पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 अं त रं ग द र्श न



 सुप्त मन मानवी मनाचे अंतरंग स्पष्ट करून दाखविणे याला जीवनदर्शनात फार महत्त्व आहे. पुष्कळ वेळा मानवाच्या वर्तनावरून केलेले अदमास, त्याचे अंतरंग पाहिल्यावर, अगदी चुकीचे ठरतात. व्यवहारात अमुक मनुष्य धीट आहे, अमुक भित्रा आहे, हा उदार आहे, तो कंजुष आहे, अमका चंचल आहे, अमका दृढ आहे, हा गरीब आहे, तो भांडखोर आहे, असे लोक म्हणत असतात. पण काही प्रसंगी याच्या अगदी उलट अनुभव येतो. अलीकडे मनोविश्लेषणाचे स्वतंत्र शास्त्रच तयार झाले आहे. हे शास्त्रज्ञ माणसाच्या बोलण्यावरून, त्याला पडलेल्या स्वप्नांवरून, त्याने काही प्रश्नांना दिलेल्या उत्तरांवरून, त्याच्या मनाचे असे काही चित्र काढतात की, त्या माणसाला स्वतःलाच धक्का बसावा. या शास्त्रज्ञांनी अंतर्मन व बहिर्मन, जागृत मन व सुप्त मन अशी दोन मने किंवा एकाच मनाचे दोन भाग कल्पिले आहेत. आणि त्या शास्त्राच्या साह्याने मानवाच्या सुप्त मनाचे पापुद्रे उकलून दाखविणे हा अनेक साहित्यिकांना छंदच लागलेला आहे. प्राचीन काळी दोन मनाचे हे शास्त्र कवींना माहीत नसले तरी मानवी मनाच्या अंतरंगात शिरून त्याचे बहुविध व्यापार कसे चालतात ते वर्णन करून सांगण्याची शक्ती त्यांच्या ठायी निश्चित होती. अशा कवींनी आपल्या साहित्यात मानवाच्या अंतरंगाचे जे दर्शन घडविले आहे त्याचे सौंदर्य आता आपणास पहावयाचे आहे.
 १ स्तुतीचा लोभ 'ज्यूलियस सीझर' या शेक्सपीयरने लिहिलेल्या नाटकातील उदाहरण पहा. सीझरच्या वधाचा कट चालला आहे. त्याची रूपरेखा निश्चित करण्यासाठि कॅसियस, कॅसका, डेसियस ब्रूटस, मार्कस ब्रूटस इ. कटवाले यांनी बैठक भरविली आहे. कॅपिटॉलमध्ये सभा भरेल त्यावेळी हे काम करावयाचे असे जवळजवळ निश्चित झाले. पण तेवढ्यात कॅसियसला शंका आली. आज हवा वादळी आहे. अनेक अशुभ लक्षणे होत आहेत. तेव्हा आज सीझर

११४
साहित्यातील जीवनभाष्य