पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांची सांरखी टिंगल करीत असतो. काकजींनाही मनात तसेच वाटत असते. उषा त्यांची मोठी भक्त, पण तिचे मनही डळमळले आहे. श्याम त्यांचा शिष्य झाला आहे. पण त्याचे वागणे व बोलणे म्हणजे आचार्यांचे मूर्तिमंत विडंबन आहे. पण असे आहे तरी, म्हणजे आचार्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे वर्तन कोणाला पसंत नसले तरी, त्यांची स्वतःची त्या तत्त्वज्ञानावर श्रद्धा नसेल अशी शंकाही कोणाला आलेली नव्हती. सतीश त्यांच्या तोंडावर व इतर लोक त्यांच्या मागे त्यांची चेष्टा करतात. पण ती त्यांच्या तत्त्वज्ञानाची, यमनियमांची, एकांतिक मनोवृत्तीची. ते हट्टाग्रहीं आहेत. त्यांना सामान्य विवेकही नाही. ते दुर्वास आहेत हे सर्वांना मान्य आहे. पण त्यांच्या अंतरात याहून काही भिन्न असेल असे मात्र कधी कोणाला वाटले नव्हते. पण शेवटी सर्वच त्यांच्यावर उलटली, उषा देवासकर फिरली. त्यांच्यावर, त्यांच्या सर्व जीवनक्रमावर व त्यांच्या तत्त्वज्ञानावर तिने कडक टीका करण्यास सुरवात केली. त्यांनी मुलीसारखी वाढविलेली गीता हीही उलटली. तिच्याही भावना उषासारख्याच आहेत, हे उषाच्या बोलण्यावरून त्यांना कळले तेव्हा त्यांचे मन ढासळू लागले, आणि शेवटी गीतेने 'त्यांना कुणीतरी सांभळले पाहिजे, लहान मुलासारखे सांभाळले पाहिजे. हल्ली ते लवकर चिडतात, रागावतात, ते आता थकले आहेत.' असे म्हणून त्यांना दयाविषय बनविले तेव्हा, आपण जगात संपूर्ण अपयशी झालो, हे त्यांच्या ध्यानी येऊन त्यांनी अट्टाहासाने टिकवून धरलेले निष्ठेचे आवरण फाटून गेले व त्यांनी स्वतःच आपले अंतरंग उघडे केले. ते म्हणाले; 'जवानीत सार्वजनिक कार्यात उडी घेतली; पण पुढे पोहता पोहता हात थकू लागले. तरी बाहेर निघून किनाऱ्याला येण्याची सोय नव्हती. सारा समाज मी किनाऱ्यांशी आलो की, मला परत आत ढकलायचा, आणि म्हणायचा; आचार्य, तुम्ही असंच धडपडत राह्यलं पाहिजे. संन्याशाची वस्त्रं एकदा अंगावर चढवली की, ती उतरून संसारी माणसाची वस्त्र चढवणं म्हणजे गुन्हेगाराची वस्त्र वढवण्यापेक्षा भयंकर. म्हणून मग तसाच निर्भयतेचे पाठ बडबडत राहिलो. माझा अहंकार मात्र जबर होता. जे बुद्धाला जमलं, जे ख्रिस्ताला जमलं, आम्ही हुरळलो- मलाही, आपण दीपस्तंभ असल्याचा अहंकार झाला. म्हणून शेवटी स्वतःला मी हास्यास्पद करुन घेतलं. गीता, तुझा आचार्य शेवटी दया करावी, कीव करावी असा वस्तू झाला.'
 याचा अर्थ असा की, आचार्यांनी न पेलणारी गोळी घेतली होती. कोणत्याही पंथातला आरंभीचा जोष गेला की त्या पंथात पडलेल्याची अशीच स्थिती होते. त्यांना ती गोळी पेलत तर नसते. पण तसे म्हणण्याइतका प्रामाणिकपणा किंवा धैर्य त्यांच्या ठायी नसते. राजकारणातच नव्हे तर धर्म, समाजकारण प्रत्येक क्षेत्रात असा एक वर्ग नेहमीच असतो. त्याचे फार सुंदर चित्रण देशपांडे यांनी या नाटकात केले आहे. भिकू, वासू, यांनी गांजाची न पेलण्याइतकी मोठी गोळी घेतली होती, आणि आत्मा अमर आहे, असा बकवा ते करीत होते. आचार्यांच्या सबंध वर्गाचे हे

अंतरंग दर्शन
१२३