पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटते, भासते, जाणवते त्यांची तशी श्रद्धा आहे. म्हणूनच स्वतःच्या मनाभोवती 'घनतम पसरले असताना ते त्याला शुक्राकडे पाहायला सांगतात. रात्र अंधारी असते, अवसेची रात्र जास्तच अंधारी, तरी तीतूनच अरुण जन्माला येतो व सूर्य उगवतो. म्हणून निराश होण्याचे कारण नाही. भोवताली काटे असले तरी मध्ये फूल असते. हिमानंतर वसंत नियमाने येतो, हे ध्यानात घेतले तर तुझी कळ दूर पळेल, असा तांबे मनाला धीर देतात. पुढल्या कडव्यात तर आपत्ती, संकटे, विनाश यांमुळेच वैभव, उत्कर्ष, उन्नती होते, असे त्यांनी सांगितले आहे. फूल गळते खरे, पण त्यामुळेच फळ मिळते, चीज नष्ट होते व त्या विनाशातूनच वृक्ष निर्माण होतो, आणि तेल जळते म्हणूनच ज्योत गाजळते. मरणात अमरता असते ती अशी.
 दृष्टिकोण व्याक्तिगत साहित्यात मांडलेले विचार कवीचे व्यक्तिगत विचार असतात. तो त्याचा वैयक्तिक दृष्टिकोण असतो, हे आपण कधीही विसरता कामा नये. कवीच्या अनुभवास जे येते, त्याला जे वाटते ते तो सांगतो. आपले सत्य शास्त्रीय निकषावर तो कधी पडताळून पहात नाही आणि त्यामुळेच साहित्याला निराळे स्वतंत्र स्थान प्राप्त होते. साहित्याची गोडी वैयक्तिकतेतचं आहे. कारण प्रत्येक मानव एक स्वतंत्र, भिन्न व्यक्ती असते. तिच्यासारखी तीच. दुसरी नाही. आणि अशा या व्यक्तीच्या स्वतंत्र अनुभूतीतून जग कसे दिसते ते पाहण्यात मौज असते. कारण तशा स्वतंत्र अनुभूतीमुळेच प्रत्येक कवीचे काव्य स्वतंत्र, भिन्न, विशिष्ट झालेले असते. प्रत्येक वस्तूला विकास आणि नाश असतोच. कोणी विकासावर लक्ष केंद्रित करून आशावादी होतात, कोणी नाशावर भर देऊन निराशावादी होतात. गोविंदाग्रज गुलाबाला पाहून आनंदित होतात. पण लगेच त्यांच्या मनात येते, 'नाश व्हायासाठीच हा विकास !' दहाबारा तासापलीकडे फूल टिकत नाही. आणि यावरून परमेश्वराचा हा उफराटा न्याय आहे असा निष्कर्षही ते काढतात. दुष्ट, नीच माणसांना शंभर, शंभर वर्षे आयुष्य, आणि गुणसंपन्न गुलाबाला एक दिवसही पुरते नाही ! इन्द्रधनुष्य रेंदाळकरांना सुंदर दिसते. पण ते अल्पजीवी आहे म्हणून त्यांना दुःख होते. मोराचे नृत्य हे अत्यंत रम्य दृश्य आहे. पण त्याला ब्रह्मदेवाने कर्कश आवाज दिला, मधुर- स्वर दिला नाही म्हणून ते त्याला दोष देऊन खिन्न होतात. तांबे यांचा दृष्टिकोण अगदी उलट आहे. आपल्याला जे विसंगत वाटते. दुःखद भासते, त्यातूनच मानवाचा विकास होत असतो अशी त्यांची श्रद्धा आहे. हे त्यांचे जीवनभाष्य आहे.
 उपयुक्ततावाद आणि ध्येयवाद यातील संघर्ष कालिदासाने वर्णिला आहे, हे वर आपण पहिलेच आहे. तांबे यांनी उपयुक्ततावाद व सौंदर्यवाद यातील द्वंद्व कसे असते, ते 'किती महामूर्ख तू शहाजहां !' या कवितेत सांगितले आहे. शहाजहानाने ताजमहाल बांधून हृदयातले प्रेम मूर्त केले. पण अर्थशास्त्रज्ञांना वाटते, या एवढ्या इमारतीचा उपयोग काय ! येथे स्टेशन होणार नाही, हॉस्पिटल नाही, प्रयोगशाळा नाही, कशालाच या इमारतीचा उपयोग नाही ! तेव्हा एवढा पैसा असल्या इमारती

१२६
साहित्यातील जीवनभाष्य