पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकटीच निजली होती. तिने दार लावून घेतले होते. तेवढ्यात दाराबाहेर विषया व श्यामकान्त यांचे काही बोलणे चाललेले तिला ऐकू आले. चांदणे चांगले पडले होते. आणि बाहेर डोंगरावर हिंडावयास चल म्हणून श्यामकान्त तिला आग्रह करीत होता. आणि आश्चर्य म्हणजे विषया त्याला टाळीत होती. दोघांनी जावयाचे तिच्या मनात नव्हते. म्हणून ती विद्येला हाक मारू लागली. 'त्या निजल्या आहेत, त्यांना कशाला त्रास देतेस, आपण दोघेच जाऊ' असे श्यामकान्त म्हणत होता. आणि विषया तिला जोरजोराने हाका मारीत होती. विद्येला हे विचित्र वाटत होते. म्हणून जागी असूनही तिने ओं दिली नाही. शेवटी मला फारच झोप आली आहे, असे म्हणून विषयाने जाण्याचे टाळलेच.
 आदल्या दिवशी विषया विद्येजवळ म्हणाली होती की, माझे श्यामकान्तावर प्रेम आहे, पण मी ते पुरते दाखविणार नाही. मला दाखवता कामा नये. विद्येला ते आता आठवले. पण असे का, याचा मात्र तिला उलगडा झाला नाही. दुसऱ्या दिवशी दोघीच फिरायला गेल्या असताना मात्र विषयेने आपले सर्व हृद्गत तिला सांगितले. ती म्हणाली, 'माझी तऱ्हा मुलखा वेगळी आहे हे खरं. पण मला उच्च महत्त्वाकांक्षा आहे. मला टॉकीच्या क्षेत्रात उंच स्थान मिळवायचं आहे. त्यामुळे स्वतंत्र राहून कर्तृत्वाच्या स्वातंत्र्यासाठी प्रेमाच्या स्वातंत्र्यावर मला पाणी सोडलंच पाहिजे. स्वतंत्र स्त्रीला आपलं प्रेम स्वतंत्र न ठेवता, त्याचा कोंडमारा करावा लागतो. मला वाटतं स्त्रीचे जिणेच निसर्गाने असे चमत्कारिक अन गुंतागुंतीचे करून ठेवले आहे की, या नाही त्या रूपात तिला गुलामगिरी पतकारलीच पाहिजे. लग्न झाल की माझ्या महत्त्वाकांक्षेचा मार्ग बंद होणार हे उघड आहे. माझे श्यामकान्तावर प्रेम आहे. पण त्याची पूर्तता होऊ देणे मला शक्य नाही. लग्न झाल्यावर मातृपद येईल. अन मग संपलीच माझी कला नि महत्त्वाकांक्षा. याची मला चीड येते. पण निसर्गावर चिडून उपयोग काय ? प्रेमाची सांगता झाली तरी पुरुष स्वतंत्र राहतो. पण स्त्रीचे हातपाय बांधले जातात. हा निसर्गाचाच न्याय आहे !'
 ६ शंभुराव व केशवकाका 'अटकेपार' या कादंबरीत फडके यांनी सुधीरच्या मनातील जुनी संस्कृती व नवी संस्कृती या दोन मूल्यांचा संघर्ष फार उत्कृष्ट वर्णिला आहे. त्याचे वडील शंभुराव जोग व काका केशवराव हे दोघे सख्खे भाऊ, पण त्यांच्यात दोन ध्रुवाचे अंतर होते. त्यांचे वडील वेदान्ती होते, ब्रह्मावर निष्ठा ठेवून संसाराचे मायापाश हळूहळू कमी करावे अशी त्यांची वृत्ती होती. पण एवढ्यामुळे काहीच बिघडले नसते. या वेदान्ताबरोबरच त्यांची जुन्या कर्मकांडात्मक आचार धर्मावर निःसीम श्रद्धा होती. केशवकाका हे चित्रकार होते, अखिल भारतात त्यांची कीर्ती पसरली होती. पण चित्रे काढणे हा शंभुरावांच्या मते, छाकट्याचा धंदा होता. आणि तो पतकरून केशवकाकांनी कुळाला कलंक लावला, असे त्यांना वाटत असे. सुधीरने त्यांच्याकडे जाणे त्यांना मुळीच पसंत नसे. पण सुधीरची वडिलांच्यावर मूल्य संघर्ष

मूल्य संघर्ष
१०७