पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काही दृष्टिकोण सिद्ध होतो. या दृष्टिकोणातून तो या संसाराकडे पाहू लागले की, त्याला त्यांतील घटनात काही संगती दिसू लागते. अनेकविध घडामोडींच्या मागे काही सूत्र दिसू लागते. आणि मग त्या सूत्राअन्वये अनेक घटना एकत्र बांधून त्यांची तो कथा तयार करतो व तीतून आपले तत्त्वज्ञान आविष्कृत करतो. जगातल्या घटना अशा सूत्रबद्ध करून त्यांवरून कवीने सांगितलेले हे जे तत्वज्ञान यालाच साहित्यातील जीवनभाष्य असे म्हणतात.
 अनुभूतीचा अर्थ या अर्थाने पाहिले तर आपल्या हे ध्यानात येईल की, जीवनभाष्यावाचून साहित्य याला अर्थच नाही. नुसती अनुभूती हे साहित्य नव्हे. त्या अनुभूतीचा कवीला प्रतीत झालेला अर्थ म्हणजे साहित्य. इंद्रधनुष्य पाहून या विश्वात रचना आहे, सुसंगती आहे. जग रम्य आहे असे एका कवीला वाटते तर दुसऱ्याला असल्या रम्य वस्तुला क्षणभंगुर करून ठेवणाऱ्या विधात्याला उद्देशून 'अहह ! कष्टं अपंडितता विधेः' असे उद्गार काढावेसे वाटतात. इंद्रधनुष्य पाहाणे ही अनुभूती आणि ते पाहून कवीने आनंदाचे वा कष्टाचे काढलेले उद्गार हे काव्य होय. कॅमेरॅने काढलेला फोटो व कुंचल्याने काढलेले चित्र यांतील भेद साहित्याच्या विवेचनात नेहमी उदाहरणादाखल घेतला जातो. फोटो ही केवळ अनुभूती होय. तिला कला म्हणत नाहीत. चित्र ही कला आहे. कारण त्यात कवीचा दृष्टिकोण व्यक्त झालेला असतो. एच्. डब्ल्यू. लीगेट याने 'दि आयडिया 'ऑफ फिक्शन' या आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत या विचाराचे उत्तम विवेचन केले आहे. तो म्हणतो, केवळ अनुभूती हा वाड्मयाचा विषय नाही. त्या अनुभूतीचा लेखकाने बसविलेला अर्थ हा खरा विषय होय. कादंबरी म्हणजे केवळ जीवनाचे प्रतिबिंब नव्हे तर ती एक पुनर्निमिती असते. आणि तिचे मुख्य लक्षण मुख्य सूत्र म्हणजेच हा लेखकाला दिसलेला अर्थ हे होय. यालाच त्याचे मूल्यमापन किंवा भाष्य असे म्हणतात. जीवनाचा अर्थ शोधणे, त्याचे चिंतन करणे. हेच लेखकाचे खरे कार्य होय. या चिंतनातून त्याची जी मते बनतात, निर्णय ठरतात, तो जे मूल्यमापन करतो, त्यातूनच कादंबरी निर्माण होते. यावरून विशिष्ट दृष्टिकोणावाचून, जीवन भाष्यावाचून काव्याची, कथेची, कादंबरीची निर्मिती होऊच शकत नाही हे ध्यानात येईल.
 मूल्यमापन काव्य म्हणजे निसर्गाचे आरशात प्रतिबिंब दाखविणे, असे शेक्सपीयरने म्हटले आहे. यावरून केवळ यथार्थ वर्णन म्हणजे काव्य, फोटो हेच काव्य, असा त्याचा अभिप्राय आहे, असे कोणाला वाटते. पण ते चूक आहे. कारण आपल्या त्या विधानाचे स्पष्टीकरण करताना शेक्सपीयरने म्हटले आहे की, 'सत्त्वगुणाला आणि तमोगुणाला त्याचे त्याचे रूप या आरशात दिसले पाहिजे. आणि त्या काळाला व परिस्थितीलाही आपली रूपरेखा ध्यानात आली पाहिजे.' शेक्सपीयरचे हे वचन देऊन लीगेट म्हणतो, 'यावरून शेक्सपीयरच्या हॅम्लेटच्या मनातला आरसा नेहमीच्या

अंतरंग दर्शन
१३१