पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अगदी बोजड रुपात केलेले, पण अत्यंत परिणामकारक विडंबन आहे. श्यामच्या व्यक्तिरेखेतून त्या वर्गाचे जे प्रतीक लेखकाने उभे केले आहे ते जास्त सूक्ष्म आणि म्हणूनच जास्त हृद्य आहे. उषा ही काही काल त्याला बळी पडली होती. पण ती लवकरच सावरली. गीता ही लहानपणीच त्या पोकळ तत्त्वांना बळी गेली होती. तिचे परिवर्तनही त्या वर्गाच्या भोंदू आचरणावर केलेली कडक टीका आहे. सतीश व काकाजी मात्र या कैफात कधी सापडले नाहीत. नाटकाच्या आरंभापासून शेवट पर्यंत 'न पेलणारी गोळी' हे एकच सूत्र गुंफले आहे. त्यामुळे त्या कलाकृतीला सुरेख घाट आला आहे. आणि आचार्यांच्या अंतरंग दर्शनाने त्याची शोभा द्विगुणित झाली आहे.
 सर्व जीवनाचा आलेख आतापर्यंत 'साहित्यांतील जीवनभाष्य' या विषयाचे दीर्घ विवेचन केले. या भाष्याची कल्पना स्पष्ट होण्यासाठी संस्कृत, मराठी इंग्रजी, फ्रेंच, अमेरिकन इ. भाषांतील अभिजात साहित्याची उदाहरणे दिली आहेत. ही उदाहरणे देताना एकेका ललित- कृतीतून त्या त्या विषयापुरतेच उदाहरण निवडले आहे. वामनराव जोशी, फडके यांच्या कादंबऱ्यातून मूल्यसंघर्षाचीच फक्त उदाहरणे निवडली आहेत. पण या लेखकांनी याच जीवनाच्या फक्त अंगावर भाष्य केले आहे, असे नव्हे. एक कादंबरी किंवा नाटक हे काही जीवनाच्या एकाच अंगाचे चित्र नसते. व्यापक जीवनाचा, कधी कधी सर्व जीवनाचा आलेख त्यात येत असतो. आणि त्या जीवनाचे प्रत्येक अंग लेखक आपल्या विशिष्ट दृष्टिकोणातून पाहूनच वर्णीत असतो. म्हणजे सर्वच जीवनावर तो आपल्या कृतीत भाष्य करीत असतो. वा. म. जोशी किंवा फडके यांच्या आपण विचारार्थ घेतलेल्या कादंबऱ्यात मूल्यसंघर्षाप्रमाणेच स्त्रीजीवनाचे दर्शन आहे, कला व नीती यांच्या संबंधाचे विचार आहेत, गांधीवाद आहे, हिंदु- मुस्लीम प्रश्न आहे, निसर्गसौंदर्य, चित्रकला यांचे मानवी जीवनातील महत्त्व आहे. मानवी जीवनाची अनेक अंगे आहेत. आणि त्यांविषयी दोघांनीही आपल्या दृष्टिकोणातून चित्रण केले आहे व विचार प्रदर्शनही केले आहे. पण आपण त्यातील आपल्या चालू विषयाची तेवढीच उदाहरणे घेतली आहेत. विषय व्यवस्थेच्या दृष्टीने तसे करणे अवश्यच होते. पण कवी किंवा लेखक सर्व जीवनाचा अवलोक आपल्या साहित्यात कसा करतो हे पाहणेही आपल्या विषयाच्या पूर्ततेसाठी अवश्य असल्यामुळे मराठीतील दोन थोर लेखक कविवर्य तांबे व पं. महादेवशास्त्री जोशी यांनी समग्र जीवन कसे पाहिले ते येथे सांगण्याचा विचार आहे.
 कविवर्य तांबे संसाराचे मर्म उकलून दाखविणे हे काव्याचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे असे तांबे यांनी 'रिकामे मधुघट' या आपल्या काव्यात सांगितले आहे. आणि, म्हातारपणामुळे मला तो मधू आता पिळता येत नाही, असे म्हणून क्षमा याचना केली आहे. याचा अर्थ असा की संसाराचे मर्म उकलण्यासाठी, या जीवनावर भाष्य करण्यासाठी माणसाच्या प्रज्ञा, बुद्धी, प्रतिभा, या सर्व शक्ती जागृत व कार्यक्षम असाव्या लागतात. त्या क्षीण झाल्या की काव्याचे ते उद्दिष्ट साधण्यास

१२४
साहित्यातील जीवनभाष्य