पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचित्र कल्पनांचा जुलूम किती सहन करावयाचा? असे त्याच्या मनात येऊ लागले अशाच एका प्रसंगी काकांशी बोलताना तो म्हणाला, 'मी तुमचा मुलगा असतो तर बरं झालं असत.' हे शब्द तोंडून गेल्याबद्दल मग त्याला वाईट वाटले, हा पितृद्रोह आहे, असेही त्याच्या मनात आले. पण तो काकांना म्हणाला, 'काका श्रद्धा व प्रेम यातील ही झुंज मला कधी कधी सहन होत नाही.' यामुळेच शेवटी या अटकेपार जाण्याचे त्याने ठरविलें. उमरखान नावाच्या एका मुसलमान व्यापाऱ्याच्या मीनाक्षी नावाच्या कन्येवर त्याचे प्रेम जडले होते. वडिलांना ते पसंत पडणार नाही हे निश्चितच दिसत होते. तरीही ही अटक आता ओलांडावयाचीच असा त्याने निश्चय केला. आणि त्याप्रमाणे त्याने वडिलांना पत्रद्वारे कळविले व माईला तसे सांगितले, माईसुद्धा यावर रागावेल असे त्याला वाटले होते. पण ती म्हणाली, 'बहिणीचं मन कसं असतं तुला कळलं नाही सुधीरभाऊ. तुझं अंतःकरण माझ्यासाठी कसं तिळतिळ तुटतं मला माहीत आहे. देवानं असा भाऊ जन्मोजन्मी द्यावा अशी मी प्रार्थना करीत असते. अन मग केवळ लौकिका वेगळं तू लग्न केलस म्हणून माझी प्रीती टळेल असे तुला वाटतं तरी कसे ?'
 सुधीरच्या मनात आले 'तर्कशक्तीच्या अभिमानाने जुन्याला मिठी मारणारा पुरुष आणि प्रेमाच्या माणसाने लौकिकाविरुद्ध काही केले तरी ते प्रिय मानणारी- स्त्री यातील खरे प्रगमनशील कोण ?'
 आई, माई, व काका यांच्या या निरपेक्ष प्रेमानेच शेवटी सुधीरच्या मनातले द्वंद्व संपले.
 ७ गारंबीतील संग्राम कर्मकांड व मानवता, जड आचारधर्म आणि सचोटी, निष्ठा, औदार्य, दान-धर्म यांच्यामधल्या द्वंद्वाचे जरा निराळ्या तऱ्हेचे चित्रण श्री. ना. पेंडसे यांनी 'गारंबीचा बापू' या आपल्या काबदंरीत केले आहे. आणि मानवता, निरपेक्ष प्रेम, एकनिष्ठा हाच श्रेष्ठ धर्म होय असा अंतीम निर्णय दिला आहे. गारंबी हे कोकणातले एक खेडे. विठोबा सामल हा तेथला एक गरीब, दीन, दरिद्री पाणक्या ब्राह्मण. बापू हा त्याचा मुलगा. एशी ही विठोबाची बायको. तरुणपणी ही फार सुरेख होती. गावचे अण्णाखोत यांनी तिला नादी लावले व तिला गर्भ राहिल्यावर प्रथम तिला औषधे दिली आणि त्यांनी जमले नाही तेव्हा विठोबा या आश्रित पाणक्याशी तिचे लग्न लावून दिले. बापू हा अशा रीतीने खरा अण्णा खोतांचा मुलगा. पण जाहीरपणे तो विठोबाचा मुलगा होता. बापू स्वतः तसेच मानीत असे. कारण त्याला सत्य माहीत नव्हते. बापूची आई एशी ही लग्न झाल्यावरही गावभवानीच राहिली. त्यामुळे विठोबाकडे व बापूकडे सर्व गाव तुच्छतेने पाही, त्यांच्याबद्दल कुत्सिततेने बोले. बापूला वागवणूकही आश्रिताच्या, गावभवानीच्या पोरासारखीच मिळे. आणि दुसरा एखादा मुलगा तसाच मोठा होऊन बापासारखाच पाणक्या किंवा हॉटेलातला पोऱ्या झाला असता.

११०
साहित्यातील जीवनभाष्य