पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जशी भक्ती होती तशीच काकांच्यावरही होती. वेदान्त, कर्मकांड यांमुळे शंभूरावांच्या मनातील प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य यांचे झरे आटून गेले असून बाह्यतः तरी ते अगदी शुष्क होऊन गेले होते. सुधीरची आई नवज्वराने आजारी होती. पण जाता- येता, ताप कसा काय आहे, असे विचारण्या पलीकडे ते तिची चवकशी करीत नसत. त्यांचे जप जाप्य, वेदान्तचर्चा हे सर्व नित्याप्रमाणे चालू होते. प्रेमाने, जिल्हाळ्याने बायकोशी, मुलाशी दोन शब्द बोलणे, हे त्यांना माहीतच नव्हते. केशव काकांच्याकडे याच्या उलट स्थिती होती. त्यांच्याकडे सुधीर गेला की ते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत. आनंद, उल्हास यांनी त्यांचे घर नेहमी भरलेले असे. तर शंभूरावांच्या घरावर नेहमी सुतकी कळा असे.
 शंभुरावांचा कर्मकांड हा धर्म होता, पण मानवता, प्रेम, वात्सल्य, औदार्य, स्नेह यांचा त्यांच्या चित्तातून लोप झाला होता. उलट ते सर्व मृदु, कोमल भाव केशवकाकांच्या हृदयात ओसंडून जात असत. पण रूढ धर्माचाराच्या दृष्टीने ते पाखंडी होते. ते पंजाबात गेले असताना सकीना नावाची मुसलमान मुलगी त्यांच्या आश्रयाला आली. तिचा मामा तिला कुंटणखान्यात विकणार होता. त्यातून केशवकाकांनी तिला सोडविले व तिलाच आपली सहधर्मचारिणी बनविले. लग्नाची त्यांना आवश्यकता वाटलीच नाही. पण ती त्यांच्याशी अत्यंत एकनिष्ठ असल्यामुळे त्यांचे तिच्यावर अलोट प्रेम होते. ती आजारी पडली तर कामधंदा सोडून ते सारखे उशापायथ्याशी बसून तिची शुश्रूषा करीत. सुधीरवर तिची फारच माया होती. तो आला म्हणजे त्याच्या आवडीचे पदार्थ करून त्याला घालण्यात तिला आनंद वाटे. काका, सकीना व सुधीर एकत्र बसून आनंदाने गप्पा मारीत जेवण करीत. सुधीरच्या स्वतःच्या घरी हे केव्हाच शक्य नव्हते.
 साऱ्याचे मूळ ही दोन दृश्ये नित्य डोळ्यासमोर सतत राहिल्यामुळे सुधीरच्या मनात नेहमी जुनी संस्कृती व नवी संस्कृती, श्रद्धा व प्रेम, कर्मकांड व मानवता या मूल्यांचा संघर्ष चाले. वडिलांच्यावर त्याची निरतिशय भक्ती होती. त्यांचे शुद्ध आचरण, करारी स्वभाव, त्यांच्या मुद्रेवरचे पावित्र्य यांचा त्याच्या मनावर वचक असे. पण यात जिव्हाळा, वात्सल्य, सहानुभूती मुळीच नाही याची त्याला खंत वाटे. कोणत्याही विषयावर त्यांच्या घरात मनमोकळेपणे बोलणे होतच नसे. दादा नेहमी तुसडेपणाने, कजागपणे बोलत. सुधीरचा साहेबी पोशाख, हाताने दाढी करणे हा त्यांना अधर्म वाटे. त्यामुळे त्याच्या लग्नाच्या बाबतीत आपण लक्ष घालावयाचे नाही, असे त्यांनी ठरविले व लक्ष्मीबाईना तसे सांगितले. त्या मुलाच्या बाजूने बोलावयास गेल्या तर संतापून ते पानावरून उठून गेले आणि रात्रीचे जेवणच त्यांनी बंद केले. आईला अशा यातना सोसाव्या लागतात याचे सुधीरला वाईट वाटले व त्याने आईला सांगितले, 'आई, तुझ्या पसंतीची मुलगी तू पहा. मी तिच्याशी लग्न करीन. घरात असंतोष नको.'

१०८
साहित्यातील जीवनभाष्य