पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ते भाष्य अतिशय गहन गंभीर, प्रतीतिकारक, सार्थ व अमोघ असे असले पाहिजे आणि काव्य सौंदर्याची हानी न करता ते केलेले असले पाहिजे. काव्यातील सत्य व सौंदर्य यांचे काही निश्चित नियम आहेत. ते संभाळून जो कवी जीवनाच्या अथांग सागरात खोलवर जाऊन तेथली रत्नमाणके वर काढील त्यालाच अभिजात ही पदवी मिळेल. विदग्ध साहित्याचा अर्नोल्डच्या मते हा निकष आहे. या पुस्तकातील पहिल्या निबंधात त्याने केवळ काव्याचा विचार केला आहे. पण पुढे बायरनवरील निबंधात 'साहित्य गद्य उम्सो पद्म असो, जीवनभाष्य- क्रिटिसिझम ऑफ लाईफ- हेच त्याचे अंतिम उदिष्ट व साध्य असते,' असा त्याने खुलासा केला आहे. (पृ. १८६)
 मॅथ्यू अर्नोल्डच्या या पुस्तकात एक मोठी उणीव आहे. जीवनभाष्य हा श्रेष्ठ साहित्याचा निकष होय असे पुनः पुन्हा सांगूनही या आपल्या सिद्धांताचे जितके साकल्याने विवेचन करणे अवश्य होते तितके त्याने केलेले नाही. आरंभीच्या निबंधात काव्याची तात्त्विक चर्चा करून पुढे वर्डसवर्थ, बायरन, शेले, टॉलस्टॉय अशा थोर साहित्यिकांच्या साहित्याचे त्याने विवेचन केले आहे. पण आपल्या जीवनभाष्याच्या सिद्धांताअन्वये त्या साहित्याचे परीक्षण हा करील, अशी जी प्रारंभीच्या निबंधावरून अपेक्षा होते तिचा अगदी भंग होतो. हा सिद्धांत तो विसरला असावा, असे वाटण्याइतका अशा विवेचनाचा अभाव त्यात जाणवतो. 'हा संसार म्हणजे एक स्वप्न आहे, आणि मानवी जीवनाचा अंत चिरनिद्रेत होतो.' हे शेक्सपीयरचे सुप्रसिद्ध वचन आणि 'मनुष्याने रागद्वेषातीत असावे, आणि दीर्घ की अल्प आयुष्य याचा विचार परमेश्वरावर सोपवून मिळालेले जीवन उत्तम व्यतीत करावे.' हे मिल्टनचे वचन अशी दोन वचने त्याने उहाहरणे म्हणून दिली आहेत. पण यांतील तत्त्वांना साहित्यात या महाकवींनी मूर्त रूप कसे दिले आहे, हे मुळीच दाखविले नाही. कवीने. मानव, निसर्ग व मानवी जीवन या संबंधीच्या आपल्या कल्पना, आपली तत्त्वे, काव्यात जीवनाला लावून दाखविली पाहिजेत, असे तो म्हणतो. होमरने तसे केले यात त्याच्या थोरवीचे रहस्य आहे, असे तो सांगतो. मानवाने जीवनाची वाटचाल कशी करावी, हे दाखविणे, अंधारात चाचपडणाऱ्यांना मार्ग दाखविणे, हे साहित्याचे कार्य आहे, त्याच्या विदग्धतेचा निकष आहे, असे वारंवार तो प्रतिपादितो. पण थोर साहित्यिकांनी हे कसे केले आहे, हे विपुल उदाहरणांच्या साह्याने विशद करावे हे त्याला सुचत नाही, याचे आश्चर्य वाटते.
 जॉन ड्यूई याने आपल्या 'आर्ट ॲज एक्सपीरियन्स' या वर निर्देशिलेल्या ग्रंथात अर्नोल्डवर हाच आक्षेप घेतला आहे. काव्य हे जीवनभाष्य कोणत्या पद्धतीने करते, हे अर्नोल्ड सांगत नाही, असे तो म्हणतो. काव्याने प्रत्यक्ष बोध न करता जीवन मूर्त करून तो केला पाहिजे असे सर्वच साहित्यशास्त्रज्ञ म्हणतात. अर्नोल्डचे असेच मत असावे असे वाटते. 'काव्य सौंदर्याची हानी न करता कवीने भाष्य केले पाहिजे,' असे तो दर ठिकाणी आवर्जून सांगतो. पण आपले म्हणणे

साहित्यातील जीवनभाष्य