पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीवनाचे हे रहस्य शेक्सपीयरने घालून ठेवले आहे. तो म्हणतो, 'विवेक, विवेक ! या विवेकामुळेच मनुष्य दुबळा होतो, भित्रा होतो !' हॅम्लेट म्हणजे या अतिविवेकाचे मूर्त रूप.
 चुलत्याला ठार करावयाचे असे हॅम्लेटने ठरविले, पण त्याला शंका आली की, "त्या भुताने सांगितले ते खरे कशावरून ? सैतान पुष्कळ वेळा मनुष्याला पापप्रवृत्त करण्यासाठी अनेक रुपे घेऊन त्याला फसवतो. तसेच या वेळी झाले असेल. सैतानाने माझ्या पित्याचे रूप घेऊन मला मुद्दाम खुनाला प्रवृत्त करण्याचा विचार केला असेल, शक्य आहे. तेव्हा यापेक्षा जास्त भक्कम पुरावा हवा. याच वेळी गावात एक नाटक कंपनी आली होती. तिच्याकडून आपल्या पित्याच्या खुनाच्या प्रसंगाचे नाटक बसवून घ्यावयाचे आणि ते पाहत असताना आपल्या चुलत्याच्या मुद्रेवर काय भाव दिसतात, ते निरखावयाचे आणि त्यावरून निर्णय करावयाचा, असे हॅम्लेटने ठरविले. त्यावेळी जर तो गडबडला, आपले रहस्य फुटले म्हणून घाबरुन उठला तर मात्र तोच खुनी हे निश्चित आणि मग......
 पण या मधल्या काळात हॅम्लेटचे चित्त सारखे दुभंग राहिल्याने तो अगदी हैराण होऊन गेला. आणि जीवनाचा अंत करुन टाकावा असे त्याला वाटू लागले. पण त्याही बाबतीत त्याचा निर्णय होईना. जगावे की मरावे, हाही प्रश्न त्याला सोडविता येईना. कारण काय ? आत्महत्या कशासाठी करावयाची ? मनाला इंगळ्या लागल्या आहेत, यातना असह्य झाल्या आहेत, दगाबाजी, विश्वासघात, कृतघ्नता, यामुळे झालेला संताप सहन होत नाही. तो सर्व ताप एका क्षणात नष्ट व्हावा, मन मुक्त व्हावे. म्हणूनच ना मरण पत्करावयाचे? पण मेल्यावर माणूस मरतो हे तरी निश्चित आहे का? हा देह टाकल्यावर आत्मा तसाच रहात असला, मन मागे उरतच असले, तर जिवंतपणीच्या सर्व यातना तशाच राहणार. मग मरुन तरी काय उपयोग'
 मरणाच्या बाबतीतही आपण निर्णय करू शकत नाही, हे पाहून हॅम्लेट स्वतःवरच चिडून गेला. तो म्हणाला, 'विचार, विचार ! हा अतिविचार ! यानेच माणूस दुबळा होतो आणि कोणतीच कृती त्याच्या हातून घडत नाही'
 आपला दोष हॅम्लेटच्या ध्यानी आला, पण तो त्याच्या रक्तातच भिनला होता. त्यामुळे जाणीव होऊनही तो त्याला घालवू शकला नाही. नाटक कंपनीच्या लोकांनी राजाच्या खुनाचा प्रसंग बरोबर वठविला. तो पाहून हॅम्लेटचा चुलता घाबरून उठला व नाट्यगृहातून निघून गेला. आता हॅमलेटला हवा होता तो पुरावा मिळाला होता. तेव्हा पित्याच्या आज्ञेप्रमाणे चुलत्याला ठार मारून खुनाचा बदला घ्यावयाचा हा त्याचा निश्चय झाला. पण निश्चय टिकला तर तो हॅम्लेट कसला ?
 सुरा घेऊन हॅम्लेट चुलत्याच्या महालात गेला. आणि आता त्याला ठार करणार तोच त्याला शंका आली. राजा गुडघे टेकून प्रार्थना करीत होता. हॅम्लेटच्या

अंतरंग दर्शन
११७