पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कमलावरून उठून शकुंतलेच्या मुखाभोवती फिरू लागला. त्याला पाहून स्वतःचीच निर्भत्सना करू लागला. तो भृंगाला उद्देशून म्हणाला, 'अरे तू हिच्या इतका जवळ जातोस, तिला स्पर्श करतोस, तिच्या कानात काही रहस्य सांगतोस, आणि तिच्या अधराजवळ जाऊन तिचे चुंबनही घेतोस. हे सर्व आपण करावे, असा अभिलाष माझ्याही मनात निर्माण झालेला आहे. पण आम्ही थोरपदी असलेले राजे पडलो ! तेव्हा हे योग्य की अयोग्य, धर्म्य की अधर्म्य याची चिकित्सा करीत बसणारच. ही जी चिकित्सा, हा जो तत्त्वान्वेष म्हणजे योग्यायोग्य मीमांसा, हा जो अति विचार, त्याने आम्ही जखडून पडलो, गमावून बसलो. तू मात्र अशा तत्त्वान्वेषाच्या फंदात क्षणभरही न पडल्यामुळे आपला कार्यभाग साधून घेतलास आणि धन्य झालास.' हॅम्लेट म्हणाला की या अतिचिकित्सेमुळे, तत्त्वान्वेषामुळे मनुष्य दुबळा होऊन निष्क्रिय बनतो. दुष्यन्ताने त्याच शब्दात हा विचार सांगितला आहे. 'वयं तत्त्वान्वेषात् मधुकर, हताः ।' 'धर्माधर्ममिमांसेत गुंतल्यामुळे आम्ही वंचित झालो. येथपर्यंत दोघांची व्याकुळता सारखीच आहे. पण दुष्यन्ताने त्यातून चटकन स्वतःची मुक्तता करून घेतली. 'माझ्या मनाने दिलेला निर्णय हाच प्रमाण होय' असा ठाम सिद्धान्त त्याने केला. म्हणून तो कृतार्थ झाला. ते सामर्थ्य हॅम्लेट जवळ नव्हते. म्हणून त्याचा सर्वतोपरी नाश झाला.
 ५ अनन्यत्व गेले रघुवंशाच्या अकराव्या सर्गात कालिदासाने परशुरामाच्या अंतःकरणातील एक खोल कप्पा असाच उघडून दाखविला आहे. रामाने शिवधनुष्याचा भंग केला, हे ऐकून परशुरामाला संताप आला होता. कारण ते धनुष्य जनकाला त्याने दिले होते. त्यावर आपल्या खेरीज कोणीही प्रत्यंचा चढवू शकणार नाही असा त्याला अभिमान होता. धनुर्भंगाचे वर्णन करताना कालिदासाने म्हटलेच आहे की, 'मोडता मोडता, त्या धनुष्याने, क्षत्रिय हा पुन्हा उदयाला आला आहे, असेच जणू परशुरामाला सांगितले.' परशुराम त्यामुळे डिवचला गेला होता. तशात रामचंद्र अयोध्येला परत जात असताना परशुरामाची त्यांशी गाठ पडली. तेव्हा त्याने स्पष्ट परखड शब्दात रामचंद्रांना सुनावले की 'हे धनुष्य आतापर्यंत कोणालाच वाकविता आले नव्हते. ते वाकवून तू माझ्या शौर्य - पराक्रमाचाच अपमान केला आहेस.' येथपर्यंत परशुरामाच्या मनातला जो भाव प्रकट झाला आहे तो सहज समजण्याजोगा आहे. त्यात गहन असे काही नाही. आपल्या पराक्रमाचा अपमान झाला की वीरपुरुष संतापतो हे सत्य सर्वत्र महशूर आहे. पण त्यानंतर पुढच्या वाक्यातले त्याचे जे उद्गार आहेत. ते मात्र नित्याच्या पलीकडचे आहेत. ते ऐकल्यावर सयुक्तिक आहेत, असे आपल्याला सहज पटते. पण हे नवीन दर्शन आहे असे मात्र वाटते. व त्यामुळे निराळा आनंदही लाभतो. परशुराम म्हणाला, 'अरे आजपर्यंत जगात 'राम' शब्द उच्चारला की, मी परशुधारी राम एवढाच त्याचा अर्थ होत असे. राम शब्दाने एकच एक राम निर्देशिला जात असे. आणि

अंतरंग दर्शन
११९