पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या गावच्या कर्मठ पण नीतिहीन ब्राह्मणाच्या वर्तनावर वाटेल तसे तोंड सोडू लागला. नानांचा मुलगा दिनकर हा त्याचा बालमित्र. तोही आता भिक्षुकी करू लागला होता. त्याच्या ध्यानात येई की खरा धर्म बापूजवळच आहे. पण उघडपणे तसे बोलण्याची त्याची छाती नव्हती. कारण त्याचा धंदा भिक्षुकीचा. पण गुप्तपणे तो बापूला येऊन भेटे. रावजी मेल्यावर बापू राधेजवळ उघडपणे राहू लागला. प्रथम दिनकरही यामुळे जरा दुरावला. पण त्याच्या ध्यानात आले की राधा ही लग्नाच्या बायकोपेक्षाही बापूशी एकनिष्ठ आहे. त्याने मावशीला स्वतः तसे सांगितले. तो म्हणाला, 'राधा लाख माणूस आहे. ती वापूची फार काळजी घेते. ती आहे म्हणून बापू कह्यात आहे.' बापूने नवे घर बांधले. तेव्हा वास्तूशांतीला सर्व गारंबी लोटली. पण दिनकर मात्र गेला नाही. तो व्याघ्रेश्वराच्या मंदिरात जाऊन बापूच्या कल्याणासाठी अभिषेक करीत बसला होता. पण पुढे हळूहळू तो धीट झाला व बापूच्या घरी जाऊन राधेशी बोलू लागला. ती त्याला भावजी म्हणे, तोही तिला वहिनी म्हणू लागला. आणि अशा रीतीने या भिक्षुकाकडून लेखकाने बापूच्या धर्मावर शिक्का मोर्तब करविले.
 कर्मकांड आणि मानवता या दोन धर्मतत्त्वात सनातन काळापासून चालू आहे. टिळे, टोपी, माळा, भस्म, गंध, व्रते वैकल्ये, पूजाअर्चा हे बाह्याचार दिमाखाने पाळून खाजगी रीतीने वाटेल ते अनाचार करणारे लोक समाजात नेहमी असतात. आणि त्या बाह्याचारांना समाज खरा धर्म मानीत असल्यामुळे अशा लोकांना समाजात मोठी प्रतिष्ठा असते. अण्णा खोत तशापैकी मनुष्य होता. पांडभटादी गावचे भिक्षुकही त्यांतलेच होते. अशा समाजात दया, सहानुभूती, वात्सल्य, माया, एकनिष्ठा लोकसेवा, परोपकार, सचोटी, मनाची शुद्धता हाच खरा धर्म, असे मानणारा कोणी तरी धाडसी माणूस मधूनच निर्माण होतो. प्रारंभी त्याचा छळ होतो. पण स्वतःच्या तेजाने, कर्तृत्वाने तो त्यावर मात करून वर येतो. बापू हा त्या जातीचा मनुष्य होता. राधा ही त्याची सहचरी त्याच्याच जातीची होती. ब्राह्मणांनी त्यांचे लग्न लावण्याचे नाकारले तरी सूर्याच्या साक्षीने त्या दोघांनी लग्न लावले. अशा लग्नानंतरही ती खरीखुरी पतिव्रताच राहिली. कारण माणुसकी हाच तिला खरा धर्म वाटे. मावशी आजारी पडली तेव्हा ती धावत तिच्याकडे गेली आणि शेवटपर्यंत तिने, खऱ्या सुनेने करावी, तशी तिची सेवा केली. बापूनेही हाच धर्म मानला होता. गारंबीला त्याने शाळा बांधून दिली, नदीवर पूल घातला, विहीर खणली व सीमेटचा पाट काढून दिला. दीनदुःखितांना तो मुक्त हस्ताने मदत करी. आणि यामुळे आपणच खरे नीतिमान, खरे आस्तिक, खरे धर्मशील असा त्याचा दावा होता. तो म्हणे 'मी फक्त माझ्या मनाला भितो.' सर्व धर्मांनी धर्माची अंतिम कसोटी हीच सांगितली आहे. बापू एकदा दिनकराला म्हणाला, दिन्या अरे या गारंबीत खरं पाप पुण्याच्या मिजाशीत वावरतं आहे, आणि माझ्यासारख्या गरिबावर पापी म्हणून शिक्का पडतो आहे. पण ध्यानात ठेव, एक दिवस या पापाच्या भाराखाली गारंबी पिचेल.

११२
साहित्यातील जीवनभाष्य