पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आता मात्र त्या शब्दाने तूही निर्देशिला जाशील. माझे अनन्यत्व, असामान्यत्व ते काय राहिले? त्या शब्दाने आता मला लाजच निर्माण होणार.'
 मानवाच्या हृदयसरात खोलवर दडून राहिलेले असे भाव न्याहाळून त्यांना प्रकाशात आणणे हे महाकवी खेरीज अन्यांना साधत नाही.
 ६ मातृहृदय परशुरामासारख्या वज्रकठोर तापसाच्या हृदयाचे दर्शन जसे कवीने घडविले आहे तसेच मातृहृदयाचे, त्यातील अत्यंत कोमल भावांचे, विरघळत्या वात्सल्याचे पण लोभस वर्णन त्याने केले आहे. रामलक्ष्मण लंकेहून परत आले. कौसल्या व सुमित्रा यांना त्यांना पाहून इतका आनंद झाला की डोळ्यांत आसवे जमल्यामुळे त्यांना पुत्र दिसेनातच. त्यांना जवळ घेतल्यावर केवळ स्पर्शानेच त्यांनी ज्यांना ओळखले. पण स्पर्श होताच त्यांच्या हाताला काय जाणवले ! रामलक्ष्मणांच्या अंगांवर राक्षसाच्या हत्यारांनी केलेल्या जखमांचे पुष्कळ वण होते. मातांची भावना अशी की ते वण अजून ओलेच आहेत. म्हणून त्या त्यांच्यावरून मायेचा हात फिरवू लागल्या. आणि तसा हात फिरविताना मनात काय आले ? कालिदास म्हणतो, 'क्षत्रिय कुळात जन्मलेल्या स्त्रियांना 'वीरमाता' होण्याची आकांक्षा असते. ती त्यांची सर्वश्रेष्ठ स्पृहा असते. पण पुत्रांच्या त्या जखमा पाहून त्यांना असे वाटले की 'वीरमाता' ही पदवी आपल्याला कधीही न मिळाली तरी चालेल. पुत्रांना त्यासाठी या यातना सोसाव्या लागत असतील तर नको ती ख्याती, नको ते भूषण. बाळ सुखात असले की झाले'
 ७ निःशब्द आत्मयज्ञ कविवर्य तांबे यांनी हिंदू विधवेच्या अंतरीचे सूप्त भाव असेच मोठ्या कौशल्याने वर्णिले आहेत. त्यांच्या काळी यमनियमांची इतकी बंधने तिच्यावर घातलेली असत आणि इतक्या निष्ठेने व भक्तीने ती पाळताना दिसत असे की, हिच्या मनात संसाराच्या काही वासना असतील, अशी शंकासुद्धा कोणाला येऊ नये. तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, पूजाअर्चा, कथापुराणे यांमुळे तिच्या मनातील वासना दग्ध झालेल्या असत, त्यांचे उन्नयन झालेले असे, असे सनातन पक्षांचे अभिमानी वर्णन करीत, आणि यातच हिंदुधर्मशास्त्राचे अलौकिकत्व आहे, असे सांगत असत. पण त्या अंतरंगाचा ठाव घेण्याचा कधी कोणी प्रयत्नच न केल्यामुळे त्याचे खरे रूप कधी कोणाला कळलेच नाही. कवीने आपल्या काव्यात त्याचे दर्शन घडविले आहे. 'निःशब्द आत्मयज्ञ' या कवितेत हिंदू विधवा ही मनातल्या मनात कशी जळत असली पाहिजे, ते स्पष्ट करून सांगितले आहे. कोणी तरुण पुरूष त्या कुटुंबाच्या नात्यातला होता. तो त्या घरी वरचेवर येत असे. पण त्याच्याशी ती बोलताना कधी कुणाला दिसली नाही. त्यांची दृष्टादृष्ट झालेलीही कधी कुणी पाहिली नव्हती. तो जेवायला आला तरी तिच्या चित्ताला हर्षविषाद कधी स्पर्शत नसत. त्याला मदनासारखे सुंदर रूप होते. पण तिने कधी डोळा उचलून त्यांच्याकडे पाहिले नव्हते. पण एक दिवस तो विधवांच्या दैन्याबद्दल बोलत असताना ती आतल्या

१२०
साहित्यातील जीवनभाष्य