पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काहीच बोलेनात. पण ते औषधे इंजेक्शनेही आणू शकले नव्हते. प्रभाने विचारले, प्रथम ते टाळाटाळ करू लागले. पण शेवटी त्यांना सत्य ते सांगावे लागले. त्यामुळे मात्र प्रभाला धक्का बसला. आईबापांच्या बोलण्यामुळे, गावातून येणाऱ्या वार्तांमुळे तिचे मन नवऱ्याविषयी जरा साशंक झालेच होते. आणि आपल्या हातात सोन्याच्या म्हणून त्याने पितळेच्या बांगड्या घातल्या, हे जेव्हा तिला कळले, तेव्हा तिची श्रद्धा भंगली. तिच्या मनातल्या पतीच्या मूर्तीला तडा गेला आणि रोगाने आधीच खंगलेल्या त्या मुलीने प्राण सोडले.
 तिच्या बापाला मुलीच्या मरणाचे तर दुःख झाले, पण तिच्या मरणाला आपण कारण झालो, या विचाराने त्याचे मन त्याला खाऊ लागले. त्याने सत्य न सांगता प्रभाची श्रद्धा तशीच टिकू दिली असती तर !
 दुरावलेला जीव, पुरंदरची शिकार, पर्जन्यकुंड, पाठराखीण, आश्वासन, रगाडा, भवचक्र, हंसे मुक्ता नेली, येरे माझ्या मागल्या, जगावेगळे सासर या कथांत शास्त्रीबुवांनी जीवनातली अशीच सत्ये मूर्त करून मांडली आहेत. मानवी विकार, वासना, वेदना, मानवाचा ध्येयवाद, त्याच्या अंतरांतल्या सुप्तशक्ती, त्याच्या श्रद्धा, त्यातून निर्माण होणाऱ्या मूल्यांचा संघर्ष, या सर्वांनी हा संसार चाललेला असतो. तो नीट न्याहाळून या सर्व विकार विचारांची मीमांसा करून त्यांचा अर्थ सांगणे, मानवी जीवनातले त्यांचे स्थान कोणते ते सांगणे, आणि संसाराचे मर्म आपल्या मतीप्रमाणे उकलून दाखविणे हे साहित्यिकाचे काम आहे. कविवर्य तांबे व पंडित महादेवशास्त्री जोशी यांच्या साहित्याचे जे विवेचन येथे केले आहे त्यावरून यातील भावार्थ स्पष्ट होईल असे वाटते.
 जीवनातील संगती संस्कृत, इंग्लिश, मराठी, फ्रेंच इ. भाषांतील अभिजात साहित्यातील उदाहरणांच्या आधारे येथपर्यन्त जे विवेचन केले आहे त्यावरून जीवनभाष्य, याची विवक्षा स्पष्ट होईल असे वाटते. साहित्यिक हा स्वतःचा संसार पाहतो. समाजाचा पाहतो. जगातल्या घडामोडींचे अवलोकन करतो; निसर्ग त्याला दिसत असतो. आकाशस्थ ग्रह, गोल, तारे, त्याच्या दृष्टीस पडत असतात आणि या पलिकडे मनाची दृष्टि फेकून तो विश्वाच्या पलिकडे काय असेल, याचे चिंतन करीत असतो. अशा रीतीने संसार पहात असताना अनेक मित्रांशी, पंडीतांशी तो चर्चा करतो. त्यांचे ग्रंथ वाचतो स्वदेशी-विदेशी अनेक स्त्रीपुरुषांच्या सहवासात राहतो. नानाविध बऱ्यावाईट प्रसंगांचा अनुभव घेतो, सुख भोगतो, दुःखे सोसतो, इतरांची सुखदुःखे न्याहाळतो, त्या प्रसंगीच्या त्यांच्या क्रिया प्रतिक्रियांचे निरीक्षण करतो आणि अशा रितीनें प्रतिदिनी, प्रतिक्षणी आपल्या अनुभूतीच्या भांडारात तो नित्य भर टाकीत असतो. या अनुभूतीवरून या संसाराविषयी त्यातील व्यक्तीविषयी, समाजातील, विश्वातील घटनाविषयी त्याचे काही मत बनते. त्याच्या मनाशी काही मूल्ये निश्चित होतात, त्यावरून त्याचे काही तत्त्वज्ञान बनते, आणि या सर्वातून त्याचा जगाविषयी

१३०
साहित्यातील जीवनभाष्य