पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिला वाटते. त्या पापाचे धनी व्हावे असे तिला वाटत नाही. ती त्यांचा म्हणते, 'जे अशक्य आहे ते बोलून काय उपयोग ? तुम्हाला मी कसे समजून सांगू ? माझे, दैन्य, माझे दुर्दैव पाहून तुम्हाला दया आली, व हे साहस करायला तुम्ही तयार झाला, हे औदार्य मला दिसत का नाही ? चराचरात सर्वत्र प्राणी जोडीने राहतात, वेल सुकली तरी पाणी मिळाल्यावर तिला फुले येऊ शकतात, असं तुम्ही परोपरीने सांगता. पण मला विधवेला हे कशाला ! सुखमंदिराशी मी आले. तेवढयात परमेश्वराने त्याचे दार बंद केले. देवाने बंद केलेले ते दार, तुम्ही मनुष्य असून उघडू पाहता. मला त्या मंदिरात न्यावे, अशी तळमळ तुम्हाला आहे. हे तुमचे ऋण मी फेडू शकणार नाही. पण मी पापिणी आहे, करंटी आहे, या मंदिराच्या बाहेर घिरट्या घालाव्या एवढीच माझी योग्यता. एखाद्या अनुरूप सखीला घेऊन तुम्ही आत जा. आणि आता आणखी काही बोलू नका. माझे धैर्य त्यामुळे ढासळेल आणि मोह पडून भलतेच उत्तर माझ्या तोंडून जाईल. तेव्हा असे नरकाचे भागीदार होऊ नका ! माझा कलंकित हात तुमच्या हाती न देता कोणाचा तरी शुभ, मंगल असा कर परमेश्वराने तुमच्या हाती यावा, अशी मी देवाजवळ नित्य प्रार्थना करीन.
 या तीन कवितांत हिंदूविधवेच्या मनातल्या सर्व भावना, वासना, विकार, तिच्या कल्पना, तिचे विचार यांचा कवीने भिन्न भिन्न भूमिका घेऊन उत्तम आविष्कार केला आहे. विधवा स्वतः बोलू शकत नाहीत, त्यांना काही अशा भावना असतात, हे समाजाला मान्यच नाही. तेव्हा त्यांचे दर्शन घडविण्याचे काम कवीने केले आहे. या हतभागी स्त्रियांच्या चित्तात केवढी जळ जळ, केवढा प्रक्षोभ, केवढा वडवानळ धग धगत असतो, याची सम्यक कल्पना, अगदी थोड्या शब्दांत कवीने दिली आहे. काव्यकलेचे यश ते हेच.
 ८ न पेलणारी गोळी अंतरंग दर्शनाचे आणखी एक असेच मनोवेधक उदाहरण सांगून हा विभाग संपवू. पु. ल. देशपांडे यांनी 'तुझे आहे तुजपाशी' या आपल्या नाटकात 'आचार्य' यांच्या अंतर्मनातले धागे दोरे फार उत्कृष्ट रीतीने पिंजून दाखविले आहेत. गांधी पंथाचा हा माणूस, कमालीचा कडक, व्रतस्थ, निग्रही, यमनियम संभाळणारा असा दिसतो. खाणेपिणे, स्नान, कपडे करणे, बोलणे, बसणे, या प्रत्येक बाबतीत आचार्यांना कमालीची शूचिर्भूतता हवी असते. यात कोणाचा काही प्रमाद झाला तर तेथे क्षमा नाही. आणि भीडभाडही नाही. उषा, काकाजी यांचा त्यांचा काही परिचय नसताना पहिल्या भेटीच्या वेळीसुद्धा आचार्य निरनिराळ्या कारणांवरून त्यांची कानउघाडणी करण्यास कमी करीत नाहीत. ते जीवनाचा सारखा गंभीरपणे विचार करतात, व इतरांनी तसेच करावे, असा उपदेश करतात. चित्तशुद्धी, आचारशुद्धी, मोह जिंकणे, अहिंसा, मौन, पश्चात्ताप, सत्यकथन, प्रार्थना, अनासक्ती हे शब्द सारखे त्यांच्या तोंडी असतात. आणि त्यांचे आचरणही त्यांना साजेसे असते.
 त्यांचे हे तत्त्वज्ञान कोणालाच मान्य नसते हे खरे. त्यांचा भाचा सतीश तर

१२२
साहित्यातील जीवनभाष्य