकात 'वॉर अँड पीस' या टाॅलस्टायच्या कादंबरीचे विवेचन करताना लेखकांचा आशय, विचारसूत्र किंवा आयडीया, किवा सबजेक्ट आणि ललितकृतीची रेखा- फॉर्म किंवा आकार ही अविभाज्य कशी आहेत याचे मार्मिक विवेचन केले आहे. लबॉकच्या मते 'वॉर अँड पीस' या कादंबरीला चांगली रेखा, चांगला आकार-फॉर्म- आलेला नाही, याचे कारण काय ? कारण असे की, टॉलस्टॉलने मनात एक विषय सुनिश्चित करून ती कादंबरी लिहिलेली नाही. लेखकाने जमा केलेली सर्व सामग्री सर्व कच्चा माल, सर्व द्रव्य (घटना, प्रसंग व्यक्ति, विचार इ.) जेव्हा विषयांशी पूर्ण बद्ध, निगडीत, एकजीव झालेले असेल तेव्हाच उत्तम रेखा उत्तम फॉर्म साधला, असे म्हणता येईल. सर्व द्रव्य सूत्रबद्ध असणे हीच लबॉकची फार्मची व्याख्या आहे. आणि टॉलस्टॉयने यात घोटाळा केल्यामुळे 'वॉर ॲन्ड पीस' या कादंबरीला फॉर्म आला नाही, असे तो म्हणतो, 'तारुण्य व वार्धक्य' हा एक 'युद्ध आणि शांतता' हा दुसरा असे दोन विषय टॉलस्टायच्या मनात आहेत. ते दोन्ही परस्परसंबंद्ध नाहीत. आणि एका सूत्राची गुंफण चालू असताना त्यात टॉलस्टॉय दुसऱ्याचे धागे घसडून जबरदस्तीने विणून टाकतो. म्हणून शेवटी ते वाण बिघडन जाते. लबॉक म्हणतो, 'एकाच विषयावर लक्ष केंद्रित करून त्या संबंधीचे जे अंतिम उद्दिष्ट त्यासाठीच सर्व द्रव्य लेखकाने उपयोजिले असते तर कादंबरी जास्त परिणामकारक झाली असती. आहे या स्थितीत दोहोंपैकी एकही गोष्ट पुरी झालेली दिसत नाही. विस्तार अमर्याद झाला असूनही कादंबरीला पूर्णता आलेली नाही. आणि याचे कारण एकाच आरंभापासून लेखकाच्या डोक्यात दोन सूत्रे घोळत होती. आणि तो दोन गुंफणी करीत होता.
 जीवनभाष्य-प्रारंभबिंदू टीकाकारांच्या या विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, जीवनभाष्य हाच सर्व साहित्याचा प्रारंभबिंदू आहे. संसाराचे अवलोकन करताना कवीला त्याविषयी काही विचार स्फुरतो, काही कल्पना त्याच्या मनाची निश्चित होते आणि जमिनीत टाकलेले बी जसे आपल्याला पोषक अशीच जीवनद्रव्ये तेवढी शोषून घेते, तशी कवीची कल्पना स्वतःच्या विकासाला पोषक अशा जीवनातल्या घटना निवडते. जमिनीतल्या बीजाची कृती अबोधपूर्व घडते. कवीची कृती बोधपूर्व घडते. म्हणून तो या घटना आपल्या कल्पनेच्या परिपोषासाठी निवडतो असे आपण म्हणतो. पण साहित्याची निर्मिती या पद्धतीने होते यात शंका नाही. इब्सेन, झोला, हार्डी, वा. म. जोशी, फडके, तांबे इ. साहित्यिकांच्या साहित्यातून जी उहाहरणे या प्रबंधात दिली आहेत ती पाहता, आपल्या दृष्टिकोणातून जग पाहताना या साहित्यिकांना प्रथम काही तत्व सुचले, विचारसूत्र ध्यानी आले म्हणजे त्यांच्या मनात बीज तयार झाले व मग त्यांनी त्यातून वृक्ष तयार करण्यासाठी भोवतालच्या जीवनातून अवश्य ती पोषक द्रव्ये शोषून निवडून घेतली अशीच प्रक्रिया झालेली दिसते. 'स्त्रीला पुरुष एखाद्या बाहुलीसारखी वागवितो,'

अंतरंग दर्शन
१३३