पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुःख होते याचे मात्र त्यांना वाईट वाटत असे. एका पत्रांत तर त्यांनी असे लिहिले की मला दुःख इतके होते की, 'तू माझा त्याग केला असतास तर मी सुटलो असतो. पण तू सीतासावित्री आहेस. गडकऱ्यांची सिंधू आहेस. हे सर्व चांगले आहे, पण मला ते आता दुःखदायक होत आहे.' विनायकरावांच्या इच्छेला त्यांच्या ध्येयवादाला विरोध करावा, असे सरलेच्या स्वप्नांतही कधी आले नाही. पण विनायकरावांना तुरंगवास घडणार, यामुळे तिला दुःख होत होते यात शंका नाही. शिवाय तिच्या आईवडिलांना तर या सर्व प्रकाराने धसकाच बसला होता. ते तिला पहावत नव्हते. या वेळीं पत्रात तिने लिहिले आहे. 'आपण सत्याग्रहात शिरणार आणि सरकारचे पाहुणे होणार याबद्दल मी अभिमान बाळगू की शोक करू? आपल्या उच्च ध्येयाबद्दल मला अभिमान वाटतो. पण मी आपले मन आपल्याजवळ नाही तर कोणाजवळ मोकळं करूं ?'
 सहधर्मिणी पुढे विनायकरावांना दीड वर्षाची शिक्षा झाली. त्यानंतर ते कोकणातील पांचबावडी या खेड्यात जाऊन राहिले व गांधीच्या आज्ञेप्रमाणे तेथे ग्रामीण जनतेची सेवा करू लागले. अर्थात त्यांचा संसार दरिद्रीच राहिला. पण सरलाने या सर्व प्रसंगी त्यांना मनोभावाने साथच दिली. तेथे त्यांच्यावर बदनामीकारक आरोप तेथील धर्ममार्तडांनी केले. ते पुन्हा शेतसाऱ्याच्या चळवळींत पडल्यामुळे त्यांना पुन्हा शिक्षाही झाली. खेड्यात एका वर्षी त्यांची दोन्ही मुले साथीला बळी पडली. पण सरलाने विनायकरावांना कधीही दोष दिला नाही. कधी तक्रार केली नाही. इतकेच नव्हे तर या हाल अपेष्टांनी त्यांना मृत्यू आल्यावर त्याच खेड्यात राहून त्यांचेच कार्य पुढे चालवण्याचे तिने ठरविले. स्त्री ही खरोखरीच पुरुषाची सहधर्मिणी आहे, त्याची साथी आहे, ध्येयवाद, उच्च आकांक्षा, देशसेवा तिलाही समजतात, त्यासाठी पडेल ती किंमत देण्यास तिचीही सिद्धता असते, हे या कादंबरीवरून जसे प्रत्ययाला येते, तसे 'रागिणी' वरून येत नाही.
 कल्पना काय आहे? या कादंबरीतील नारायणराव पाठक यांचे मत भय्यासाहेबांच्या सारखेच होते. शिक्षण संपल्यानंतर इतिहास संशोधक व्हावयाचे त्यांनी ठरविले. काशी ही त्यांची बालमैत्रीण होती. पुढे तारुण्यात आल्यावर त्यांनी तिला लग्नाचे वचनही दिले होते. पण, संसार आपल्या ध्येयाच्या आड येईल, असे त्यांच्या मनाने घेतल्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला. त्यांचे मित्र विनायकराव, भाऊ काळे यांनी त्यांचे मन वळविण्याचा फार प्रयत्न केला. काशीची व त्यांची आपल्या घरी मुद्दाम भेटही घडविली. पण त्यांनी आपला विचार बदलला नाही. उलट माझे मन यामुळे कमकुवत होते, तेव्हा पुन्हा भेटूही नको, असे त्यांनी काशीला सांगितले. या कादंबरीतले काशीचे चित्र अत्यंत मनोरम आहे. तिला खरे दुःख आहे ते हे की, बायकांना उच्च आकांक्षा समजत नाहीत, असा पुरूषांचा ग्रह असावा ! तिने नारायणरावांना लिहिले की, 'आपल्या उत्कट ज्ञानलालसेच्या

मूल्य संघर्ष
१०५