पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनात विचार आला, 'माझ्या पित्याला याने झोपेत असताना मारले. झोपेत माणसाच्या मनात वेडेवाकडे, पापमय, विचार चालू असतात. अशा स्थितीत मरण आले म्हणजे मनुष्याला पापाची देवापुढे कबुली देऊन पापक्षालन करण्याची संधी मिळत नाही. म्हणजे माझे पिताजी नरकातच गेले असणार. आणि राजाला प्रार्थना करीत असताना मी ठार केले तर तो निश्चितच स्वर्गाला जाणार ! म्हणजे मी साधले काय ? तर पिताजींना नरकाला धाडल्याबद्दल मी याला स्वर्गात धाडणार ! वाः ! काय पण हा सूड ! छे छे ! आता याला मारता कामा नये. हा जेव्हा एखाद्या पाप विचारात किंवा दुष्ट कृत्यात गुंतला असेल तेव्हा याला ठार केले तरच तो सूड होईल. तेव्हा माझ्या खड्गा, तू परत ठिकाणी जा. तुला उपसण्याची वेळ अजून. आली नाही.'
 दुदैव असे की, ती पुन्हा केव्हाच आली नाही. हॅम्लेटच्या या निर्णयहीनतेने ती येऊच दिली नाही. आणि त्याच व्याधीने शेवटी या राजबिंड्याचा बळी घेतला.
 हॅम्लेटची मूळ कथा अगदी सामान्य होती. साहित्यात तिला स्थान नव्हते. शेक्सपीयरने मानवी जीवनाच्या, मनुष्याच्या मनाच्या एका अंगाचे दर्शन घडवून कार्यकारण भाव या शृखलेने त्या मूळच्या घटनात एक नवी, संगती दाखविल्यामुळे ती कथा विश्वसाहित्यात अक्षर होऊन बसली.
 ४. अंतःकरणाचा निर्णय हॅम्लेटशी तुलना करता कालिदासाचा दुष्यंत जास्त शहाणा ठरतो. कण्वमुनींच्या आश्रमात शकुंतला दृष्टीस पडताच त्याचे मन तिच्यावर जडले. पण लगेच त्याच्या मनात शंका आली. तो क्षत्रिय होता. आणि शकुंतला ही कण्वांची कन्या आहे, असे तिच्या सख्यांच्या तोंडून त्याने ऐकले होते. कण्व हे ब्राह्मण. त्यांची कन्या क्षत्रियाने वरणे हे त्या काळच्या चातुर्वर्ण्य नियमाच्या विरुद्ध होते. म्हणजे तो अधर्म होता. आणि धर्माचा रक्षणकर्ता जो राजा त्यानेच असा अधर्म करणे उचित नव्हते. म्हणून आपले मन हिच्यावर जडणे योग्य की अयोग्य अशी शंका येऊन त्याचे चित्त द्विधा झाले. पण लगेच त्याला दुसरी एक आशा वाटू लागली. तो म्हणाला की, ही शकुंतला कण्वांना ब्राह्मणेतर वर्णाच्या स्त्रीपासून झाली असण्याचा संभव आहे. तसे असल्यास मग मी हिला वरू शकेन. कारण मग ती ब्राह्मण वर्णाची असणार नाही. हा आशादायक विचार मनात येताच तसे निश्चितच आहे, असे त्याने स्वतःच ठरवून टाकले. तो म्हणाला, 'ज्या अर्थी माझ्यासारख्या श्रेष्ठ, पुरुषाचे सुसंस्कृत मन हिच्यावर जडले आहे, त्या अर्थी ही क्षत्रियाने वरण्यास योग्य अशी कन्या असलीच पाहिजे. कारण कोणत्याही बाबतीत संदेह निर्माण झाला असता. सज्जनांच्या अंतःकरण प्रवृत्तीने दिलेला निर्णय हाच प्रमाण असतो.'
 तत्त्वान्वेश दुष्यन्ताने असा निर्णय करून शकुंतला ही क्षात्रपरिग्रहक्षमा आहे, असे ठरविले तरी त्याचे मन पुनः पुन्हा साशंक होतच होते. तेवढ्यात एक भृंग

११८
साहित्यातील जीवनभाष्य