पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कॅपिटॉलमध्ये एखादे वेळी येणारही नाही. मग सगळाच घोटाळा होईल. यावर डेसियस ब्रूटस म्हणतो, 'ते तुम्ही माझ्यावर सोपवा. तुम्ही मुळीच काळजी करू नका. त्याने न येण्याचे ठरविले तरी मी त्याचे मन वळवीन.' डेसियसच्या बोलण्याचा इतरांना विस्मय वाटला. तसे त्यांच्या मुद्रेवर दिसू लागले. तेव्हा डेसिस म्हणाला, 'सीझर हा स्तुतिवश आहे. माणसे प्रशंसेच्या शब्दांनी चढून जातात व फसतात असे तो नेहमी म्हणतो. पण तो स्वतःच स्तुतिप्रिय आहे!' वास्तविक सीझरची याच्या अगदी उलट ख्याती होती. त्याला तोंडपूजा लोकांचा तिटकारा होता. आणि तो प्रशंसेला मुळीच भुलत नाही हे प्रसिद्ध होते. त्यामुळे इतर कटवाल्यांना विश्वास वाटेना. तेव्हा डेसियस पुढे म्हणतो, 'तुमची शंका बरोबर आहे. पण मी सीझरशी बोलताना त्याला हेच सांगतो. आपल्याला आत्मस्तुती आवडत नाही, खुशमस्कऱ्यांचा आपल्याला तिटकारा आहे. आपण स्तुतिप्रिय नाही, आपण कधी प्रशंसेच्या शब्दांनी भुलणार नाही! आणि मौज अशी की, हीच स्तुती सीझरला इतकी आवडते की, तो अगदी भुलून जातो. तेव्हा तुम्ही चिंता करू नका. त्याला आणणे माझ्याकडे लागले' आत्मस्तुतीचा अत्यंत तिटकारा असलेला मनुष्य 'तसा तिटकारा तुम्हाला आहे' या स्तुतीने भुलून जातो, ही स्तुती त्याला प्रिय होते ! हे अंतरंगदर्शन.
 रामचंद्रांचा धैर्यलोप श्रीरामचंद्रांची कीर्ती अशी की, ते परम पितृभक्त होते. पित्याच्या वचनासाठी त्यांनी राज्यत्याग केला. त्यांची तशी कीर्ती आहे व त्यांनी राज्यत्याग पित्राज्ञेसाठी केला, हे खरे आहे. पण रामायणातील पुढील प्रसंग पहा. सीतेसह रामलक्ष्मण अरण्यातून चालले असता, एका वृक्षाखाली एक महाभयंकर विकटमुख, घोरदर्शन, बीभत्स असा विराध नावाचा राक्षस त्यांच्या दृष्टीस पडला. त्या विराधाची दृष्टी त्यांच्याकडे वळताच घोर गर्जना करीत तो धावून आला आणि त्याने सीतेला उचलून खांद्यावर घेतली. रामलक्ष्मणाला तो म्हणाला, 'अरे तुम्ही तापसी दिसता. मग ही स्त्री तुमच्या बरोवर कशी ? तुमची घटका भरली म्हणून तुम्हाला येथे येण्याची बुद्धी झाली आहे. आता ही स्त्री माझी बायको होईल. तिच्या देखत मी तुम्हाला कंठस्नान घालणार आहे.'
 हे भयंकर दृश्य पाहून क्षणभर रामचंद्रांचे धैर्य लुप्त झाले. त्यांच्या तोंडाला कोरड पडली. ते लक्ष्मणाला म्हणाले, 'काय विपरीत गोष्ट झाली ही! अरे आज कैकेयीचे मनोरथ खरे पूर्ण झाले. पुत्राला राज्य मिळूनही ती संतुष्ट झाली नाही. मला तिने वनात धाडले. पण वनात मला दुःख झालेच नाही आज मात्र तिची इच्छा तृप्त झाली. कारण वैदेहीला परपुरूषाचा स्पर्श व्हावा यापेक्षा मला जास्त दुःख कशाचेही नाही. लक्ष्मणा, पिताजींच्या मृत्यूमुळेही मला इतके दुःख झाले नव्हते. राज्य गेले त्याचेही मला काही वाटले नाही. पण आजचे दुःख मात्र असह्य आहे.' हे बोलताना रामचंद्रांच्या डोळ्यांला अश्रुधारा लागल्या. हे पाहून लक्ष्मणं अत्यंत विस्मित झाला

अंतरंग दर्शन
११५