पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 धर्म, अधर्म, नीती अनीती या संबंधीचा शास्त्रीबुवांचा दृष्टिकोण 'घररिघी' या कथेत असाच प्रगट झाला आहे. माणूस धर्माधर्म नीतिअनीती यांचा विचार केव्हा करील ? पोटभर अन्न व अंगभर वस्त्र मिळाल्यानंतर. एरवी, नीती, धर्म सर्व व्यर्थ आहे. शिवराम भाटीकराची मुलगी चिमा-घररिघी- हिच्या तोंडून अगदी सांध्यासुध्या भाषेत शास्त्रीबुवांनी हे सत्यं वदविले आहे. त्या मुलीचे आईबाप दोघेही आळशी, निलाजरे व बेजबाबदार होते. बापांने पैशासाठी मुलीला विकायला काढली होती. तो माणूस काळा डोम होता. त्याच्या एका डोळ्यात फूल पडले होते: त्यांची बायको मेली होती आणि घरी खंडीभर पोरांची फटावळ होती. बाप चिमाला या माणसाला विकणार होता. म्हणून ती घरातून पळाली होती. काकींनी तिला जेवायला घातले आणि त्या तिला म्हणाल्या, 'चिमे, अशी भटकत राहिलीस तर बिघडून जाशील, आणि अशी कीर्ती करून ठेवलीस तर कोणी पत्करायचं नाही तुला.' त्यावर चिंमी म्हणते, 'मग काय करू तर ? तू मला घालतेस जेवायला दोन्ही वेळा पोटभर ! मंग बंघ तुझ्या अर्ध्या वचनात राहते का नाही. कोणाकडे डोळा उचलून बघितले तर थोबाडीत मार माझ्या.' यावर काका म्हणतात, 'चिमाचा सवाल सरळ होता. तिला कोरडा उपदेश नको होता. तिच्या पोटात भूक पेटली होती. आणि प्रेमाच्या पाशानं तिला कोणी बांधलेलंच नव्हत.' तिच्यापुढे नीतीचा उपदेश व्यर्थ होता.
 'नवऱ्याची जात' या कथेत शास्त्रीबुवांनी मानवी जीवनासंबंधी एक फार महत्त्वाचं सत्य सांगितलं आहे. माणसे काही श्रद्धांवर जगत असतात. त्या श्रद्धेला ती गेला की त्यांचा जीवनाधारच संपतो, मग ती जगू शकत नाहीत. प्रभाचा नवरा घनःश्याम हा नाटकात पेटी वाजविणे, पात्रे रंगविणे असली कामे करून कधी कधी पैसे मिळवी. एरवी सर्व शून्याकारच होता. व्यसने त्याला सगळी होती आणि त्या पायी तो वाटेल तसा वागत असे. पण बायकोला थापा देण्यात तो वस्ताद होता. तो इतका गोड बोले, स्वतःच्या कर्तृत्वाचा इतका व्यवस्थित बडेजाव सांगे की, प्रभा अगदी भुलून जाई. त्याच्या शब्दाबद्दल तिला कधी शंकासुद्धा आली नाही. तिची त्याच्यावर अपरंपार श्रद्धा होती, प्रेम होते. आणि थापा देऊन त्याने ते टिकविले होते. त्याच्या संसर्गामुळे प्रभाला वाईट रोग जडला, तेव्हा त्याने तिला माहेरी आणून टाकली व तो निघून गेला. तिच्या आईबापांना जावयाचे सर्व वृत्त माहीत होते. म्हणून वैतागून ते तिच्या देखत त्याची निंदा निर्भर्त्सना करीत. प्रभाला ते सहन होत नसे. 'त्यांच्याबद्दल असं बोलणार असाल तर मला आपली तिकडे पोचवा. मग माझं काय व्हायचं असेल ते होईल,' असे ती म्हणे. तिचे वडील गरीबच होते. प्रभाच्या औषधपाण्यापायी त्यांची ओढ होऊ लागली. तेव्हा प्रभाने हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून त्यांना दिल्या व त्या विकायला सांगितल्या. वडील सोनाराकडे गेले, तो बांगड्या पितळेच्या निघाल्या. घरी आल्यावर वडील

अंतरंग दर्शन
१२९