पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाजूस उभी राहून कानोसा घेत आहे, असे मला वाटले. तिने कधी पत्र लिहिलेले कुणाला माहीत नाही, पण एक दिवस तिच्या बोटाला शाई लागलेली मात्र दिसत होती, आणि कागदाचे तुकडे भोवती पसरलेले दिसले. रात्री ती अंथरुणावर जागत असलेली आढळली नाही, पण कधी कधी तिची उशी भिजलेली असावी असे वाटे. या नंतर ती हळूहळू खंगू लागली व शेवटी 'दीन दयाळा मरणा, सोडव यातून' असे म्हणत तिने जगाचा निरोप घेतला.
 सूर्य फूल 'बघुनि तया मज होय कसेसे' या कवितेत विधवेच्या तोंडूनच तिच्या मनातले भाव व्यक्त केले आहेत. वरच्या कवितेत कवीने तिच्या वर्तनावरून ते जाणले होते. अर्थात त्याला तिच्याविषयी सहानुभूती होती. म्हणूनच त्याला ते जाणवले. एरवी काही व्रतवैकल्यात चूक झाल्यामुळे, किंवा यात्रेला जायला न मिळाल्यामुळे, ती रडत असेल असे इतरांनी भाष्य केले असते. या कवितेत कवीच बोलतो आहे, पण तो तिच्या मुखाने बोलत आहे, 'मना, तुला वेड तर लागले नाही ना ? तू त्याच्यासाठी का झुरतोस ? मी एक हीन दीन ब्राम्हण विधवा, प्रेत उचलून टाकून द्यावे, तशी मला समाजाने टाकलेली आहे, माझे शरीर म्हणजे थडगेच आहे. मी सदैव त्यात असते. पण त्यामुळेच मनातल्या वासनांची भुते मला सारखी छळीत असतात. हातांनो, त्याच्या धोतरांच्या निऱ्या करून ठेवाव्या असे तुम्हाला वाटते, त्याच्यासाठी आसन घालावे अशी वासना तुम्हाला होते, पण याची जाणीव त्याला कधी तरी होणे शक्य आहे का ? तो कधी काही विचारणार आहे का ? तो आला म्हणजे डोळ्यांनो तिकडे का वळता ? कानांनो, त्याचे शब्द चोरून ऐकण्याची का धडपड करता ? माझ्या मनात जळजळ का व्हावी ? दुष्ट दैवा, मला अशी का छळतोस ? त्याच्या नेत्रांच्या प्रकाशात माझा जीव आनंदून जातो, त्याच्या सुखासाठी आपली आहुती द्यावी असे मनात नित्य येते, पण हे सर्व व्यर्थ आहे. हे मना, तुला कळत नाही का ? मग ही तडफड कशासाठी ? सूर्य आकाशात असतो, सूर्यफूल जमिनीवर असते. तो फिरतो तसे हे फिरते. त्याला त्याची दादही नसते. शेवटी तो मावळला त्या बाजूला मुख झुकवून फूल गळून जाते. तसं माझं आहे ! मग मना, उगीच आशा का धरतोस?'
 मी करंटी 'हिंदुविधवेचे मन' ही तिसरी कविता. पहिल्या कवितेत कवीने तिच्या दुःखाला शब्दांचा स्पर्शही होऊ दिला नाही. दुसरीमध्ये शब्द उमटले आहेत, पण ते मनातल्या मनात. त्या शब्दांना नाद नाही. या कवितेत एका उदार मनाच्या तरूणाने तिला मागणी घातली असताना तिने त्याला जे उत्तर दिले. त्यातून तिच्या भावनांना वाट करून दिली आहे. हिंदूविधवेच्या मनात संसार, मुलेबाळे यांचा मोह असतो, तिला सर्व वासना असतात, हे खरे. पण रुढी, धर्मशास्त्र, समाजाची जरब ज्यामुळे ती इतकी भयभीत झालेली असते की, संसाराची संधी चालून आली तरी तिचा धीर होत नाही. आपल्यामुळे त्या तरूणाचा अधःपातच होईल, अशी भीती

अंतरंग दर्शन
१२१