पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी आड येईन, असे वाटल्यामुळेच आपण लग्नाला नकार देत आहात. पण मी आपल्या ऐतिहासिक संशोधनाच्या आड येईन अशी कल्पना तरी मनात का यावी ? आम्हा बायकांना उच्च आकांक्षा समजत नाहीत ? का आम्हाला दारिद्र्यात राहता येत नाही ? कल्पना तरी काय आहे ?' हे लिहून काशी पुढे म्हणते 'मी आपल्या सारख्या पुरूषांना आपण लग्न करण्याचे नाकारले तरी थोरच समजते. किंबहुना ध्येयाकरिता नाही म्हणू शकता म्हणूनच थोर समजते. आपण योग्य तेच करावे मी ही योग्य तेच करीन. म्हणजे आपण नाही म्हटल्यास मी जन्मभर अविवाहित राहीन.'
 आणि ही थोर मनाची मुलगी खरोखरच तशी राहून अखेर झुरून झुरून, क्षय लागून त्यातच मृत्युमुखी पडली. नारायणरावांचे मन अखेर पालटले होते. त्यांनी काशीच्या घरी जाऊन तिला व तिच्या आईला तसे सांगितलेही. पण आता फार उशीर झाला होता, अखेरचा निरोप घेताना काशी म्हणाली, 'आपण केलेत ते योग्यच केलेत. ध्येयापुढे प्रेमाची मातब्बरी नसावी. आपण असे ध्येयनिष्ठ आहात म्हणूनच माझी प्रेमाची एकनिष्ठता कायम राहिली.' पण हे सांगून शेवटी मात्र तिने त्यांना विचारले, 'बायका ध्येयाच्या आड येतात, असे तुम्ही मानता कोणत्या आधारावर? सरलावहिनी ध्येयाच्या आड आल्या का ?'
 काशी गेली तरी ही वाक्ये नारायणरावाच्या मनात घुमतच राहिली.
 ५ ध्येय व मातृपद ध्येय आणि संसार, उच्च आकांक्षा की संसार असे द्वंद्व बहुधा पुरुषांच्याच मनात निर्माण होते. स्त्रियांना या दोन मूल्यांच्या संघर्षाच्या यातना बहुधा अनुभवाव्या लागत नाहीत. निदान पूर्वीतरी लागत नव्हत्या. कारण संसार, मुलेबाळे या पलीकडे त्यांच्या मनात आकांक्षा निर्माण होतच नसत. समाजाने त्यांच्यावर तशीच बंधने घातली होती. अर्वाचीन काळात स्त्री शिक्षण घेऊ लागली, बरीचशी स्वतंत्र झाली तेव्हा संसारापलीकडे त्यांच्याही चित्तात आकांक्षा निर्माण होऊ लागल्या हे खरे. पण तरीही बहुसंख्य स्त्रिया संसाराकांक्षीच असतात. डॉक्टर व्हावे, प्राध्यापक व्हावे, कलोपासना करावी असा ध्येयवाद अनेक स्त्रियांच्या चित्तात निर्माण होतो. नाही असे नाही. पण या तऱ्हेचा ध्येयवाद बहुधा संसार संभाळूनही त्यांना साध्य करिता येतो. पण तो येत नाही असे झाले म्हणजे मग मात्र त्यांच्या मनात हे द्वंद्व निर्माण होते. दोन मूल्यांमुळे निर्माण झालेल्या अशा एका द्वंद्वाचे एक सुरेख चित्र ना. सी. फडके यांनी आपल्या 'उद्धार' या कादंबरीत रंगविले आहे. विषया ही सर कोदंडराव यांची मुलगी. ती नटी होती. व चित्रपटाच्या क्षेत्रात तिला चांगले यश मिळू लागले होते. पण या क्षेत्रात अगदी शिखर गाठावयाचे अशी तिची महत्त्वाकांक्षा होती. अशा स्थितीत विद्या या आपल्या मैत्रिणीला बरोबर घेऊन ती लोणावळ्याला रहात असताना तिचा प्रियकर श्यामकान्त तिला भेटावयास आला होता. रात्री विद्या आपल्या खोलीत

१०६
साहित्यातील जीवनभाष्य