पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनुष्य असमर्थ होतो. या शक्ती तरुण असताना मात्र तो संसाराचा, जीवनाचा मधू पिळून वाचकांना अर्पीत असतो. ताब्यांनी पिळून काढलेल्या मधूचे रूप काय आहे ते आता पहावयाचे आहे.
 या विश्वाला काही अंतिम हेतू आहे काय त्याला कोणी रचयिता आहे काय, त्यातील घडामोडीच्या मागे काही नियम, काही न्यायनीती दिसते काय, का हे विश्व म्हणजे एक केवळ पसारा आहे, व्यवस्थाशून्य ढिगारा आहे, यातील सर्व घटना बेबंद, बेतंत्र आहेत? काय आहे तरी काय ? हे व अशा तऱ्हेचे प्रश्न कोणत्याही विचारी मनाला सतावीत असतात. प्रत्येक मनुष्याला याचे, स्वतःपुरते तरी, काही तरी उत्तर निश्चित करावे लागते. कवी ते व्यक्त करतो इतकेच. या बाबतीत तांबे यांचे मत काय आहे ? कलेचे 'हृद्गत' या काव्यावरून असे दिसते की, त्यांच्या मते या विश्वरचनेला अर्थ आहे. चंद्र, सूर्य, तारे, नद्या, पर्वत, अरुण, संध्या, रात्र, तारांगण यांचे व्यापार काही हेतूने चालले असून त्यांच्या मागे या सर्वांचा नियंता निश्चित आहे, असे त्यांना वाटते. पर्वत परमेश्वराचे प्रवचन करतात, रात्र त्याच्याच यशाचे गान करते, सागर त्याचा रोष प्रगट करतो आणि दुष्टांना दण्डन होईल असे सांगतो. विद्युल्लता त्याच्या रूद्ररूपाचे दर्शन घडविते. हे जग म्हणजे परमेश्वराचे एक सुख स्वप्न असून संध्या ही त्या सुखस्वप्नात जगाला गुंगवून टाकते. 'तृणाचे पाते' या कवितेचा भावार्थ हाच आहे. ते पाते म्हणजे एक खड्ग असून दुष्कृतांना दंडण्यासाठी परमेश्वराने ते उगारले आहे, असे कवी म्हणतो. तृणाचे पाते. ही वस्तु सर्वांना दिसते. पण सर्वाना त्याच्याबद्दल असे वाटत नाही. कवी तसे म्हणतो याचे कारण त्याच्या दृष्टिकोणातून त्याला तसे दिसते. त्याला त्या पात्यातून कृष्णाची मुरली ऐकू येतो. नरसिंहाचे गुरगुरणे समजते व वामनाने दडपलेला बळीराजा त्याला त्यात दिसतो. हा सर्व कवीला विश्वरचनेचा समजलेला हेतू आहे. त्याने सांगितलेले संसाराचे मर्म ते हेच.
 मरणाविषयी तांबे यांनी निरनिराळ्या कवनांतून जे विचार मांडले आहेत, त्यांच्या मागे विश्वाविषयीची हीच श्रद्धा आहे. 'मरणात जग जगते' ही त्यांची विचारसरणी प्रसिद्धच आहे. पण जो त्याग करील, यज्ञ करील, सर्वस्वाचा होम करील' त्यालाच मरणाला मारून अमरता मिळविता येईल, असे त्यांनी म्हटले आहे. म्हणूनच मरणाला भिण्याचे कारण नाही, मरण म्हणजे केवळ गाडी बदलणे आहे, असे ते म्हणतात. 'निरोप घेताना' या कवितेत वरूण, वायू, सूर्य यांनी आपले लालन पालन केले असे सांगून विश्वरचना सार्थ आहे व मरण म्हणजे नाश नव्हे, हाच दृष्टिकोण व्यक्त केला आहे.
 तांब्यांच्या सर्व कवितांमधून आशावाद भरून राहिलेला दिसतो, सारखा ओसंडत असतो, त्याचे रहस्य हेच आहे. मरणी अमरता आहे, ते सुखाचे दार आहे. ती हरिकरुणा आहे, तेथे तुला कवळण्यासाठी 'आई बाहू पसरून उभी आहे, असे त्यांना

अंतरंग दर्शन
१२५