पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तो म्हणाला, 'रामचंद्रा, आज तुम्हाला काय झाले आहे ? सर्व भूतांचे नाथ तुम्ही. आज अनाथासारखे अश्रू ढाळता ? हे आहे काय ?'
 पुढच्याच क्षणी रामचंद्र स्थिरमन झाले व त्यांनी धनुष्यावर बाण सज्ज केला.
 रामचंद्रासारख्या महाधनुर्धराचे धैर्य क्षणभर तरी लुप्त होईल, हे आपल्याला शक्य वाटत नाही. आणि पितृमरणापेक्षा दुसरे कोणते दुःख त्यांना जास्त जाणवेल. हेही खरे वाटत नाही. पण तसे झाले, क्षणभर का होईना तसे झाले. असे महाकवी वाल्मीकी यांनी लिहून ठेविले आहे.
 श्रीकृष्णांचाही असा एकदा धैर्यलोप झाल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे. त्यांचे शाल्वाशी युद्ध चालू होते. शाल्वाने त्यांचा पिता वसुदेव याची मायेने एक मूर्ती निर्माण करून तिचा शिरच्छेद केला. ते खरे भासून श्रीकृष्णांना भोवळ आली. त्यांच्या हातातून शार्ङधनुष्य गळून पडले. आणि मुहूर्तभर ते मूर्च्छित झाले !
 ३ निर्णय शक्ती नाही हॅम्लेट या नाटकात कवीने हॅम्लेटच्या दोलाचलवृत्तीचे, निर्णयशक्तीहीन मनाचे, शंकाविकल बुद्धीचे कसे वर्णन केले आहे पहा. या नाटकाचे कथानक शेक्सपीयरने उसने घेतलेले आहे. त्यातील स्वभावरेखाही त्या मूळच्या नाटकातल्याच आहेत. मग यात शेक्सपीयरचे स्वतःचे काय आहे ! त्याने लाविलेला त्यातील घटनांचा अर्थ ! शेक्सपीयर आपल्याला तेथे भेटतो. नाटकातील घटनात किंवा व्यक्तिरेखांत नाही. त्या व्यक्तीच्या जीवनाचे रहस्य उकलून दाखविणे, त्या घटनांची संगती लावून दाखविणे यांत कवीचे कवित्व आहे.
 दुभंग मन हॅम्लेटच्या वडिलांचा त्याच्या चुलत्याने खून केला होता. आणि सर्पदंशाने त्याला मृत्यू आला, असे जाहीर करून भावाचे राज्य व त्याची पत्नी यांचा त्याने अपहार केला होता. हॅम्लेटला या प्रकरणी शंका येत होती. पण वस्तुस्थिती माहीत नसल्या कारणाने त्याला काही करता येत नव्हते. पण एका रात्री भुताच्या रूपात वडिलांनी येऊन त्याला खरी गोष्ट सांगितली आणि 'माझ्या या खुनाचा तू सूड उगवला पाहिजे' अशी त्याला आज्ञा दिली. दुसरा कोणी तरूण हॅम्लेटच्या जागी असता तर संतापाने बेभान होऊन सुरा घेऊन धावला असता व क्षणार्धात त्याने चुलत्याला ठार केले असते. हॅम्लेटची पहिली प्रतिक्रिया तशीच झाली. वडील 'तुला त्याचे नाव सांगतो,' असे म्हणताच एकदम, 'सांगा, सांगा, लवकर सांगा, म्हणजे वायुवेगाने, मनाच्या वेगाने मी जातो आणि बदला घेतो' असे तो म्हणाला होता. आणि भूत अंतर्धान पावताच त्याने तशी शपथही घेतली होती. पण हॅम्लेटच्या हातून हे त्वरेने तर नाहीच घडले, पण केव्हाही पुढे घडले नाही. का ? हॅम्लेटची अतिविचारी वृत्ती ! द्विधा वृत्ती ! या नाटकाचे वर्णन करताना एका टीकाकाराने म्हटले आहे की द्विधावृत्तीच्या मनाची ही शोकांतिका आहे. अति विचाराने माणसाच्या मनाची कार्यशक्ती विकल होते. कोठल्याच बाबतीत त्याचा निर्णय म्हणून होत नाही. त्यामुळे तो कृती करूच शकत नाही. स्वतः हॅम्लेटच्या तोंडीच मानवी

११६
साहित्यातील जीवनभाष्य