पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उदाहरणांनी स्पष्ट करीत नाही. आपला सिद्धान्त त्या महाकवींच्या काव्याला लावून दाखवीत नाही. त्यामुळे त्याच्या त्या सिद्धान्ताविषयी गैरसमज झाला आहे असे वाटते.
 येथे जाता जाता एक खुलासा करून ठेवणे अवश्य आहे. अर्नोल्डच्या मनात 'क्रिटिसिझम ऑफ लाइफ' म्हणजे नेमके काय आहे, हे स्पष्ट नाही, असे अनेकांनी म्हटले आहे. आणि आपापल्या परी त्याच्या त्या वाक्याचा भिन्न भिन्न अर्थ लावला आहे. ॲरिस्टॉटलच्या इमिटेशन, युनिटी, कॅथार्सिस या शब्दांबद्दल असाच दीर्घवाद आहे. क्रोचे, जॉन ड्यूई, यांच्या विचाराविषयी असेच वादंग माजलेले आढळते. आणि इतर क्षेत्रांतल्या प्रमाणे 'नैको ऋषिः यस्य वचः प्रमाणम् ।' अशीच येथेही स्थिती आहे. हे ध्यानी घेऊन मी अर्नोल्ड, गॅरॉड, ड्यूई यांच्या मतांसंबंधी काही इंग्रजीच्या पंडितांशी चर्चा केली आणि त्यांचे अर्थ मनाशी निश्चित केले. पण तरीही हे वादंग संपणार नाही; म्हणून 'जीवनभाष्य' याची माझी विवक्षा काय हे प्रारंभी व पुढेही ठायी ठायी स्पष्ट केले आहे. ती विवक्षा मनात धरूनच वाचकांनी हा प्रबंध वाचावा. मी जे वरील साहित्यशास्त्रज्ञांचे आधार दिले आहेत ते यथायोग्य आहेत की नाहीत हा प्रश्न गौण मानावा. कारण त्यांच्या वचनांच्या अर्थाविषयी एकमत कधी होऊ शकेल, असे वाटत नाही.
 इतक्या प्रस्तावनेनंतर आता विषयाच्या विवेचनाला प्रत्यक्ष प्रारंभ करावयाचा. अर्नोल्डने किंवा इतर पंडितांनी जे केले नाही तेच या प्रबंधात करावयाचे आहे. तोच त्याचा विषय आहे. विवेचनाच्या सोयीसाठी, महाभारत व रामायण यांतील भिन्न संस्कृती, रोमन व ख्रिश्चन संस्कृती, इंग्लिश व फ्रेंच संस्कृती, राजपुती व मराठी संस्कृती या भिन्न संस्कृतीचे दर्शन हा एक भाग; भांडवलदार, जमीनदार, शेतकरी इ. भिन्न वर्गांची संस्कृती हा दुसरा भाग; दलितजीवन, स्त्रीजीवन, मूल्यसंघर्ष, अंतरंग दर्शन हे आणखी भाग असे विषयाचे विभाग केले आहेत. त्यांतील एकेक विभाग घेऊन पाश्चात्य पौर्वात्य देशांतील अभिजात साहित्याच्या आधारे जीवनभाष्य हा साहित्याचा महनीय गुण कसा आहे, काव्याचा तो मौलीभूत अलंकार का मानतात. ते आता दाखवावयाचे आहे.

भिन्न संस्कृतींचे दर्शन

 १ रामायण व महाभारत भिन्न संस्कृतींवर भाष्य करून कवी त्यांतील भेद स्पष्ट करून दाखवितात, असे वर म्हटले आहे. साहित्यातील उदाहरणे घेऊन आता ते विशद करू. रामायण व महाभारत या दोन महाकाव्यात ज्या घटनांचे वर्णन आहे त्यांच्या कालात बरेच अंतर असले पाहिजे. समाजात शासनसंस्थेचा हळूहळू विकास होत जातो. त्यातल्या विकासाच्या एका पायरीवर रामायणकालीन समाज होता व त्याच्या बऱ्याच वरच्या पायरीवर महाभारतकालीन समाज होता, असे दिसते. समाजात प्रारंभीच्या अवस्थेत रक्ताच्या नात्याने निगडित असलेले एक

संस्कृतिदर्शन