पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बुवांनी तो व्यक्त केला आहे. 'खडकातले पाझर' या कथेतील शिवरामभाऊची इन्दू ही बाल मैत्रीण. ती गोपाळ भटजीची बायको. आपल्या बायकोची -सुमाची प्रकृती दाखविण्यासाठी शिवरामभाऊ वेळगावला आले व इन्दूने आग्रह केला म्हणून तिच्याकडेच राहिले. बायकोचा आजार वाढत चालला म्हणून त्यांचा इन्दूकडचा मुक्कामही वाढत चालला. पण तेवढ्या काळात शेजारणी पाजरणींनी इन्दू आणि शिवरामभाऊ यांच्याविषयी कंड्या उठवून आग लावून दिली. सुमाच्या मनातही ते चित्र त्यांनी भिनविले. त्यामुळे सर्व औषधोपचार थांबवून तिला घेऊन त्यांना गावी परत जावे लागले ! स्त्रीजातच स्त्रीची वैरी होते ती अशी. पुरुषांचा दृष्टिकोण स्वार्थी, आपमतलबी असेल. पण स्त्रीने तरी स्त्रीकडे जरा उदार दृष्टीने पहावे. पण ते शक्य नाही. हाही स्त्रीजीवनाचा अनादिकाळापासून चालत आलेला नियम आहे.
 स्त्रीची खरी गुणसंपदा कोणती ? सौंदर्य, शृंगारभाव, बुद्धिमत्ता, चतुरभाषण, यौवनाचा उन्माद हे तिचे खरे धन आहे काय ? शास्त्रीबुवांना तसे वाटत नाही. त्या धनाने संपन्न असलेली लीला जयंताला मिळत होती. जवळ जवळ मिळालीच होती. पण त्याच वेळी त्यांच्याकडे आलेल्या सोनूमामांच्या तारूने लीलेवर मात करून त्याला जिंकले. समर्पणबुद्धी, शरणता, सेवाभाव, आत्मलोप मुग्धता, अबोलवृत्ती ही तिची संपदा होती. तारूने याच गुणांवर डाव जिंकला आणि लीलेने आपल्या विनयहीन, उद्धट, उठवळ, माजोरी वर्तनाने तो घालवला. स्त्रीला यशस्वी व्हायला केवळ रूपसंपदा पुरी पडत नाही. तेवढ्या गुणाने संसार यशस्वी होत नाही. 'भावबळ ' या कथेत शास्त्रीबुवांनी अत्यंत कलात्मकतेने हे सत्य विशद केले आहे.
 कर्मकांड आणि मानवता धर्म या दोन मूल्यातील संघर्ष महादेवशास्त्री यांनी 'गोपी' या कथेत चित्रित केला आहे. तिच्यातील पुराणिक हा ब्राह्मण होता. तो प्लेगने आजारी पडला. त्यावेळी गावातील धर्म मार्तंडांनी कोणीही त्याला आश्रय दिला नाही, त्याची शुश्रूषा केली नाही. ती केली देवळात कामाला असणाऱ्या सोनारणीच्या मुलीने, गोपीने. त्या प्रसंगाने पुराणिकबुवांचे तिच्या घरी खानपानही घडले. त्यामुळे, पुन्हा पुराण चालू करण्या आधी, त्यांनी प्रायश्चित घेतले पाहिजे, असा गावातल्या कर्मठांचा आग्रह पडला. पुराणिकबुवाना याचा फार संताप आला. पोथीतल्या धर्माहून निराळा असा एक अलिखित धर्म आहे, आणि गावातल्या ब्राह्मणांना त्याचे मुळीच ज्ञान नाही, हे या प्रसंगाने त्यांच्या ध्यानी आले. त्यांनी प्रांजळपणे म्हटले आहे की, हा धर्म त्यांना गोपीने शिकविला होता. भागवताचा सप्ताह करणाऱ्या एका पुराणिकाला एका सोनारणीच्या मुलीने खरा धर्म शिकविला होता ! आणि म्हणूनच त्याने त्या धर्ममार्तडांना सांगितले की, 'गोपीच्या हातचे पुण्यपावन अन्न सेवून मी शुद्ध झालो आहे. मी प्रायश्चित्त घेतले आहे.'

१२८
साहित्यातील जीवनभाष्य